पूजेत वापरण्‍यात येणार्‍या विविध वस्‍तूंचे महत्त्व ! Ganeshotsav

सध्‍या चालू असलेल्‍या चातुर्मासाच्‍या निमित्ताने…

कोणतेही शुभ कार्य असो वा कोणत्‍याही देवतेचे पूजन असो, त्‍यामध्‍ये सुपारी, नारळ (श्रीफळ), कलश, अक्षता, पंचारती आदी अनेक वस्‍तूंचा वापर करण्‍यात येतो. या वस्‍तू पूजनामध्‍ये का वापरण्‍यात येतात ? त्‍यांचे महत्त्व आणि कथा काय आहेत ? यांविषयीची माहिती येथे देत आहोत. (Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati) 

१. स्‍वस्‍तिक

‘स्‍वस्‍तिक हे गतिमानतेचे, डावीकडून उजवीकडे चक्राप्रमाणे गती असलेले शुभदर्शक मंगलमय चिन्‍ह आहे. स्‍वस्‍तिकाचा अर्थ आहे क्षेम, मंगल, कुशल, आनंददायक, शुभकारक ! स्‍वस्‍तिकाचे ४ भाग हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष दाखवतात. स्‍वस्‍तिकाचा दुसरा अर्थ कल्‍याणकारक, निसर्गनियमानुसार योगक्षेमाचे पालन, गती, शक्‍ती आणि अभय देणे असा आहे. स्‍वस्‍तिक हे सौभाग्‍य आणि मंगल यांचे प्रतीक आहे.

२. सुपारी

सुपारी हा शब्‍द सु+पारी यापासून सिद्ध झाला आहे, म्‍हणजे चांगला गर असलेले फळ. सुपारीला ‘पुगीफल’ असेही म्‍हणतात. सुपारी ही समृद्धी, मांगल्‍य आणि प्रेमभाव यांचे प्रतीक मानली जाते; म्‍हणून अखंड सुपारीला ‘गणपति’ समजून तिचे पूजन करण्‍यात येते.

सुपारीमध्‍ये पृथ्‍वी आणि आप या तत्त्वांच्‍या कणांचा सुरेख संयोग झालेला असतो. सुपारीतील पृथ्‍वीतत्त्वांचे कण देवतांकडून येणार्‍या चैतन्‍य लहरीतील चैतन्‍यकणांना सुपारीतील आपतत्त्वाचे कण प्रवाही बनवतात. अशा तर्‍हेने सुपारी ही देवतांकडून जीवाकडे येणार्‍या चैतन्‍याच्‍या देवाणघेवाणीतील प्रमुख दुवा बनते.

३. नारळ (श्रीफळ)

नारळाला जरी ‘श्रीफळ’ म्‍हटले जात असले, तरी त्‍याचे प्रथम नाव नारळच आहे. नारळ हे नारदांचे फळ आहे.

३ अ. नारळाविषयीची कथा : नारदांच्‍या ब्रह्मचर्याची इंद्राने एकदा चेष्‍टा केली. ‘अरे नारदा, तू जरी तिन्‍ही लोकात फिरत असला, तरी तू ब्रह्मचारी असल्‍यामुळे तुला पुत्रप्राप्‍ती नाही आणि त्‍यामुळे स्‍त्री तुझ्‍या सान्‍निध्‍यात नसल्‍यामुळे तुझ्‍यापासून स्‍त्रियांना काहीच उपयोग नसल्‍याने त्‍या तुझी हेटाळणी करतील.’’ अशा तर्‍हेने इंद्राने भरदरबारात नारदाची कुचेष्‍टा केली.

नारद ‘नारायण ! नारायण !’, म्‍हणत इंद्राला वंदन करून विष्‍णुदेवांकडे गेले. नारदांनी झालेली हकीकत श्रीविष्‍णूंना कथन केली आणि सांगितले, ‘‘स्‍त्रिया माझी हेटाळणी करणार नाहीत. मला कुठेही जाण्‍यास मोकळीक राहील. ब्रह्मचर्य असूनही माझे शुभाशीर्वाद पुत्रप्राप्‍ती होण्‍यास पात्र असू द्यावेत, म्‍हणजे इंद्राच्‍या हेटाळणीचे परिमार्जन होईल.’’ श्रीविष्‍णु म्‍हणाले, ‘‘तथास्‍तु ! तुला मंत्र देतो. सागर किनार्‍यावर जाऊन त्‍याची साधना कर आणि पहा काय चमत्‍कार होतो !’’

