इस्रायल गाझावरील आक्रमण थांबवत नाही, तोपर्यंत गणवेशांचे नवीन कंत्राट घेणार नाही ! – केरळच्या खासगी आस्थापनाचा निर्णय

इस्रायलच्या पोलिसांच्या गणवेशांचा पुरवठा करणार्‍या केरळच्या खासगी आस्थापनाचा निर्णय

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळच्या कन्नूर येथील मरयम अपेरल प्रायव्हेट लिमिटेड हे खासगी आस्थापन इस्रायलच्या पोलिसांचे गणवेश शिवण्याचे कंत्राट गेल्या ८ वर्षांपासून घेत आहे. आता या आस्थापनाने म्हटले आहे, ‘यापुढे इस्रायलच्या पोलिसांच्या गणवेश पुरवण्याचे कंत्राट घेणार नाही. जोपर्यंत इस्रायल गाझा पट्टीवरील आक्रमण थांबवत नाही, तोपर्यंत नवीन कंत्राट घेणार नाही.’ गाझा येथील रुग्णालयावर झालेल्या आक्रमणामुळे या आस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.

या आस्थापनाचे प्रमुख थॉमस ओलिकल यांनी म्हटले की, हमासकडून करण्यात आलेल्या निरपराध्यांच्या हत्या स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत, त्याचप्रमाणे इस्रायलकडून गाझावर होणारी कारवाईही स्वीकारली जाऊ शकत नाही. तेथील पाणी, वीज आणि अन्न पुरवठा रोकणे, रुग्णालयावर बाँब टाकून लोकांना मारणे स्वीकारता येणार नाही. आम्हाला वाटते की, हे युद्ध संपावे आणि शांतता निर्माण व्हावी. (‘हे युद्ध कुणी चालू केले आणि का केले ?’, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे ! टाळी एका हाताने वाजत नाही, हे लक्षात घ्यायला हवे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

जगात अनेक आस्थापन असतील, ज्या इस्रायलच्या पोलिसांचा गणवेश शिवण्याचे कंत्राट घेतील !