स्वधर्मे निधनं श्रेय: । (गीता अध्याय ३ श्‍लोक ३५)

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

पू. अनंत आठवले

भगवान् श्रीकृष्णांनी गीतेच्या अध्याय ३ श्‍लोक ३५ मध्ये म्हटले आहे की ‘नीट आचरलेल्या परधर्मापेक्षा स्वत:चा धर्म गुणहीन असला तरी श्रेयस्कर आहे. स्वत:च्या धर्मात मरणे श्रेयस्कर आहे, परधर्म भीतीप्रद असतो’. ह्यावरून ‘हे धर्मांतराविषयी सांगितलेले आहे आणि त्याचा अर्थ सनातनधर्मियांनी परधर्म स्वीकारू नये, त्यापेक्षा आपल्या धर्मातच मरणे अधिक कल्याणकारी आहे’, असा काही जणांचा अपसमज झाल्याचे आढळले आहे.

भगवान् श्रीकृष्णांच्या काळी केवळ एकमेव धर्म होता ज्याला आता आपण सनातन धर्म किंवा वैदिक धर्म किंवा हिंदू धर्म म्हणतो. इतर कोणतेही धर्म अस्तित्वात नव्हते; म्हणून भगवान् श्रीकृष्ण जेव्हा ‘दुसर्‍या  धमार्र्विषयी’ बोलतात तेव्हा त्याचा अर्थ वेगळा आहे, हे उघड आहे. धर्म ह्या विषयावर आधीच एक विस्तृत लेख सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झाला आहे, तेव्हा पुनरावृत्ती नको. पण धर्म म्हणजे मुख्यत: आचरणाचे, वागण्याचे नियम. इथे भगवान् श्रीकृष्ण वर्णाश्रमधर्माविषयी सांगत आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ह्या चार वर्णांपैकी प्रत्येक वर्णाचे आचरण म्हणजे कर्म वेगवेगळे असते आणि ती कर्मे भगवान् श्रीकृष्णांनी गीता अध्याय १८, श्‍लोक ४२ ते ४४ मध्ये सांगितली आहेत. अर्जुन अध्याय २, श्‍लोक ५ मध्ये ‘गुरुजनांना मारण्यापेक्षा ह्या जगात भिक्षा मागून अन्न खाणे श्रेयस्कर आहे’ असे म्हणतो. अर्जुन क्षत्रिय होता. आता भिक्षा मागणे हा क्षत्रियांचा नाही, तर ब्राह्मणांचा धर्म आहे. समर्थ रामदासस्वामींनी दासबोधात ‘ब्राह्मणाची मुख्य दीक्षा । मागितली पाहिजे भिक्षा । १४-२-१’ असे सांगितले आहे. धर्मशास्त्रसुद्धा सांगते की ‘अध्ययन – अध्यापन, यजन – याजन, दान – प्रतिग्रह’(स्वत: शिकणे – दुसर्‍यांना शिकवणे, स्वत: पूजा, यज्ञ इत्यादी करणे – पौरोहित्य करून दुसर्‍यांकडून करवणे, दान देणे – दान घेणे) हे ब्राह्मणांचे कर्म आहे. आता भिक्षा घेणे हे दुसर्‍यांच्या म्हणजे ब्राह्मणांच्या वर्णाश्रमधर्माचे काम करायला अर्जुन प्रवृत्त होऊ इच्छित होता. अशा प्रकारे दुसर्‍यांच्या धर्माचा अंगीकार करण्यापेक्षा स्वत:च्या धर्मात (युद्धामध्ये) मरणे इष्ट आहे, हे इथे भगवान् श्रीकृष्णांचे प्रतिपादन आहे. अर्जुन अनेक कारणे सांगून युद्धापासून पळवाट शोधत होता. भगवान् श्रीकृष्ण ‘क्षत्रियांचा स्वाभाविक धर्म ‘युद्धे चाप्यपलायनम्’ अर्थात् युद्धातून पळून न जाणे, हा आहे (गीता अध्याय १८, श्‍लोक ४३)’ असे सांगून त्याचे पालन करण्यास सांगतात. वर्णाश्रमधर्मालाच गीतेत स्वाभाविक कर्म, सहज कर्म, नियत कर्म, स्वभावज कर्म इत्यादी म्हटले आहे.

भगवान् श्रीकृष्णांनी अध्याय १८, श्‍लोक ४७ मध्ये असेही सांगितले आहे ‘दुसर्‍याच्या धर्माचे चांगल्या प्रकारे आचरण करण्यापेक्षा आपला स्वधर्म गुणहीन असला तरी तो श्रेयस्कर असतो. स्वभावाने निश्‍चित झालेले कर्म करताना पाप लागत नाही’. आता पूर्वीसारखे वर्ण आणि आश्रम जवळ जवळ राहिले नाहीत, तरी नव्या व्यवस्थेतसुद्धा भगवान् श्रीकृष्णांचे कथन लागू आहे, हे उदाहरणांनी स्पष्ट होईल. न्यायाधीश अपराध्याला मृत्यूदंड ठरवतो आणि वधिक (जल्लाद) फाशी देतो. त्या दोघांनाही हत्येचे पाप लागत नाही, कारण ते आपले स्वाभाविक कर्म करीत असतात. आणखी एक उदाहरण. दोन देशांच्या सैन्यामध्ये लढाई होते. ते एकमेकांचे सैनिक मारतात, तरीही सैनिकांना हत्येचे पाप लागत नाही, कारण ते आपले नियत कर्म करत असतात. तेव्हां स्वजनांच्या हत्येने पाप लागेल असा अर्जुनाचा आक्षेपसुद्धा भगवान् श्रीकृष्णांनी क्षात्रधर्माच्या आधारावर फेटाळला आहे.

अनंत आठवले

०७.९.२०२३

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

पू. अनंत आठवले यांच्या लिखाणातील चैतन्य न्यून न होण्यासाठी घेतलेली काळजी

लेखक पूजनीय अनंत आठवले (पूजनीय भाऊकाका) हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत.