अथर्वशीर्षाचे पठण करा, सर्व संकटे दूर होतील ! : वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे गोमंतकियांना आवाहन

फोंडा, २२ सप्टेंबर (वार्ता.) : श्री गणेशचतुर्थी हा चेतना आणि स्फूर्ती निर्माण करणारा, तसेच भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा पारंपरिक उत्सव आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव भक्तीभावाने साजरा केला जातो. या काळात प्रत्येक भक्ताने घराघरातून अथर्वशीर्षाचे पठण करणे आवश्यक आहे. संकटनाशक स्तोत्र, श्री गणेश मंत्र अथवा नामस्मरण प्रतिदिन केल्यास त्याचे योग्य आणि अपेक्षित फळ निश्‍चित प्राप्त होते. सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करणार्‍या श्री गणेशचतुर्थी उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन वीजमंत्री तथा मगो पक्षाचे नेते श्री. सुदिन ढवळीकर यांनी केले.

(सौजन्य : In Goa 24×7) 

मंत्री श्री. सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले,

‘‘अथर्वशीर्षाचे पठण केल्यास नकारात्मक शक्ती लोप पावून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दूर्वा वाहून एक सहस्र आवर्तने केल्यास त्याचे फळ प्राप्त होते. ‘संकटनाशक स्त्रोत्राचे पठण केल्यास मनुष्यावरील संकट दूर होते’, असे पुराणात गणकऋषि यांनी अथर्वशीर्ष लिहितांना स्पष्ट केले आहे. आपण श्री गणपतीकडे निसर्गदेवता म्हणून पहातो. त्या निमित्ताने निसर्गाचे पूजन होते. माटोळीच्या माध्यमातून अनेक फळे आणि वनस्पती यांचा माणसाला परिचय होतो. ६४ कला, शक्ती, विद्या आणि बुद्धी यांचा दाता असलेला श्री गणेश मनुष्याच्या जीवनाला दिशा देतो. गणेशोत्सव हा असा उत्सव आहे, ज्या वेळी गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येक जण श्रींच्या आगमनासाठी आपल्यापरीने स्वतःचे घर सजवत असतो. सनातन संस्कृतीमध्ये श्री गणेशाचे स्थान हे अग्रक्रमाचे आहे. कामाच्या निमित्ताने विखुरलेल्यांना एकत्र आणण्याचे काम गणेशोत्सव करतो. आमच्या ढवळीकर कुटुंबातील सर्व मंडळी एकत्रित बसून श्री गणेशाची आराधना करतात आणि महिमा गातात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गोमंतकियांची सर्व दु:खे आणि समस्या दूर होऊ देत, ही प्रार्थना आहे.’’