|
नवी मुंबई, २९ सप्टेंबर (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात अनंतचतुर्दशीच्या दिवशी ८ सहस्र ६४१ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन पहाटे ४ वाजेपर्यंत पार पडले. शहरातील आठही विभागांमध्ये नैसर्गिक तलावांसह २२ पारंपरिक मुख्य विसर्जनस्थळांवर ७ सहस्र ८६ आणि १४१ कृत्रिम तलावांवर १ सहस्र ५५५ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये ८ सहस्र १२२ घरगुती आणि ५१९ सार्वजनिक अशा एकूण ८ सहस्र ६४१ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या वेळी महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विसर्जन स्थळांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुयोग्य व्यवस्था करण्यात आली होती.
१. विसर्जन स्थळांपैकी ‘तलाव व्हिजन’ अंतर्गत सुशोभित करण्यात आलेल्या १४ नैसर्गिक तलावांमध्ये गॅबियन वॉल ही तलावाचे दोन भाग करण्यासाठी बांधण्यात आली आहे. या निर्धारित क्षेत्रातच भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करून पर्यावरण जपणुकीच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या आवाहनास सहकार्य केले. दुसरीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून निर्माण केलेल्या १४१ कृत्रिम तलावांकडे मात्र भाविकांनी पाठ फिरवली.
२. विसर्जनस्थळी ओले आणि सुके निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांनी जलाशयामध्ये निर्माल्य न टाकता ते याच कलशामध्ये टाकले.
३. सर्व विसर्जन स्थळांवरून दहाव्या दिवसाच्या विसर्जनदिनी ७ टन ८५० किलो निर्माल्य संकलित झाले. अशा प्रकारे यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये ४ दिवसांच्या विसर्जनात ५६ टन ३५० किलो इतके निर्माल्य जमा झाले. हे निर्माल्य स्वतंत्र संकलन वाहनांद्वारे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी नेण्यात आले. ‘त्या ठिकाणी निर्माल्याचे पावित्र्य जपत त्यावर प्रक्रिया केली जात आहे’, असे महापालिकेच्या वतीने भाविकांना सांगण्यात आले.
मिरवणुकीतील अपप्रकार !
काही मिरवणुकांमध्ये कर्णकर्कश आवाजात डीजेच्या तालावर अंगविक्षेप करत नृत्य करण्यात येत होते. अनेक मंडळांनी डीजेच्या ऐवजी पुणेरी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली होती. काही मंडळांच्या मिरवणुकीमधील लोकांनी मद्यप्राशन केले होते. यथेच्छ नाचायला मिळावे, यासाठी मिरवणूक ८०० मीटरपर्यंत नेण्यासाठी मंडळांना ३ ते ४ घंटे लागत होते. काही मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आतीषबाजी करण्यात आली.