कुलूप तोडून कामकाजास प्रारंभ
सातारा, २६ सप्टेंबर (वार्ता.) – खटाव तालुक्यातील वडूज येथील तहसील कार्यालयातील एका खोलीची चावी हरवली होती. त्यामुळे ३ विभागांचे शासकीय कामकाज जवळपास ३ घंटे बंद राहिले. दुपारी १२.३० वाजेपर्यंत चावी न सापडल्यामुळे शेवटी कुलूप तोडून कामकाजास प्रारंभ करण्यात आला.
गौरी भोजन, शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्या आल्याने २५ सप्टेंबर या दिवशी वडूज तहसील कार्यालयामध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. कार्यालयातील एका खोलीत आवक-जावक, रोजगार हमी योजना आणि पुनर्वसन अशा ३ विभागांचे कामकाज चालते; मात्र दोन घंटे झाले, तरी कार्यालयाचे कुलूप उघडले नसल्यामुळे नागरिक वैतागले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास प्रारंभ केला. या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी दुसर्या विभागामध्ये जाऊन नागरिकांची कामे करण्याचा प्रयत्न करत होते; मात्र शासकीय कामकाजाशी संबंधित साहित्य, कागदपत्रे त्याच खोलीत असल्यामुळे कामात अडचणी येत होत्या. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी यांनी संबंधित अधिकार्यांची अनुमती घेऊन दुपारी १२.३० वाजता कार्यालयाचे कुलूप तोडले. यानंतर शासकीय कामकाजास प्रारंभ झाला.
संपादकीय भूमिकाकार्यालयातील एका खोलीची चावीही नीट न सांभाळणारे प्रशासन जिल्ह्याचा कारभार कसा करत असेल ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? |