१. भारतातील काही सुगंधी डिंक स्रवणार्या वनस्पतींपासून कापूर, गुग्गुळ, उद, धूप मिळत असणे; मात्र पुष्कळ वृक्षतोड झाल्यामुळे या वनस्पतीही नष्ट होण्याच्या मार्गावर असणे
‘आपल्या भारत देशात अनेक प्रकारच्या सुगंधी वनस्पती आहेत’, हे आपल्याला ठाऊक आहे. या सुगंधी वनस्पतींपासूनच आपल्याला कापूर, गुग्गुळ, उद आणि धूप यांसारखे दैवी सुगंध प्राप्त होतात. या वनस्पतींचा डिंक, म्हणजेच एक सुगंधी द्रव्य आहे. सुमात्रा बेटावर कापराची झाडे आहेत. दक्षिण भारतातील पर्वतांवर गुग्गुळ, सांब्राणी, उद या प्रकारच्या सुगंधी द्रव्यांचे वृक्ष आहेत. आता बर्याच प्रमाणात वृक्षतोड झाल्याने या वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
२. सुगंधी द्रव्ये देणार्या अन्य वनस्पती !
२ अ. ‘देवदारू’ : ‘देवदारू’ या वृक्षाविषयी माहिती मिळवतांना कळले, ‘कोळ्ळीमलई पर्वतावर ‘देवदारू’ नावाचा सुगंधी वृक्ष असून त्याची लाकडे पूर्वी देवांची आरती करतांना पेटवण्यासाठी उपयोगात आणली जात होती. या लाकडाचा तुकडा पेटवल्यावर त्यातून एक प्रकारचा सुगंधी धूर बाहेर पडतो.’ आम्ही हे लाकूड या पर्वतावरील एका व्यक्तीकडे पाहिले.
२ अ १. हे लाकूड जाळल्यावर येणार्या धुराच्या सुगंधात देवतांना आकर्षित करण्याची क्षमता असणे; म्हणून यज्ञयागासाठी या वृक्षाच्या समिधा वापरणे : या लाकडातून बाहेर पडणार्या धुराचा वास साधारणपणे मसाल्याचे पदार्थ जाळले असता येणार्या वासाप्रमाणे आहे. मला हा धूर मारक वाटला. त्या व्यक्तीने ‘देवदारू’ या वृक्षाविषयी माहिती देतांना आम्हाला सांगितले, ‘‘या वृक्षाच्या लाकडाच्या धुरामध्ये देवतांना आकर्षित करण्याची क्षमता आहे; म्हणून या वृक्षाच्या समिधा यज्ञात वापरल्या जातात. या धुरामुळे अनेक देवता यज्ञस्थळी आकर्षित झाल्याने देवतांच्या चैतन्याचा लाभ यज्ञस्थळी उपस्थित असलेल्या लोकांना मिळण्यास साहाय्य होते.’’
२ आ. जवादू : अशीच अजून एक सुगंधी वनस्पती आहे ‘जवादू !’ ‘जवादू’ झाडाच्या खोडाच्या भुकटीतूनच याचा सुगंध येतो. ‘जवादू’चे अत्तर बाजारात मिळते. हा सुगंध सर्वांचे मन प्रफुल्लित करणारा आहे. ‘याचे वृक्ष तमिळनाडूतील वेल्लूर या गावाच्या जवळ असणार्या पर्वतांवर आहेत’, अशी माहिती आम्हाला मिळाली.
१. बर्याचदा दक्षिण भारतात देवीच्या देवळात किंवा शंकराचार्यांच्या मठात या सुगंधी भुकटीचा उपयोग देवतांच्या मूर्तीच्या अंगाला लावण्यासाठी केला जातो.
२. ही सुगंधी भुकटी किंवा अत्तर यांचा उपयोग हवनातही करतात. यामुळे वातावरण सुगंधी होते आणि यामुळे त्या ठिकाणी देवतांचे तत्त्वही आकर्षित होते.
३. अनेक वेळा महर्षि आपल्याला रामनाथी आश्रमात चालू असणार्या यज्ञात या ‘जवादू’ नावाच्या अत्तराचा उपयोग करण्यास सांगतात.
३. कृतज्ञता
देवाने आपल्याला या दैवी वृक्षांच्या द्वारे अनेक सुगंध दिले आहेत. ‘त्याचा कधी आणि कसा उपयोग करायचा ?’, हेही ऋषिमुनींनी आपल्याला सांगितले आहे. ऋषिमुनींनी दिलेल्या सर्वच क्षेत्रांतील या ज्ञानाविषयी आपण त्यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच आहे.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, कोळ्ळीमलई, तमिळनाडू. (१४.१.२०२१, सकाळी ८.३०)
दक्षिण भारतात मिळणारे पुनगू अत्तर‘महर्षींनी आम्हाला ‘पुनगू’ नावाचे अत्तर काळभैरवाची पूजा झाल्यावर त्याच्या दंडाला लावायला सांगितले आहे; म्हणून रामनाथी आश्रमात स्थापन केलेल्या काळभैरवाच्या दंडाच्या पूजेत हे अत्तर उपयोगात आणले जाते. याचा सुगंध अत्यंत मारक आहे. हे अत्तर एका प्रकारच्या प्राण्यापासून मिळते. ‘त्या प्राण्याच्या नाभीत हा सुगंध असतो’, अशी माहिती आम्हाला कळली. हे अत्तर दक्षिण भारतात मिळते. ‘कुठल्या प्राण्यापासून कुठला सुगंध मिळतो ?’ आणि ‘या सुगंधामुळे कुठल्या देवतेचे तत्त्व जागृत होते ?’ याचाही आपल्या ऋषिमुनींचा अभ्यास होता’, हेही आपल्याला यातून शिकायला मिळते.’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, कोळ्ळीमलई, तमिळनाडू. (१४.१.२०२१, सकाळी ८.३९) |