त्‍याप्रमाणे सागर किनार्‍यावर जाऊन नारदांनी विष्‍णूंची प्रार्थना केली आणि मंत्र जपण्‍यास आरंभ केला. मंत्र सिद्ध झाल्‍यावर तेथे एक वृक्षाचे रोपटे निर्माण झाले आणि श्रीविष्‍णु समोर प्रकट झाले आणि म्‍हणाले, ‘‘नारदा ही तुझी उत्‍पत्ती यातून निर्माण होणारे फळ, म्‍हणजे ब्रह्मचर्य असूनही झालेले तुझी पुत्रप्राप्‍ती !’’ ते फळ ज्‍या वृक्षाचे होते, त्‍याचे श्रीविष्‍णूने नामकरण केले नारळाचा वृक्ष ! जो उंच आहे, ज्‍याच्‍या फांद्या सगळीकडे पसरून आपल्‍या खोडाकडे लक्ष देऊन असतात. अशा वृक्षाचे फळ ‘नारळ’ होय. श्रीविष्‍णु म्‍हणाले, ‘‘तुझे हे फळ स्‍त्रियांच्‍या ओटीत घातल्‍याने त्‍यांना पुत्र प्राप्‍ती होईल. ती कशी, तर सशक्‍त ज्‍याचे कवच कठीण आहे, ज्‍याची शेंडी ज्ञानार्जनाकरता उभी आहे. सशक्‍त कवचाप्रमाणे कठीण असले, तरी हृदयात जो रसाळ आहे आणि प्रेमळ आहे, नारळाच्‍या गराप्रमाणे ! ज्‍याच्‍या अंगात धमक आहे, म्‍हणजे पाणी आहे. शक्‍तीचा उपयोग न करता सुस्‍वभाव राहील किंवा नारळाच्‍या पाण्‍याप्रमाणे गोडी राखील, अशा अनेक गुणांचा पुत्र स्‍त्रियांना होईल.’’ श्रीविष्‍णूने नारदाला पुढे सांगितले, ‘‘जो जगाला ज्ञान देतो त्‍या आद्यप्रवर्तक श्री महागणपति याच्‍या पुढे प्रथम ते फळ ठेव, म्‍हणजे ते श्रीफळ जगात संबोधले जाईल.’’

श्री गणेशाला प्रिय असलेले मोदक, त्‍यातही नारळाचेच सारण असते. त्‍याचप्रमाणे मोदकाचा वरचा भागही शेंडीप्रमाणेच असतो.

४. कलश

कलशाच्‍या विशिष्‍ट आकारामुळे आणि कलशामधील हवेच्‍या आकारामुळे हवेच्‍या पोकळीत एक विशिष्‍ट सूक्ष्म नाद उत्‍पन्‍न होतो. सूक्ष्म नादाच्‍या कंपनामुळे ब्रह्मांडातील शिवतत्त्व कलशाकडे आकृष्‍ट होते. त्‍यामुळे कलशातून प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म नादलहरींमुळे जीवाला शिवतत्त्वाचा लाभ अधिक होतो.

५. अक्षता

५ अ. अक्षतांविषयीची पौराणिक कथा : ब्रह्मदेवाने सृष्‍टी निर्माण केल्‍यानंतर दैत्‍यांमधील आसुरी वृत्ती जागी झाली. ते मांस भक्षण करू लागले. त्‍यामुळे सृष्‍टीचा समतोलपणा ढासळू लागल्‍याने ब्रह्मदेवाने ॐकाराचा धावा केला. तेव्‍हा ॐकाराने ब्रह्मदेवाच्‍या ओंजळीत स्‍वतःच्‍या अंशाची बीजे घातली आणि ‘ही भूमीत पेर. तू माझा निस्‍सीम भक्‍त असल्‍यामुळे यातून पुढे जे तृण आणि त्‍यातून जे धान्‍य निर्माण होईल, ते भक्‍त या नावाने प्रसिद्ध पावेल.’ त्‍यानुसार ब्रह्मदेवाने ॐकार अंशाची बीजे भूमीत पेरली. पुढे काही दिवसांनी त्‍यांना लोंब्‍या आल्‍या. लोंब्‍या वाळवण्‍यात आल्‍यावर त्‍यातील धान्‍य -अभग्‍न अ-क्षत दाणे निघाले, ते भक्‍तांनी घेतले. ॐकाराला आवडणारे लाल-तांबडे कुंकू त्‍यात मिसळले आणि अक्षता म्‍हणून ॐकाराला वाहिल्‍या.

