काँग्रेसला हिंदूंचा आदर करावाच लागेल, अन्यथा हिशेब चुकता करू ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

आसामचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची काँग्रेसला चेतावणी !

हिमंत बिस्व सरमा

जोधपूर (राजस्थान) – काँग्रेसला भारतात राजकारण करायचे असेल, तर तिला हिंदूंचा आदर करावा लागेल. अन्यथा आम्ही तिचा हिशेब चुुकता करून टाकू. देशाच्या कानाकोपर्‍यांत तिचा हिशेब करण्याची वेळ आली आहे आणि आपल्याला निवडणुकीत हे करायचे आहे. राजस्थान ही विरांची भूमी आहे. त्यामुळे सनातन हिंदूंना त्यापासून वेगळे करता येणार नाही, असे विधान आसामचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी येथे भाजपच्या परिवर्तन यात्रेच्या वेळी झालेल्या सभेत केले. ‘मुसलमानांविषयी कुणी बोलले की, काँग्रेस लगेच स्पष्टीकरण देते, ख्रिस्त्यांविषयी कुणी बोलले की, संबंधितांना समजावले जाते; पण जेव्हा हिंदूंविषयी कुणी बोलले, तर काँग्रेसवाले काहीच बोलत नाहीत’, असेही मुख्यमंत्री सरमा म्हणाले.

गेहलोत, हिंदुत्व रोखणारे तुम्ही कोण ?

हिंदुत्वाच्या सूत्रावरून मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, राजस्थानमध्ये आल्यावर गेहलोत (राजस्थानचे मुख्यमंत्री) म्हणाले होते, ‘येथे हिंदुत्वावर राजकारण होणार नाही.’ मग मी म्हणतो, ‘गेहलोत, हिंदुत्व रोखणारे तुम्ही कोण? ५ सहस्र वर्षांपूर्वी भारत हिंदु होता, आताही हिंदु आहे आणि पुढेही हिंदुच रहाणार. तुम्ही काहीही करू शकत नाही. ज्यांनी हिंदूंना रोखण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी लढावे लागले. ‘भारतात हिंदूंवर अन्याय करून जगणे तुम्हाला शक्य नाही’, हे समजून घ्या.’

कन्हैयालाल यांच्या हत्येसारखी घटना आसाममध्ये घडली असती, तर ५ मिनिटांत हिशेब चुकता केला असता !

मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, उदयपूर येथे कन्हैयालाल यांच्या शिरच्छेदासारखी घटना आसाममध्ये घडली असती, तर आम्ही ५ मिनिटांत हिशेब चुकता केला असता; मात्र राजस्थानमध्ये पीडित हिंदु कुटुंबाची काळजीही घेतली जात नाही.

गांधी कुटुंबाला चंद्रावर पाठवल्यास सर्व समस्या संपतील !

गांधी कुटुंबावर टीका करतांना मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, नरेंद्र मोदी केंद्रात येईपर्यंत बाबर अयोध्येत जिवंत होता, मोदी आले आणि बाबर नष्ट झाला. आसाम आणि उत्तरप्रदेश राज्यांत भाजपचे सरकार आल्यापासून बाबर आणि औरंगजेब यांना एका जागेवर ठेवले आहे आणि एक इंचही हलू दिलेलेे नाही. (या राज्यांत हिंदुविरोधी कारवाया थांबल्या आहेत, असे सरमा यांना म्हणायचे आहे.) कधी कधी मी विचार करतो की, मोदीजींना सांगावे की, एक मोठे चंद्रयान बनवून गांधी कुटुंबाला चंद्रावर पाठवून द्या. यामुळे आपल्या देशातील सर्व समस्या एकाच वेळी संपतील.