आम्ही चीनच्या जहाजाला बंदरावर थांबण्याची अनुमती दिलेली नाही !

श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली माहिती !

कोलंबो (श्रीलंका) – माझ्या माहितीनुसार आम्ही चिनी जहाजाला आमच्या देशात येण्याची अनुमती दिलेली नाही. या जहाजावरून भारतीय सुरक्षायंत्रणांनी चिंता व्यक्त केली होती. ती योग्यही होती आणि आमच्यासाठी महत्त्वाचीही होती. आम्ही नेहमीच म्हटले आहे की, आम्हाला आमचे क्षेत्र सुरक्षित ठेवायचे आहेे, अशी माहिती श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली सब्री यांनी दिली. चीनचे जहाज हेरगिरी करण्याच्या उद्देशाने श्रीलंकेच्या बंदरावर येणार असल्याने भारताने अनुमती देण्यास विरोध केला होता.

श्रीलंकेने या जहाजाला त्याच्या बंदरावर थांबण्याची अनुमती दिल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते; मात्र आता अधिकृतपणे श्रीलंकेने चीनच्या जहाजाला अनुमती दिली नसल्याचे सांगितले. चीनचे ‘शिन यान ६’ हे जहाज ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेच्या बंदरावर पुढील ३ मास थांबणार होते. गेल्या वर्षी श्रीलंकेने चीनच्या हेरगिरी करणार्‍या जहाजाला त्याच्या बंदरावर थांबण्याची अनुमती दिली होती.