कावेरी नदीच्या वादावरून शेतकर्‍यांकडून बेंगळुरू बंदचे आंदोलन

बेंगळुरू (कर्नाटक) – कावेरी नदीच्या वादावरून शेतकर्‍यांनी २६ सप्टेंबर या दिवशी बंद पाळला. कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने १३ सप्टेंबर या दिवशी तमिळनाडूला कावेरी नदीतून १५ दिवसांसाठी ५ सहस्र क्युसेक पाणी सोडण्याचा आदेश दिला होता. या आदेशाच्या निषेधार्थ शेतकरी संघटना, कन्नड संघटना आणि विरोधी पक्ष यांनी हा बंद पाळला होता. बंदच्या काळात शहरातील शाळा, महाविद्यालये, दुकाने आणि उपाहारगृहे बंद होते. शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. बंदच्या काळात तमिळनाडू-कर्नाटक सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. दुसरीकडे कन्नड समर्थक संघटनांनी २९ सप्टेंबर या दिवशी राज्यबंदची घोषणा केली आहे.

काय आहे कावेरी वाद?

कावेरी नदी कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावते. ती तमिळनाडूतून वहात बंगालच्या उपसागराला मिळते. कावेरी खोर्‍यात कर्नाटकचे ३२ सहस्र चौरस किलोमीटर आणि तमिळनाडूचे ४४ सहस्र चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. कावेरीच्या पाण्याच्या सिंचनाच्या आवश्यकतेवरून या राज्यांमध्ये १४० वर्षांहून अधिक काळ वाद आहे.