भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘इंडिया’ या नावाने ओळखले जाते आणि या नावाचा इतिहासही मोठा आहे. तथापि प्राचीन काळापासून भारताला वेगवेगळ्या७ नावांनी ओळखले जात असे. आता पुन्हा एकदा ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या विषयावर चर्चा होत आहे. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्याच कलमामध्ये ‘इंडिया दॅट इज भारत (इंडिया जो भारत आहे)’, असा उल्लेख केला आहे. त्यामुळे इंग्रजीमध्ये ‘इंडिया’ आणि भारतीय भाषांमध्ये ‘भारत’, असे नाव आपण स्वीकारले आहे.
स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७६ वर्षांच्या काळात सर्वपक्षीय शासनकर्त्यांना ‘भारत’ हे नाव अंतिम करावेसे का वाटले नाही ? |
१. भारताच्या नावांचा इतिहास
१ अ. जम्बुद्वीप : प्राचीन काळात भारताला ‘जम्बुद्वीप’ या नावाने ओळखले जायचे. हा शब्द ‘जम्बु’ आणि ‘द्वीप’ या २ नावांपासून सिद्ध झाला आहे. ‘जम्बु’ (जांभूळ) आणि ‘द्वीप’ (भूमी), म्हणजे जांभळांच्या वृक्षाची भूमी’, अशी भारताची ओळख होती.
१ आ. आर्यावर्त : ऋग्वेदामध्ये भारतीय उपखंडाला ‘आर्यावर्त’ असे म्हटले जात होते. अनेक पुराणांत या नावाचा उल्लेख आढळतो. प्राचीन काळात आर्य लोकांनी या ठिकाणी स्वतःची वस्ती निर्माण केली. त्यामुळे ते रहात असलेल्या भूमीला ‘आर्यावर्त’ असे म्हटले जात होते. महाभारतामध्येही या नावाचा उल्लेख आढळतो.
१ इ. भारत खंड : भारताला प्राचीन काळी ‘भारत’ खंडही म्हटले जात असे. यामध्ये अफगाणिस्तानपासून बांगलादेशपर्यंतच्या भूमीचा समावेश होता.
१ ई. भारत किंवा भारतवर्ष : आपल्या देशाला ‘भारत’ नाव पडले आहे ते प्राचीन काळातल्या भरत राजावरून ! दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र चक्रवर्ती सम्राट भरत होता. त्याच्या नावावरून ‘उत्तर भारतात रहाणार्या समूहाला भारत’, असे म्हटले जात असे. काही पुराणांत असे म्हटले आहे की, ऋषभदेवचा पुत्र भरत याच्या नावावरून आपल्या देशाला ‘भारत’ असे नाव पडले. ‘भरत किंवा भारत म्हणजे संपूर्ण भारतीय उपखंड’, अशी ओळख होती.
१ उ. हिंदुस्थान : ‘हिंदू’ या शब्दाची उत्पत्ती ही ‘सिंधु’ या नावापासून झाली. अरबी लोकांना सिंधु हे नाव म्हणता येत नव्हते. त्यामुळे त्याचा अपभ्रंश होऊन ते हिंदू असे झाल्याचे सांगितले जाते. पुढे हिंदू हेच नाव प्रचलित झाले. हिंदू ज्या ठिकाणी रहातात ती भूमी, म्हणजे हिंदुस्थान ! हिंदुस्थान हे नाव मोगलांच्या काळात प्रचलित झाले.
१ ऊ. ‘इंडिया’ हे नाव कसे पडले ? : ब्रिटिशांच्या काळात भारताला ‘इंडिया’ असे म्हटले जात असे. प्राचीन हडप्पा-मोहेंजोदडो संस्कृती ही पाश्चिमात्य देशांमध्ये ‘इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन’ (सिंधु खोर्यातील सभ्यता) म्हणून ओळखली जात असे. सिंधु नदीला पाश्चिमात्य लोक ‘इंडस रिव्हर’ म्हणायचे. त्यामुळे या संस्कृतीला त्यांनी ‘इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन’ म्हटले. त्यावरून या देशाला लॅटिन भाषेमध्ये ‘इंडे’ असे म्हटले जात असे. ब्रिटिशांकडून ‘इंडे’ या नावानंतर बोलता बोलता ‘इंडिया’ असे संबोधले जायचे.
२. ‘भारत’ या नावाने आंतरराष्ट्रीय ओळख मिळवण्यासाठी प्रयत्न हवा !
आता इंग्रजीमध्ये असलेल्या ‘इंडिया’ या नावामध्ये पालट केला जाऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. ‘इंडिया’ हे नाव भारताच्या राजपत्रातून कायमचे हद्दपार करून या देशाला फक्त ‘भारत’ या नावाने आंतरराष्ट्रीय ओळख मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो. (संदर्भ : अज्ञात)
संपादकीय भूमिका‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ म्हणण्यासाठी भारतियांना त्याचा इतिहास सांगावा लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! |