यामुळे ॐकार संतुष्‍ट झाला आणि आकाशवाणी झाली, ‘‘हे भक्‍ता, मी संतोष पावलो आहे. यापुढे देवपूजेत अक्षतांचे माहात्‍म्‍य मोठे राहील; कारण साक्षात् ॐकार अंशरूप असलेले हे धान्‍य आहे.’’

५ आ. अक्षतांचे कार्य : अक्षतांमध्‍ये ब्रह्मांडातील ५ देवतांच्‍या (गणपति, श्री दुर्गादेवी, शिव, श्रीराम, श्रीकृष्‍ण) तत्त्वांच्‍या लहरी आकृष्‍ट करण्‍याची, तसेच त्‍या जागृत करून कार्यरत करण्‍यासाठी आणि पृथ्‍वी अन् आप या तत्त्वांच्‍या साहाय्‍याने प्रक्षेपित करण्‍याची क्षमता असते. म्‍हणून अक्षता पूजाविधीतील प्रत्‍येक घटकावर, तसेच देवतेच्‍या मूर्तीवर पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा विधी करतांना अक्षता वहातात आणि सर्वांमधील देवत्‍व जागृत करून त्‍यांना कार्य करण्‍यासाठी आवाहन करतात. पंचोपचार पूजेतील एखाद्या घटकाच्‍या अनुपस्‍थितीत अक्षतांचा वापर केला जातो. अक्षता हे सर्व देवतांच्‍या तत्त्वांना सामावून घेणारे पूजाविधीतील माध्‍यम आहे.

पांढर्‍या रंगाच्‍या अक्षता या वैराग्‍याच्‍या, म्‍हणजे निष्‍काम साधनेच्‍या द्योतक, तर कुंकू लावलेल्‍या लाल रंगाच्‍या अक्षतांकडे आकृष्‍ट होणार्‍या लहरी या सूक्ष्म असतात. गणपति किंवा देवी तत्त्व लाल रंगाकडे लवकर आकृष्‍ट होतात आणि सगुण लहरी खेचून घेण्‍याची क्षमता अधिक असते; म्‍हणून यांच्‍या उपासनेत लाल रंगाच्‍या अक्षता वापरतात.

६. चौरंग

चार बाजूंना, म्‍हणजेच चारही दिशांना असणार्‍या पायांवर विशिष्‍ट आकारात बसवलेली कायम स्‍वरूपाची बैठक म्‍हणजे चौरंग. त्‍याचे ४ कोपरे हे त्‍या देवतांच्‍या चतुरंग सैन्‍याचे म्‍हणजे रथी, अश्‍वदळ, गजदळ आणि पायदळ यांची प्रतिके असतात. शुभकार्यासाठीची पूजा जसे की, सत्‍यविनायक, सत्‍यनारायण इत्‍यादी या चौरंगावर करण्‍यात येतात.

७. पंचारती

सृष्‍टी निर्माण केल्‍यावर ॐकाराने मनुष्‍य प्राणिमात्राचे शरीर पंचमहाभूतांपासून निर्माण केले. पृथ्‍वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांपासून हा देह निर्माण झाला आहे, तो हा या ॐकार गणेशामुळे ! ‘गणेश आम्‍हाला आमच्‍या शरिरापेक्षाही अधिक प्रिय आहे. त्‍यामुळे हे प्रभो, आम्‍ही हा देह तुझ्‍यावरून ओवाळून टाकत आहोत’, याचे प्रतीक म्‍हणजे ५ ज्‍योती ओवाळणे. पूजा झाल्‍यावर निरांजने प्रज्‍वलित करून किंवा ५ पाळ्‍यांचे असलेले एक निरांजन प्रज्‍वलित करून जी आरती करतात, तिला ‘पंंचारती’ म्‍हणतात.

