छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे काम अंतिम टप्‍प्‍यात ! – तेजस गर्गे

सातारा, २४ सप्‍टेंबर (वार्ता.) – सातारावासियांचे ऐतिहासिक अस्‍मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि त्‍याच्‍या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्‍प्‍यात आले आहे. आतापर्यंत दालनाचे अद्ययावतीकरण आणि रंगरंगोटीचे काम ८० टक्‍के पूर्ण झाले आहे. जानेवारी २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होऊन संग्रहालय सातारावासियांच्‍या सेवेत रुजू होईल, असा विश्‍वास पुरातत्‍व विभागाचे प्रमुख संचालक तेजस गर्गे यांनी व्‍यक्‍त केला.

गर्गे यांनी नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची पहाणी करून संबंधित वास्‍तूविशारद आणि बांधकाम विभाग यांना उत्तम प्रतीचे काम करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या. या वेळी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे, माझी उपनगराध्‍यक्ष सुहास राजे शिर्के आणि इतर मान्‍यवर उपस्‍थित होते.

कोरोना महामारीच्‍या काळामध्‍ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची वास्‍तू ‘जम्‍बो कोविड सेंटर’साठी उपयोगात आणली गेली. यामुळे वस्‍तूसंग्रहालयाचे काम २ वर्षे रखडले होते. वर्ष २०२१ मधील अर्थसंकल्‍पात वस्‍तूसंग्रहालयासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद करण्‍यात आली होती. अनेक वेळा पाठपुरावा घेतल्‍यानंतर ऑगस्‍ट २०२२ मध्‍ये ही वास्‍तू पुन्‍हा वस्‍तूसंग्रहालयाकडे हस्‍तांतरित करण्‍यात आली. यानंतर कामाला वेग आला. प्रत्‍येक मजल्‍यावरील आकर्षक कलादालन, दर्शनी भाग यांमध्‍ये ऐतिहासिक प्रसंगांचे आरेखन, तसेच वाहनतळ, स्‍वच्‍छतागृह, तिकीटगृह, सर्व ऐतिहासिक वास्‍तू सुरक्षितपणे ठेवण्‍यासाठी काचेची स्‍वतंत्र दालने, दिशादर्शक पाट्या, पुरेशी विद्युत् व्‍यवस्‍था, योग्‍य ठिकाणी सीसीटीव्‍ही कॅमेरे इत्‍यादी सुविधा इमारतीमध्‍ये उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत.