कॅनडाच्या अधिकार्‍यांना भारत सोडून जाण्याच्या आदेशावर ब्रिटनचा आक्षेप !

लंडन ( युरोप) – भारताने कॅनडाच्या ४१ अधिकार्‍यांना मायदेशी जाण्यास सांगितल्यानंतर कॅनडाने त्यांना परत बोलावले. या प्रकरणावरून ब्रिटनने भारताच्या आदेशावर आक्षेप घेतला आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले, ‘‘मतभेद संपवण्यासाठी चर्चा होणे आवश्यक असते आणि त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी आपापल्या ठिकाणी उपस्थित असावे लागतात. आम्ही भारताने घेतलेल्या निर्णयाशी सहमत नाही.

भारताच्या निर्णयामुळे कॅनडाच्या ४१ अधिकार्‍यांना भारत सोडून जावे लागले आहे. भारताने वर्ष १९६२ च्या ‘व्हिएन्ना करारा’चे (व्हिएन्ना करार ५२ कलमी असून त्यामध्ये राजनैतिक अधिकार्‍यांचे अधिकार आणि सवलती यांची माहिती आहे.) पालन करावे. भारताने कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांना देश सोडून जाण्यास सांगू नये.’’

‘भारताने हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी स्वतंत्र अन्वेषणात कॅनडाला सहकार्य करावे’, असेही ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या वेळी नमूद केले.

संपादकीय भूमिका

ब्रिटनने प्रथम त्याच्या देशातील खलिस्तान्यांवर कारवाई करून त्यांना भारताच्या कह्यात द्यावे आणि नंतर अशा प्रकारचे आक्षेप नोंदवत बसावे !