८. पंचमहायज्ञ

‘श्री गणेशाला पंचखाद्य जसे प्रिय आहे, तसेच ५ महायज्ञही प्रिय आहेत’, असे ‘मनुस्‍मृती’त म्‍हटले आहे.

अ. शिष्‍याला अध्‍यापन करणे, हा ब्रह्मयज्ञ.
आ. तर्पण हा पितृयज्ञ.
इ. वैश्‍वदेव हा देवयज्ञ.
ई. बलीप्रदान हा भूतयज्ञ.
उ. अतिथीपूजन हा मनुष्‍ययज्ञ.

या ५ महायज्ञांची प्रतिके, म्‍हणजे पंचखाद्यातील पदार्थ आहेत आणि म्‍हणून ते गणेशाला प्रिय आहेत.

९. पंचखाद्य

खारीक, खोबरे, खसखस, खिसमिस आणि खडीसाखर या ५ पौष्‍टिक पदार्थांचा लाडू गणपतीला प्रिय आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला त्‍याची प्रतिष्‍ठापना झाल्‍यावर त्‍याच्‍या एका दातावर हा पंचखाद्याचा लाडू ठेवतात. गणपति जसा बुद्धीवान आहे, तसा तो बलवानही आहे.

पंचखाद्यातील पाचही पदार्थ ‘ख’ या अक्षराने आरंभ होणारे आहेत. ‘ख’ चा संस्‍कृत भाषेतील अर्थ ‘आकाश’ असा आहे. आकाशाला गवसणी घालणारा आणि त्‍याचा अधिपती असणारा असा हा अतिशय शक्‍तीवान श्री गणेश असून त्‍याला पौष्‍टिक अन् गोड पदार्थ हवाच.

१० पंचामृत

पंचखाद्याच्‍या लाडूप्रमाणे गणेशाला पंचामृताचे सेवन करणे सुद्धा फार प्रिय आहे. गायीचे दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण, म्‍हणजे पंचामृत हेही अतिशय पौष्‍टिक आहे. ५ भाग दूध, ४ भाग तूप, ३ भाग साखर, २ भाग मध, १ भाग दही यांचे मिश्रण, म्‍हणजे गणेशप्रिय ‘पंचामृत’ आहे.

११. दर्शन

दर्शन याचा अर्थ आहे, ‘आपल्‍याच आत्‍मस्‍वरूपाला मंदिरातील देवाच्‍या मूर्तीत सगुण रूपात पहाणे.’ ज्‍या वेळी जीवाला देहातून प्रक्षेपित होणार्‍या भावलहरी त्‍याच्‍या देहाभोवती घनीभूत होतात, त्‍याच वेळी याच भावलहरींतून त्‍याच्‍या भावाप्रमाणे ईश्‍वराचे मूर्तस्‍वरूप साकार होते. यालाच जीवाला झालेले ‘आत्‍मदर्शन’ असे म्‍हणतात. मंदिरात दर्शन घेणे, म्‍हणजेच देवतेच्‍या मूर्तीस्‍वरूपाशी लीन होऊन स्‍वतःतील आत्‍मस्‍वरूप ज्‍योतीला जागृती देणे आणि तिच्‍या माध्‍यमातून स्‍वतःच्‍या देहातील ईश्‍वरस्‍वरूप प्रकट करणे होय !

१२. श्री गणेश दर्शन कसे घ्‍यावे ?

श्री गणेश दर्शन घेतांना उजव्‍या वरदहस्‍ताकडे पाहिल्‍यास गणपतीची सूर्यनाडी जागृत होऊन गणपतीकडून मारक शक्‍तीचे प्रक्षेपण होते. त्‍यामुळे आपल्‍यातील अनिष्‍ट शक्‍तींची शक्‍ती न्‍यून होत जाऊन भक्‍ताची सुषुम्‍ना नाडी कार्यरत होते. सुषुम्‍ना नाडी ही आध्‍यात्मिक उन्‍नतीला पोषक असल्‍याने गणपतीच्‍या मूर्तीतून सात्त्विकता आणि निर्गुणतत्त्व यांचे अधिक प्रमाणात प्रक्षेपण होते. त्‍यामुळे ध्‍यान लागून मन शांत होते, मनाला शांत वाटू लागते आणि वृत्ती अंतर्मुख होत जाते.

