गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षिकेने ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांना रोखले !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील ए.बी.एस्.ई. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्याने गाण्याच्या सादरीकरणापूर्वी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्याला व्यासपिठावरील अन्य विद्यार्थ्यानी ‘जय श्रीराम’ म्हणत प्रतिसाद दिला. याला एका शिक्षिकेने तीव्र आक्षेप घेतला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होऊ लागल्यानंतर महाविद्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संबंधित शिक्षिकेला कामावरून बडतर्फ करण्याचीही मागणी करण्यात येत आहे.

१.  ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यावर शिक्षिका म्हणाली, ‘‘तुम्ही येथे घोषणाबाजी करण्यासाठी आलेला नाहीत. हा महाविद्यालयाचा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. आता तू येथे गाणे गाणार नाहीस.’’

२. याच कार्यक्रमाचा अन्य व्हिडिओ प्रसारित होत आहे. यात ही शिक्षिका म्हणते, ‘आपण सगळे येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलो आहोत; मग येथे ‘जय श्रीराम’च्या घोषणा का दिल्या जात आहेत ? याला काहीच अर्थ नाही. तुम्ही शिस्तीचे पालन करा. हा कार्यक्रम तेव्हाच होईल, जेव्हा तुम्ही शिस्तीचे कराल. नाहीतर आम्ही भविष्यात कोणताही कार्यक्रम करणार नाही. तुम्ही एका चांगल्या महाविद्यालयामध्ये शिकत आहात. मग तुमची वागणुकही चांगली असायला हवी.’

संपादकीय भूमिका

‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने कोणती हानी होते ?’, हे कुणी सांगेल का ? श्रीरामाच्या जीवनाचा आदर्श देशातील प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे असतांना त्याच्या नावालाही विरोध होणे, हे लज्जास्पद !