येरवडा कारागृह प्रशासनाला बंदीवानाने २६ लाखांहून अधिक रुपयांना फसवले !

पुणे – येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानाने कारागृहातील अधिकार्‍याची खोटी स्वाक्षरी करून ‘मनीऑर्डर’ पुस्तिकेमध्ये फेरफार करून २६ लाख ६९ सहस्र ९११ रुपयांची फेरफार करून फसवणूक केली आहे. (शिक्षा भोगत असलेला बंदीवान एवढ्या रकमेची फसवणूक करत असतांना कारागृह प्रशासनास लक्षात कसे आले नाही ? शिक्षा भोगत असलेला बंदीवान पुन्हा गुन्हे करण्यास प्रवृत्त होतो, यातून त्याची गुन्हेगारी वृत्ती नष्ट करण्यासाठी शिक्षेसह त्याला धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता लक्षात येते. – संपादक) मनीऑर्डर आलेली नसतांना त्याने पैसे जमा आहेत, असे दाखवून ते पैसे कारागृहातील उपाहारगृहामध्ये खाद्यपदार्थ आणि कपडे या गोष्टींवर व्यय केले. सचिन फुलसुंदर असे बंदीवानाचे नाव असून कारागृह अधिकारी बाबुराव मोटे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदवली आहे. फुलसुंदरवर बलात्कार, तसेच हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी वर्ष २००६ मध्ये गुन्हा नोंद असून न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कारखाना विभागात सिद्ध होणार्‍या वस्तू बाहेर विक्रीसाठी पाठवण्याचा बहाणा करून फुलसुंदरने कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा विश्‍वास संपादन केला. त्या आधारे त्यानेही फसवणूक केली आहे. फुलसुंदरने मनीऑर्डर आलेली नसतांना स्वतःच्या आणि इतर बंदीवानांच्या नावे पैसे आले आहेत, अशी बनावट नोंद पुस्तिकेमध्ये करून अपहार केला. अशा घटना घडू नयेत, यासाठी कारागृह प्रशासनाने मनीऑर्डर विभागासाठी सक्षम अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे, तसेच आता सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने होणार आहेत, अशी माहिती कारागृह प्रशासनाने दिली. (उशिरा सुचलेले शहाणपण ! – संपादक)

संपादकीय भूमिका

गुन्हा घडू नये यासाठी आधीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.