पाकिस्तानने अनधिकृतरित्या कह्यात घेतलेली भारताची भूमी रिकामी करावी !

भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकच्या काळजीवाहू पंतप्रधानांना सुनावले !

डावीकडून पेतल गेहलोत आणि अन्वर-उल्-हक कक्कर

न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्तानने आतंकवादाच्या विरोधात कारवाई करावी आणि सीमेवर आतंकवादाला प्रोत्साहन देणे थांबवावे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांच्या मानवी हक्कांचे होणारे उल्लंघन थांबले पाहिजे. पाकने सर्वप्रथम अनधिकृतपणे कह्यात घेतलेले क्षेत्र (पाकव्याप्त काश्मीर) रिकामे करावे. तसेच २६/११ च्या मुंबईवरील आक्रमणातील दोषींवर कारवाई करावी, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल्-हक कक्कर यांना संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सुनावले. पंतप्रधान कक्कर यांनी महासभेत काश्मीरचे सूत्र उपस्थित केल्यानंतर भारताने त्यांना सुनावले.

कक्कर यांना प्रत्युत्तर देतांना संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी पेतल गेहलोत म्हणाल्या की, पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या मंचाचा अपवापर करण्याची सवय झाली आहे. भारताविषयी मूर्खपणाचा आणि खोटा प्रचार करण्यासाठी तो सतत याचा वापर करतो. भारताने पाकिस्तानला त्यांच्या देशातील आतंकवाद आधी संपवावा, असे वारंवार सांगितले आहे.

काय म्हणाले होते पाकचे काळजीवाहू पंतप्रधान कक्कर ?

पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल्-हक कक्कर यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करतांना म्हटले होते की, आम्हाला आमच्या सर्व शेजार्‍यांशी शांततापूर्ण संबंध हवे आहेत. भारतासमवेतच्या चांगल्या संबंधांचे मुख्य सूत्र काश्मीर आहे आणि विकासासाठी शांतता आवश्यक आहे. भारताने महासभेच्या ठरावाचेही पालन केले नाही, ज्या अंतर्गत संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली जम्मू-काश्मीरमध्ये सार्वमत घेऊन अंतिम निर्णय घ्यायचा आहे. ऑगस्ट २०१९ पासून भारताने अनधिकृतपणे व्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये अनुमाने ९ लाख सैनिक तैनात केले आहेत, जेणेकरून तो काश्मीरवर स्वतःचा निर्णय लादू शकेल.