‘श्री दुर्गासप्तशती’मधील महत्त्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण श्लोकांचे महत्त्व !

सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…

‘हिंदु धर्मामध्ये उपासनेला अतिशय महत्त्व आहे. प्राचीन काळापासून ही भगवंताची उपासना मोठ्या श्रद्धेने आणि निष्ठेने केली जात आहे. या उपासनेत शक्ती उपासनेला अनन्य साधारण महत्त्व आहे. ही उपासना अनेक मार्गांनी सांगितली आहे. त्यात ‘दुर्गासप्तशती’ ही सर्वश्रेष्ठ मंत्रशक्ती आहे. ‘श्री दुर्गासप्तशती’मध्ये एकूण ७०० श्लोक आहेत. ते १३ अध्यायांमध्ये विभागले आहेत. या ७०० श्लोकांमधून देवीची स्तुती आणि तिच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा समर्थपणे गायली गेली आहे. या ग्रंथाच्या वाचनामुळे देवी आपले सर्व पातळ्यांवर संरक्षण करते. आपल्या शत्रूचा नाश करून आयुष्य निर्भय करते, मानवी आयुष्यातील सर्व प्रकारचे सुख मिळते, धनप्राप्ती होते, नाना प्रकारच्या आजारांमधून आपली सुटका होते. मुख्य म्हणजे देवी आपल्या परमभक्तावर तात्काळ प्रसन्न होते आणि आपले मनोवांच्छित पूर्ण करते. श्री दुर्गासप्तशतीमधील ७०० श्लोकांपैकी काही महत्त्वाच्या श्लोकांचे महत्त्व येथे देत आहे.

‘श्री दुर्गासप्तशती’ ग्रंथातील काही सिद्धमंत्र

१. सर्वांच्या सौख्यासाठी

देव्या यया ततमिदं जगदात्मशक्त्या  निश्शेषदेवगणशक्तिसमूहमूर्त्या ।
तामम्बिकामखिलदेवमहर्षिपूज्यां  भक्त्या नताः स्म विदधातु शुभानि सा नः ।।
– श्री दुर्गासप्तशती, अध्याय ४, श्लोक ३

अर्थ : देवतागण म्हणाले, ‘‘सर्व देवतांच्या शक्तीचा समुच्चय हेच जिचे स्वरूप आहे, ज्या देवीने आपल्या शक्तीने संपूर्ण जगाला व्याप्त केले आहे, सर्व देवता आणि महर्षि यांना पूजनीय अशा जगदंबेला आम्ही भक्तीभावाने नमस्कार करतो. ती आमचे कल्याण करो.’’

२. विश्वातील अशुभ नष्ट होण्यासाठी किंवा भीती संपुष्टात येण्यासाठी

यस्याः प्रभावमतुलं भगवाननन्तो  ब्रह्मा हरश्च न हि वक्तुमलं बलं च ।
सा चण्डिकाखिलजगत्परिपालनाय नाशाय चाशुभभयस्य मतिं करोतु  ।।
– श्री दुर्गासप्तशती, अध्याय ४, श्लोक ४

अर्थ : जिचा अनुपम प्रभाव आणि शक्ती यांचे वर्णन करण्यास भगवान विष्णु, ब्रह्मदेव, तसेच महादेवही असमर्थ आहेत, अशी देवी भगवती चंडिका संपूर्ण जगाचे पालन करण्याचा अन् अशुभ भयाचा नाश करण्याचा विचार करो.

३. पापांचा नाश व्हावा म्हणून

देवि प्रसीद परिपालय नोऽरिभीते- र्नित्यं यथासुरवधादधुनैव सद्यः ।
पापानि सर्वजगतां प्रशमं नयाशु उत्पातपाकजनितांश्च महोपसर्गान् ।।

अर्थ : हे देवी, तू आमच्यावर प्रसन्न हो. आता जसे असुरांचा वध करून तू शीघ्रतेने आमचे रक्षण केलेस, तसेच नेहमी आम्हाला शत्रूभयापासून वाचव. संपूर्ण जगाचे पाप नष्ट कर. उत्पात, तसेच पापांचे फलस्वरूप म्हणून निर्माण होणार्‍या महामारी आदी मोठमोठ्या उपद्रवांना लगेच दूर कर.

