मुंबईत सार्वजनिक प्रसाधनगृहांत ‘सॅनिटरी नॅपकिन’ची २०० यंत्रे बसवली

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – शहर आणि उपनगरे येथील १३ प्रशासकीय विभागांतील प्राधान्याने झोपडपट्ट्यांच्या परिसरातील सार्वजनिक प्रसाधनगृहांत ‘सॅनिटरी नॅपकिन’ माफक दरात उपलब्ध करून देणारी २०० यंत्रे बसवण्यात आली आहेत.

या यंत्रात वापरलेल्या सॅनिटरी पॅडची व्हिलेवाट लावण्याची सोयही उपलब्ध आहे. नॅपकिन इन्सिनरेटरमध्ये दुहेरी दहन कक्षाची व्यवस्था आहे. एका कक्षामध्ये दहन आणि दुसर्‍या कक्षामध्ये किमान ९५० अंश सेल्सिअस तापमानावर त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे कोणतेही घातक वायू वातावरणात सोडले जात नाहीत.

मासिक पाळी आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थापनासाठी, जागतिक आरोग्य संघटनेच्या स्वच्छता योजनेच्या अनुषंगाने पालिकेने प्रत्येक प्रभागात ‘कॉम्बो सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग-इन्सिनेरेटर मशिन’ बसवण्याचा उपक्रम चालू केला आहे. या यंत्रांचे प्रचालन आणि त्यामध्ये नॅपकिनचा वेळोवेळी भरणा करण्याची कार्यवाही कंत्राटदाराच्या कर्मचार्‍यांकडून केली जात आहे. या यंत्रांचा वापर, कार्यक्षमता आणि प्रचालन याचा नियमित आढावा घेतला जात आहे. या प्रकल्पांमुळे पर्यावरणाची हानी टाळता येणार आहे. याविषयीची माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी दिली.