नेपाळमधून सोन्याची तस्करी करणार्‍या चिनी लोकांकडे सापडले भारतीय आधारकार्ड !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमधून भारतात ६१ किलो सोन्याची तस्करी करतांना पकडलेल्या ६ चिनी लोकांकडे भारतीय आधारकार्ड असल्याचे आढळून आले आहे. या तस्करांनी भारतात सोने पोचवण्यासाठी स्वत:ला नेपाळी असल्याचे दाखवण्यासाठी येथील नागरिकत्वाची कागदपत्रेही बनवली होती.

१. काठमांडूचे माजी पोलीस महासंचालक हेमंत मल्ला म्हणाले की, भारतात नेपाळमार्गे  सोन्याची तस्करी केली जाते. दुबई आणि हाँगकाँग येथून मोटारसायकलच्या पार्ट्समध्ये लपवलेले सोने हवाई मार्गाने नेपाळला पोचते. चिनी तस्कर ते मिळवतात आणि हस्तक सीमेवरून ते सोने भारतात घेऊन जातात. सीमेवर कसलीही तपासणी झाली, तरी ते कधी नेपाळी, तर कधी भारतीय असल्याचे भासवून आधारकार्ड दाखवून पळून जातात. एकाच वेळी तब्बल ८८ किलो सोने हस्तगत करण्यात अधिकार्‍यांना यश आले आहे. हा संपूर्ण व्यवसायाचा केवळ एक कण आहे. एका आर्थिक वर्षातच २ क्विंटल सोने जप्त केले जाते.

२. नेपाळ पोलिसांच्या म्हणण्यानुसार, भारतीय नागरिकांना विशेषत: महिलांना विनामूल्य तीर्थयात्रेचे आमिष दाखवून येथे आणले जाते. पूजेनंतर ‘कचोरा’ (सोन्याची वाटी) आणि ‘अंकोरा’ (पाण्याचे भांडे) भेट दिल्याचे दाखवले जाते. सोन्याच्या या भांड्यांवर पितळेचा आणि तांब्याच्या पाण्याचा लेप लावला जातो, जेणेकरून कुणालाही शंका येऊ नये.

संपादकीय भूमिका 

बनावट आधारकार्ड, मतदान ओळखपत्रे आणि अन्य सरकारी कागदपत्रे बनवून देणार्‍यांनाही आता फाशीची शिक्षा होणारा कायदा बनवण्याची आवश्यकता आहे !