Israel Offensive : इस्रायलकडून आता सीरियाच्या विमानतळांवरही आक्रमण

इराणकडून हिजबुल्लाला शस्त्रपुरवठा होत असल्याने आक्रमण

इस्रायलचे सीरियाच्या विमानतळांवरही आक्रमण

तेल अविव (इस्रायल) : इस्रायलकडून हमासच्या गाझा पट्टीवरील ठिकाणांवर आक्रमण केले जात आहे. इस्रायलकडून लेबनॉनमधील जिहादी आतंकवादी संघटना हिजबुल्लाच्या ठिकाणांवरही आक्रमण केले जात असतांना त्याने आता सीरियातील २ विमानतळांवरही हवाई आक्रमण केले आहे. याद्वारे इस्रायलने ३ आघाड्यांवर यद्ध चालू केले आहे. सीरियाची राजधानी दमास्कस आणि अलेप्पो येथील विमानतळांवरून लेबनॉनमध्ये हिजबुल्लाला इराणकडून शस्त्र पुरवठा केला जात आहे, तसेच सीरियामध्ये हिजबुल्लाचे आतंकवादी आहेत, या माहितीवरून इस्रायलने हे आक्रमण केले, अशी माहिती ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने सिरीयाच्या ‘शाम एफ्एम्’ या वृत्तवाहिनीच्या हवाल्याने प्रसारित केली आहे.

या आक्रमणाच्या प्रकरणी सीरियाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली, तरी इराणने रशियाकडे साहाय्य मागितल्याचे सांगण्यात येत आहे. इस्रायलने यापूर्वीही सीरियावर आक्रमणे केलेली आहेत; मात्र प्रत्येक वेळी सीरियाने कोणतीही प्रतिक्रिया किंवा प्रत्युत्तर दिलेले नाही. या वेळीही सीरिया अशीच भूमिका घेईल, असे म्हटले जात आहे.

(सौजन्य : CNN-News18)

हमासकडे सापडला इस्लामिक स्टेटचा झेंडा !

इस्रायलने गाझा पट्टीत केलेल्या आक्रमणाच्या वेळी तेथे इस्लामिक स्टेटचा झेंडा सापडल्याचे छायाचित्र इस्रायलकडून प्रसारित करण्यात आले आहे. इस्रायलने दावा केला की, हमासचे आतंकवादी इस्रायलमध्ये घुसखोरी करतांना इस्लामिक स्टेटचा झेंडा घेऊन आले होते आणि त्यांनीच इस्रायली नागरिकांचा शिरच्छेद केला.