उत्तराखंडच्या नैनितालची भूमीही खचू लागल्याने २५० घरे केली जात आहेत रिकामी !

१० सहस्र लोकांवर संकट

नैनिताल (डेहराडून) – उत्तराखंडच्या जोशी मठ भागामध्ये भूस्खलनामुळे घरांना भेगा पडत असल्याने तेथील लोकांना स्थलांतरित करण्याच्या घटनेनंतर आता राज्यातील नैनिताल येथील भूमीही खचत असल्याचे समोर आले आहे. येथील आल्मा डोंगरावरील ४ घरे खचल्यामुळे कोसळली. प्रशासनाने तातडीने येथील २५० घरांतील सदस्यांना ती रिकामी करण्याची सूचना दिली आहे. येथील लोकांना यासाठी ३ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

आल्मा सर्वांत संवेदशील पर्वत क्षेत्र आहे. येथे वास्तव्याला असलेल्या १० सहस्र लोकांवर संकट वाढू लागले आहे. भूगर्भ शास्त्रज्ञ प्रा. सी.सी. पंत म्हणाले की, नैनितालची भौगोलिक रचना इतर डोंगरी शहरांपेक्षा वेगळी आहे. भौगोलिक हालचालींमुळे डोंगर दुर्बल होत आहेत. भूस्खलनाचे प्रमाण वाढत आहे. येथे जोशी मठापेक्षा मोठे संकट ओढवू शकते. गेल्या २० वर्षांत या डोंगरावर प्रचंड बांधकामे झाली. वास्तविक हा डोंगर पायथ्याशी भुसभुशीत आहे. संशोधकांनी अनेकवेळा याविषयीची चेतावणीही दिली; मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आजही बांधकामे चालू आहेत.

वर्ष १८८० मध्ये झालेल्या भूस्खलनात १५१ लोक पडले होते मृत्यूमुखी

इंग्रजांच्या राजवटीत वर्ष १८८० मध्ये या डोंगरावर मोठे भूस्खलन झाले. त्यात १५१ जण मृत्यूमुखी पडले होते. दुर्घटनेनंतर इंग्रजांनी डोंगरावरील बांधकामास बंदी घातली होती. आज याच डोंगरावर १० सहस्रांवर लोकवस्ती आहे.