श्री दुर्गादेवी

४. संकष्टनाशक व्यक्तीगत संकटमुक्तीसाठी

शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे । सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तुते
– श्री दुर्गासप्तशती, अध्याय ११, श्लोक १२

अर्थ : शरण आलेल्या दीन आणि आर्त लोकांचे रक्षण करण्यात तत्पर अन् सर्वांच्या व्यथा दूर करणार्‍या हे देवी नारायणी, माझा तुला नमस्कार असो.

५. संकटाचा नाश व्हावा आणि सुखप्राप्ती व्हावी यांसाठी

करोतु सा न: शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापदः ।

अर्थ : ती कल्याणकारी देवी आमचे कल्याण आणि मंगल करो अन् सारी संकटे दूर करो.

६. रोगांचे निवारण करणारा मंत्र

रोगानशेषानपहंसि तुष्टा रुष्टा तु कामान् सकलान्भीष्टान् ।
त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति ।।
– श्री दुर्गासप्तशती, अध्याय ११, श्लोक २९

अर्थ : हे देवी, तू प्रसन्न झाली असता सर्व रोगांना समूळ नष्ट करतेस. तू रागावली असता एकही मनोकामना पूर्ण होऊ शकत नाही. जे तुझा आश्रय घेतात, त्यांच्यावर कधीही कोणतीही आपत्ती येत नाही. असे लोक तुझ्या कृपेमुळे अन्य लोकांनाही आश्रय आणि अभय देऊ शकतात.

७. लवकर झटपट विवाह ठरण्यासाठी

पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम् । तारिणीं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम् ।।
– श्री दुर्गासप्तशती, अर्गलास्तोत्र, श्लोक २२

अर्थ : हे देवी, मनाला सुख देणारी (मनोरमा), मनाला अनुकूल असे वागणारी, दुर्गम अशा संसारसागरातून तारणारी, तसेच उत्तम कुळात उत्पन्न झालेली अशी पत्नी मला प्रदान कर.

८. सर्व प्रकारची बाधा नष्ट होण्यासाठी

सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्याखिलेश्वरि । एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम् ।।

अर्थ : हे सर्वेश्वरी, अशा प्रकारे तू तिन्ही लोकांच्या सर्व बाधांचे शमन कर आणि आमच्या शत्रूंचा नाश कर.

९. आयुष्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी

ते सम्मता जनपदेषु धनानि तेषां तेषां यशांसि न च सीदति धर्मवर्गः ।
धन्यास्त एव निभृतात्मजभृत्यदारा येषां सदाभ्युदयदा भवती प्रसन्ना ।।
– श्री दुर्गासप्तशती, अध्याय ४, श्लोक १५

अर्थ : नेहमी सर्वांगीण उन्नती (अभ्युदय) प्रदान करणार्‍या हे देवी, तू ज्यांच्यावर प्रसन्न होतेस, ते देशात सन्मानित होतात, त्यांना धन आणि यश यांची प्राप्ती होते, ते धर्मापासून कधीही च्युत होत नाहीत अन् ते आपली पत्नी, पुत्र आणि सेवक यांच्यासह धन्य मानले जातात.

१०. सर्व प्रकारच्या शुभाशीर्वादांसाठी एकमेव मंत्र

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ।।
– श्री दुर्गासप्तशती, अध्याय ११, श्लोक १०

अर्थ : सर्व मंगल गोष्टींमधील मांगल्यस्वरूप, पवित्र, सर्व इच्छा साध्य करून देणार्‍या, सर्वांचे शरणस्थान असलेल्या, त्रिनेत्रधारिणी, हे गौरवर्णी नारायणीदेवी (श्री दुर्गादेवी), मी तुला नमस्कार करतो.

११. सर्व विद्या आणि स्त्रियांना मातृत्व प्राप्तीसाठी

विद्याः समस्तास्तव देवि भेदाः स्त्रियः समस्ताः सकला जगत्सु ।
त्वयैकया पूरितमम्बयैतत् का ते स्तुति स्तव्यपरा परोक्तिः ।।
– मार्कण्डेयपुराण, अध्याय ९१, श्लोक ५

अर्थ : हे देवी, सर्व विद्या या तुझेच भिन्न-भिन्न रूप आहेत. जगातील सर्व स्त्रिया या तुझ्याच मूर्ती आहेत. माते, तूच एकमात्र या विश्वाला व्याप्त केले आहेस. तुझी स्तुती काय करावी ? तू तर स्तवन करण्यायोग्य गोष्टींच्याही पलीकडील, म्हणजेच परावाणी आहेस.

