अमरावती येथील ज्ञानमाता शाळेतील ख्रिस्‍ती शिक्षक कह्यात !

  • अल्‍पवयीन विद्यार्थिनीच्‍या लैंगिक शोषणाच्‍या तक्रारीवरून गुन्‍हा नोंद !

  • समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेच्‍या वतीने प्रशासनाला निवेदन !

अमरावती – शहरातील ज्ञानमाता शाळेत शिकणार्‍या एका अल्‍पवयीन मुलीने मरियम ह्यांड्री जोसेफ हा नेहमी शिक्षक अयोग्‍य पद्धतीने स्‍पर्श करत असल्‍याचे (बॅड टच) पालकांना सांगितले. पालकांनी ११ सप्‍टेंबर या दिवशी मुख्‍याधापक यांना या प्रकरणी तक्रार करून कारवाईची मागणी केली. त्‍यानंतर शाळेच्‍या विशाखा समितीने या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यानंतर शुक्रवारी आरोपी शिक्षकाविरोधात कोतवाली पोलिसात तक्रार प्रविष्‍ट करण्‍यात आली. जोसेफ याच्‍यावर कोतवाली पोलीस ठाण्‍यात कलम ३५४, ८/१२ पोस्‍कोनुसार गुन्‍हा नोंद झाला आहे.  पोलिसांनी त्‍यास रात्रीच कह्यात घेतले आहे.

या शाळेत नेहमीच विद्यार्थ्‍यांनी हिंदु पद्धतीने आचरण करणे, कुंकु किंवा टिकली लावणे, तसेच मेंदी काढणे याविषयी अडचणी आणल्‍या जातात. तसेच नेहमीच लैंगिक शोषणाच्‍या अशा घटना घडत असल्‍याचे वैयक्‍तिकरित्‍या बोलले जाते; परंतु शाळा प्रशासनाकडून याविषयी आवश्‍यक कारवाई झाल्‍याचे लक्षात येत नाही. तसेच पालकांना मुलांच्‍या शिक्षणाची काळजी असल्‍याने पालकांकडून पोलिसात तक्रार करण्‍याचे प्रयत्न केले जात नाहीत. यामुळे असे प्रकार बाहेर उघडकीस येत नाहीत. तसेच मुलांच्‍या आजारपणात त्‍यांना पाणी लावून कथित बरे करण्‍याचे प्रकारही केले जात असल्‍याची माहिती आहे. तरी याची पूर्ण चौकशी करून संबंधित शाळा प्रशासनावर योग्‍य ती कारवाई करण्‍यात यावी, अशा मागणीचे निवेदन समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेच्‍या वतीने जिल्‍हाधिकार्‍यांना देण्‍यात आले.

यामध्‍ये अशा शिक्षकांचे कायमस्‍वरूपी निलंबन करावे, हिंदु संस्‍कृतीचे आचरण करण्‍यास अडचणी आणणार्‍या शाळा प्रशासनास बोलावून त्‍याविषयीच्‍या सूचना द्याव्‍यात, पालक आणि विद्यार्थी यांच्‍या सहभागाने समिती नेमावी, अशा मागण्‍या या निवेदनात करण्‍यात आल्‍या आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदूंना धर्माचरणास प्रतिबंध करणार्‍या, तसेच विद्यार्थिनींचे शोषण करणार्‍या शाळांवर प्रशासन काय कारवाई करणार आहे ?