लंडनमध्ये भारतीय वंशाच्या खलिस्तानविरोधी शीख व्यक्तीला ठार मारण्याच्या धमक्या !

  • वाहनावर केला गोळीबार !

  • तक्रारी करूनही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप

लंडन (ब्रिटन) – येथे खलिस्तानविरोधी शीख व्यावसायिक हरमनसिंह कपूर यांना  खलिस्तान्यांनी धमकी देत त्यांच्या वाहनावर गोळीबार केल्याची घटना ३० सप्टेंबरला त्यांच्या घराबाहेर घडली. हरमनसिंह यांना अनेक मासांपासून खलिस्तान्यांकडून ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत; मात्र पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हरमनसिंह लंडनमध्ये एक उपाहारगृह चालवतात.

हरमनसिंह यांनी सांगितले की, गेल्या ८ मासांत त्यांच्यावर ४ वेळा आक्रमण करण्यात आले आहे. आताच्या घटनेत त्यांच्या घराबाहेर उभ्या असणार्‍या त्यांच्या गाडीवर गोळीबार करून त्याच्यावर लाल रंग ओतण्यात आला. या वेळी खलिस्तान्यांनी शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली आणि ते पळून गेले.

खलिस्तान्यांनी हरमन सिंह यांच्या पत्नी आणि मुलगी यांच्यावर बलात्कार करण्याचीही धमकी दिली आहे. ‘याविषयी पोलिसांना माहिती दिली असूनही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही’, असे हरमनसिंह यांनी सांगितले.

मरेपर्यंत खलिस्तानचा विरोध करू आणि भारतासमवेत राहू ! – हरमनसिंह दांपत्य

हरमन सिंह आणि त्यांची पत्नी खुशी यांनी सांगितले की, आम्ही मरेपर्यंत खलिस्तानचा विरोध करत राहू. खलिस्तानी सर्व शिखांना अपकीर्त करत आहेत.  खलिस्तानची मागणी चुकीची आहे. शिखांच्या गुरूंनी धर्मासाठी बलीदान दिले आहे. त्याची खलिस्तान्यांना जाण नाही.

संपादकीय भूमिका

  • खलिस्तानचा उघडपणे विरोध करणारे शीख भारतातही अल्प प्रमाणात दिसून येत असतांना लंडनमध्ये अशा प्रकारचा विरोध करणार्‍या शीख व्यक्तीचे अभिनंदनच करायला हवे !
  • ब्रिटनमधील ऋषी सुनक यांचे सरकार खलिस्तान्यांवर अपेक्षित अशी कारवाई करत नसल्याने त्यांचे फावले आहे ! अन्य देशात भारतीय वंशांचे लोक कितीही मोठ्या पदावर पोचले, तरी ते त्यांच्या देशाचा आणि राजकीय लाभाचाच विचार करणार, हे सुनकही दाखवून देत आहेत, असे चित्र आहे !