१३. देऊळ

‘देऊळ’ हा शब्‍द देवतेच्‍या सगुण रूपाशी, तर ‘देवालय’ हा शब्‍द देवतेच्‍या निर्गुणतत्त्वाशी संबंधित आहे.

(साभार: मासिक ‘वेध गणेशाचा’)

विठोबाला तुळशी वहातात, गणपतीला का नाही ?

गणपतीच्‍या पूजेत गणेशचतुर्थीच्‍या दिवशी, म्‍हणजेच केवळ भाद्रपद शुक्‍ल चतुर्थीला तुळस वापरतात. इतर दिवशी गणपतीच्‍या पूजेत तुळस वापरायची नाही. त्‍याविषयीची कथा मुद़्‍गल पुराणात आहे. धर्मध्‍वज नावाचा राजा होता. त्‍याची गुणवान रूपवान मुलगी वृंदा. श्रीविष्‍णूशीच लग्‍न करण्‍याचा तिचा निश्‍चय होता; परंतु देवाशी विवाह कसा होणार ? तेव्‍हा तिने तपश्‍चर्या केली. तरीही विष्‍णु प्रसन्‍न झाले नाहीत; परंतु तपश्‍चर्या करतांना तिला भागीरथी किनारी गणपतीचे दर्शन झाले. गणेशाला पाहून ती मोहित झाली. ‘ज्‍याच्‍यापासून सर्व देव निर्माण होतात त्‍याच देवाशी विवाह करावा’, असे वृंदेने ठरवले. त्‍या वेळी गणेश ध्‍यान करत होता. वृंदेने त्‍याला हलवले. तेव्‍हा गणेशाचे ध्‍यान मोडले. तेव्‍हा त्‍याने वृंदेला विचारले ,‘‘माते तू कोण? तू माझ्‍या तपश्‍चर्येचा भंग का केलास ?’’

त्‍यावर वृंदेने सारी हकीगत गणेशाला सांगितली. तेव्‍हा गणेश म्‍हणाला, ‘‘हे वृंदे, तू सकाम असा दुसरा पुरुष शोध. मी तर निष्‍काम आहे.’’ तथापि वृंदेने आवेगाच्‍या भरात गणेशाला आलिंगन दिले. तेव्‍हा रागाच्‍या भरात गणेशाने तिला शाप दिला, ‘‘हे दुर्बुद्धी स्‍त्री, तू वृक्षस्‍वरूप होऊन मूढ योनीत पड.’’ वृंदा थरथर कापत होती. ती रडू लागली. तिने गणेशाची क्षमा मागितली. तेव्‍हा तिला उःशाप मिळाला, ‘‘जा वृंदे तुला दुःख होणार नाही. एक असुर तुला पाहील आणि त्‍याच्‍याशी तुझा विवाह होईल. शंभुहस्‍ताने तो दैत्‍य मरेल. त्‍या वेळी तू देहत्‍याग करशील. तू शाप दिलेला महाविष्‍णू शिलारूप घेईल. त्‍याच्‍यासह तुझे जीवन सुखात जाईल. तुळशीवृक्षाच्‍या आवारात तुला पवित्र मानतील. तुझ्‍या काष्‍ठाच्‍या माळा गळ्‍यात धारण करतील. तुझी सर्वजण पूजा करतील; परंतु माझ्‍या पूजेत तू वर्ज्‍य रहाशील.’’ त्‍यानंतर वृंदेने अनेक लक्ष वर्षे तप केले. तेव्‍हा केवळ भाद्रपद शुक्‍ल चतुर्थीच्‍या दिवशी तुळशीपत्र पूजेत स्‍वीकारण्‍यास गजानन सिद्ध झाले.

(साभार: मासिक ‘वेध गणेशाचा’)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.