हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाची राष्ट्रप्रेमी कृती !
मुंबई, २७ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने २० सप्टेंबर या दिवशी ‘जनरल कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चे (‘कॅट’चे) राष्ट्रीय सचिव प्रवीण खंडेलवाल यांची भेट घेऊन त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेवरील ‘हलाल’ या संकटाची माहिती दिली. समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रवीण खंडेलवाल यांच्याशी हलाल प्रमाणपत्राविषयी सविस्तर चर्चा केली.
या वेळी अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ‘कॅट’चे महाराष्ट्राचे महासचिव शंकर ठक्कर, वरिष्ठ अध्यक्ष महेश बखाई, अध्यक्ष सचिन निवगुणे, ‘ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशन’चे राष्ट्रीय महासचिव नितीन केडिया, दादर येथील व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील शहा उपस्थित होते.
‘हलाल’ प्रमाणपत्राविषयी माहिती देतांना सुनील घनवट म्हणाले की,
१. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफ्.एस्.एस्.ए.आय्.) आणि (एफ्.डी.आय्.) या संघटना असतांना ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या खासगी संस्थेद्वारे प्रमाणपत्र देणे, हे घटनाबाह्य आहे.
२. ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ ही संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘इंडियन मुजाहिदीन’, ‘इस्लामिक स्टेट’ आणि तत्सम अनेक आतंकवादी संघटनांशी संबंधित आरोपींचे खटले लढवत आहे. या धर्मांध संघटनेला हलाल प्रमाणपत्र देण्याची अनुमती दिल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होईल.
अशा प्रकारे कोणत्याही खासगी संस्थेला हलाल प्रमाणपत्र देण्याची अनुमती देण्यात येऊ नये. हलाल प्रमाणपत्रातून कमावलेल्या पैशांच्या उपयोग समाजविरोधी, राष्ट्रविरोधी, घटनाबाह्य किंवा सांप्रदायिक कलह यांसाठी होत आहे का ? यावर केंद्रशासनाने लक्ष ठेवावे, अशी मागणी करणारे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन या शिष्टमंडळाने प्रवीण खंडेलवाल यांना दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या मुंबई जिल्हा समन्वयक सौ. जान्हवी भदिर्के आणि श्री. बळवंत पाठक उपस्थित होते.