भारतात हिंदू बहुसंख्य असतांनाही त्यांची मानसिकता अल्पसंख्यांकांप्रमाणे ! – फ्रान्सुआ गोतिए, फ्रेंच पत्रकार

फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांचे परखड विधान !

फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतात १४० कोटी लोकसंख्येत हिंदु बहुसंख्य आहेत. हिंदु धर्म जगातील तिसरा सर्वांत मोठा धर्म आहे; मात्र हिंदूंची मानसिकता अल्पसंख्यांकांसारखी आहे. त्यांच्यात बंधूभावही अल्प आहे. ही एक मोठी समस्या आहे, असे विधान प्रसिद्ध फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी एका मुलाखतीत केले. ते येथे ‘ऑर्ट ऑफ लिविंग’कडून आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. सध्या गोतिए पुणे येथील उभारत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयासाठी अमेरिकेतून देणगी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

जगभरात हिंदु धर्मावर आघात होत आहेत !

या मुलाखतीतल गोतिए म्हणाले की, इतिहासातून धडा घेऊन हिंदूंनी लढले पाहिजे. आज जगभरात हिंदूवर आक्रमणे होत आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान असो कि भारतात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणारे धर्मांतर असो. भारतात धर्मांतर ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः पंजाब आणि दक्षिण भारतात भारताचे पाश्‍चात्त्यीकरण होत आहे.

भारतीय विचारवंत जगभरात जाऊन ‘हिंदु धर्माभिमानी इस्लमी कट्टरतावाद्यांप्रमाणे धोकादायक आहेत’, असे सांगतात !

गोतिए यांना जगभरातील हिंदूंविषयी प्रश्‍न विचारल्यावर ते म्हणाले की, भारताविषयी जगभरातील लोकांमध्ये जागृती करण्यासाठी सरकारकडून काही विचारवंतांना तेथे पाठवले जाते; मात्र ही लोक ‘हिंदु धर्माभिमानी इस्लामी कट्टरतावाद्यांप्रमाणे धोकादायक आहेत’, असे सांगतात; मात्र हे अत्यंत चुकीचे आहे. यात काहीही तथ्य नाही. कारण हिंदू कधी भारताच्या बाहेर गेले आणि त्यांनी त्यांचा धर्म इतरांवर थोपला, असे नाही. उलट ख्रिस्ती धर्म दक्षिण अमेरिकेत गेला आणि मिशनर्‍यांनी तेथील संस्कृती नष्ट केली. इस्लाम इजिप्तमध्ये पोचला आणि तेथील संस्कृती नष्ट केली. हिंदूंनी कधी कुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला नाही.

जगातील सर्वाधिक सहिष्णु हिंदू !

हिंदूंविषयी गोतिए पुढे म्हणाले की, हिंदु जगातील सर्वाधिक सहिष्णु लोक आहेत. ‘हिंदु कट्टरतावादाचा उदय होत आहे’, असे कुणी म्हणत असेल, तर अयोग्य आहे. याच कारणामुळे मी छत्रपती शिवाजी महाराजांचे संग्रहालय उभारत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाडस असामान्य !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयाविषयी गोतिए म्हणाले की, मी त्यांचा सन्मान करतो. कारण त्यांचे धाडस असामान्य होते. त्यांचे धाडस बुद्धीमत्तेपेक्षाही अधिक होते; मात्र आज हिंदूंवर इतका अत्याचार होत आहे, अमानुष आक्रमणे गेली जात आहेत, हत्या आणि बलात्कार होत आहेत की, हिंदूंमध्ये भीतीची मानसिकता निर्माण झाली आहे.

संपादकीय भूमिका

  • जे एका विदेशी पत्रकाराला कळते ते निद्रिस्त हिंदूंना कळत नाही, हे दुर्दैव ! ‘असे हिंदू मार खाण्याच्याच लायकीचे आहेत’, असेही कुणी म्हटले, तर चुकीचे ठरू नये !
  • गांधीगिरी आणि आत्मघाती सर्वधर्मसमभाव यांचे डोस पाजण्यात आल्याने आज हिंदूंची स्थिती ‘सर्वाधिक मार खाणारे, अत्याचार होणारे’ अशी झाली आहे. हिंदूंमधील क्षात्रतेजाचा लय झाला आहे. हिंदूंमध्ये पुन्हा तेज निर्माण होण्यासाठी त्यांच्याकडून साधना करवून घेणेच आवश्यक आहे !