१२. आरोग्यप्राप्ती, आत्मविश्वास वाढणे, भित्रेपणा न्यून होण्यासाठी, प्रतिकूल परिस्थितीविरुद्ध उत्तम झगडण्यासाठी शक्ती प्राप्त होण्यासाठी

सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि । गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तु ते ।।
– श्री दुर्गासप्तशती, अध्याय ११, श्लोक ११

अर्थ : हे सनातनी, तू निर्मिती, पालन आणि संहार यांची एकवटलेली शक्ती आहेस. हे नारायणी, तू गुणांचा आधार, तसेच सर्वगुणसंपन्न आहेस. तुला नमस्कार असो.

१३. प्रसन्न चित्त आणि मनःशांती यांसाठी 

प्रणतानां प्रसीद त्वं देवि विश्वार्तिहारिणी । त्रैलोक्यवासिनामीड्ये लोकानां वरदा भव ।।

अर्थ : अखिल विश्वाची पीडा दूर करणार्‍या हे देवी, आम्ही तुझ्या चरणांपाशी आलो आहोत. आम्हाला प्रसन्न हो. त्रिलोकात निवास करणार्‍यांना पूजनीय असणार्‍या हे माते, तू सर्वांना वरदान दे.

१४. मोक्षप्राप्तीसाठी

विधेहि देवि कल्याणं विधेहि परमां श्रियम् । रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ।।
– श्री दुर्गासप्तशती, अर्गलास्तोत्र, श्लोक १४

अर्थ : हे दुर्गादेवी, माझे कल्याण कर, मला विपुल संपत्ती दे. मला रूप, विजय अन् यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर.

१५. सिद्धमंत्र – साधना मंत्र कसे म्हणावे ?

श्री दुर्गासप्तशतीचे मंत्र, म्हणजे अगदी खरे सांगायचे म्हणजे अमृतमय सार आहेत. ते भक्तीपूर्वक श्रद्धा ठेवून म्हणावे. पहाटे लवकर उठून स्नानानंतर देवपूजा करून नित्य उपासना करून कुलदेवीची पूजा करावी. घरातील देवघरातील टाक मूर्तीची पूजा करावी किंवा दुर्गादेवीची मूर्ती किंवा चित्राची पूजा करावी. त्यानंतर हातात पाणी घेऊन संकल्प करून मंत्र एका वेळी किमान ११ वेळा, २१ वेळा किंवा १०८ वेळा एका वेळी जपावा. भोवती वातावरण शुद्धीसाठी उदबत्ती, शुद्ध तुपाचा दिवा / निरांजन लावावे. घरात गोमूत्र शिंपडावे. भोवतीचे वातावरण भक्तीने आणि श्रद्धेने एकदा का भारले की, देवीला साष्टांग नमस्कार घालून पुन्हा आसन मांडी घालावी. प्रथम खालील ४ मंत्र प्रथम श्रद्धापूर्वक म्हणावेत.

ॐ ऐं आत्मतत्त्वं शोधयामि नमः स्वाहा ।
ॐ र्‍हीं विद्यातत्त्वं शोधयामि नमः स्वाहा ।
ॐ क्लीं शिवतत्त्वं शोधयामि नमः स्वाहा ।
ॐ ऐं र्‍हीं क्लीं सर्वतत्त्वं शोधयामि नमः स्वाहा ।।

यानंतर ‘कवच अर्गलाकीलक’ आणि ‘देवी अथर्वशीर्ष’ संकल्पपूर्वक म्हणावे. त्यानंतर देवीची आरती म्हणावी. देवीला साष्टांग नमस्कार घालावा. नैवेद्य दाखवावा. उपस्थित घरातील लोकांना प्रसाद द्यावा. त्यानंतर प्रसाद स्वतः ग्रहण करावा. देवीभक्तांनो, एक लक्षात ठेवा की, आपला आहार अल्प फळे, दूध असा असावा. किमान मासातून एकदा दुर्गाष्टमीस श्री दुर्गासप्तशतीतील मंत्रसाधना अवश्य करता येण्यासारखी आहे. नवरात्रीमध्ये संपूर्ण श्री दुर्गासप्तशती प्राकृत किंवा गद्यरूप कथासाराचे वाचन करावे. देवी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करील.

– ज्योतिषी ब.वि. तथा चिंतामणी देशपांडे (गुरुजी), पुणे

(साभार : मासिक ‘ललना’, दिवाळी २०१२)