पाकिस्तानी मुसलमान खेळाडू मला नेहमीच धर्मांतरासाठी दबाव टाकत होते !

पाकिस्तानचे हिंदु धर्मीय माजी क्रिकेट खेळाडू दानिश कनेरिया यांचा गंभीर आरोप !

पाकिस्तानचे हिंदु धर्मीय माजी क्रिकेट खेळाडू दानिश कनेरिया

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे हिंदु धर्मीय माजी क्रिकेट खेळाडू दानिश कनेरिया यांनी सामाजिक माध्यमातून एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात त्यांनी तत्कालीन पाकिस्तानी मुसलमान क्रिकेटपटू त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी नेहमीच दबाव टाकत असल्याचे म्हटले आहे.

श्रीलंकेच्या खेळाडूलाही धर्मांतरासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न !

दानिश कनेरिया यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटू अहमद शहजाद याचा एक जुना व्हिडिओ प्रसारित केला आहे. हा व्हिडिओ वर्ष २०१४ चा श्रीलंकेसमवेतच्या सामन्याच्या कालावधीतील आहे. यात श्रीलंकेचा खेळाडू तिलकरत्ने दिलशान आणि अहमद शहजाद दिसत आहेत. यात शहजाद दिलशान याला सांगतो, ‘जर तू मुसलमानेतर आहेस, तर तू मुसलमान हो. यामुळे तू जीवनात काहीही केले, तरी थेट स्वर्गात जाशील.’ हा व्हिडिओ ट्वीट करतांना कनेरिया यांनी लिहिले आहे की, स्टेडियममधील खोलीत, मैदानात किंवा जेवणाच्या पटलावर माझ्या समवेत नेहमीच असे (धर्मांतरासाठीचा दवाब) होत होते.’ तिलकरत्ने दिलशान याचे वडील मुसलमान, तर आई बौद्ध आहे. दिलशान आईच्या धर्माचे पालन करत होता.

शाहीद आफ्रिदीला मी संघात नको होतो !

पाकचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी

दानिश कनेरिया यांनी पाकचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीविषयी म्हटले की, ‘मी पाकच्या संघात असावे’, असे आफ्रिदीला वाटत नव्हते. मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो. आफ्रिदी अन्य खेळाडूंना माझ्या विरोधात भडकावत होता. मी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत असल्याने त्याला माझ्याविषयी मत्सर वाटत होता.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानच्या मुसलमान क्रिकेटपटूंची खरी मानसिकता हीच आहे; मात्र भारतातील पाकप्रेमी राजकीय नेते, निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांची नेहमीच ‘भारताने पाकसमवेत क्रिकेट खेळावे’, अशी मानसिकता राहिली आहे. ते आता घटनेविषयी तोंड उघडणार नाहीत, हेही तितकेच खरे !