यावर्षी देशातील ६ सहस्र ५०० कोट्यधीश भारत सोडून विदेशात स्थयिक होणार !

नवी देहली – ‘हेनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट २०२३’ या अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०२३ मध्ये कोट्यवधी रुपयांचे वार्षिक उत्पन्न असणारे ६ सहस्र ५०० नागरिक देश सोडू शकतात. वर्ष २०२२ मध्ये अशा ७ सहस्र लोकांनी भारताचा त्याग केला होता.

केवळ भारतच नव्हे, तर चीनमधूनही मोठ्या संख्येने नागरिक इतर देशांमध्ये जाणार आहेत. चीन या सूचीमध्ये पहिल्या क्रमांकावर, तर भारत दुसर्‍या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात येत आहे. जगभरातील श्रीमंतांनी ऑस्ट्रेलिया, दुबई आणि सिंगापूर या देशांना पसंती दिली आहे. ऑस्ट्रेलियातील हवामान, तेथील समुद्रकिनारे, तेथे असणार्‍या संरक्षणात्मक सुविधा, उत्तमोत्तम आरोग्य सुविधा, उच्च रहाणीमान, सुधारित शिक्षणव्यवस्था, सोपी कररचना आणि भक्कम अर्थव्यवस्था या कारणांमुळं भारतियांसह इतर देशांतील नागरिकही ऑस्ट्रेलियालाच पसंती देतांना दिसत आहेत.

काय आहे कारण ?

भारतात करप्रणाली आणि त्याच्याशी संबंधित नियमांमध्ये सुसूत्रतेचा अभाव असल्याने श्रीमंत नागरिक देशाबाहेर जात आहेत. व्यवसायासाठी परदेशात चांगल्या संधी, परदेशातील जागतिक दर्जाचे व्यवस्थापन आणि प्रशासकीय कारभारात असणारी सुसूत्रता, हीसुद्धा यामागील कारणे आहेत.

संपादकीय भूमिका

  • हातात पैसा आल्यावर विदेशातील चांगले रहाणीमान उपभोगण्यासाठी देश सोडणारे कृतघ्नच होत !
  • जनतेला सोयीसुविधा देऊन त्यांचे रहाणीमान उंचावू न शकणारे देशातील आतापर्यंतचे शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत !