काँग्रेसनेच राजकीय लाभासाठी खलिस्तानचे सूत्र पुढे आणले ! – जी.बी.एस्. सिद्दू, ‘रॉ’चे माजी अधिकारी

‘रॉ’चे माजी अधिकारी जी.बी.एस्. सिद्दू यांचा गंभीर आरोप !

नवी देहली – पंजाबमधील हिंदूंना घाबरवण्यासाठी काँग्रेसने खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याला समोर आणले होते. खलिस्तानचे सूत्र काँग्रेसनेच राजकीय लाभासाठी पुढे आणले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी, ग्यानी झैलसिंह आणि कमलनाथ हे भिंद्रनवाले याला पैसे पाठवत होते, अशी माहिती भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’चे (‘रिचर्स अँड अ‍ॅनलिसीस विंग’चे) माजी अधिकारी जी.बी.एस्. सिद्दू यांनी ए.एन्.आय. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. खलिस्तानवरून भारत आणि कॅनडा यांच्यात चालू असलेल्या वादावरून सिद्दू यांची मुलाखत घेण्यात आली होती.

(सौजन्य : वनइंडिया न्यूज) 

जी.बी.एस्. सिद्दू यांनी मुलाखतीत सांगितलेली सूत्रे –

अकाली दल आणि जनता पार्टी यांची युती तोडण्याचा काँग्रेसने केला होता प्रयत्न !

आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा पराजय झाला होता. यानंतर ग्यानी झैलसिंह यांनी पंजाबमध्ये अकाली दल आणि जनता पार्टी यांच्या युतीमध्ये वाद निर्माण करण्यासाठी योजना आखली होती. या अंतर्गत शिखांच्या एका मोठ्या संताला पुढे आणण्याचा निर्णय घेण्यात आला. हे संत काँग्रेसच्या सांगण्यानुसार अकाली दलाच्या धोरणांवर टीका करतील. यावर जनता पार्टीही काही तरी बोलेल. यातून त्यांच्या युतीमध्ये वाद होऊन ती तुटेल, असा काँग्रेसचा डाव होता.

काँग्रेसने भिंद्रनवाले याला पुढे केले !

यासंदर्भात ग्यानी झैल सिंह, संजय गांधी, इंदिरा गांधी आणि कमलनाथ हे काम करत होते. हे सर्व इंदिरा गांधी यांच्या अकबर रोड कार्यालयात आणि १ सफदरजंग येथील निवासस्थानी चालू होते. या लोकांनी भिंद्रनवाले याला पुढे केले. त्याला खलिस्तानशी जोडून योजना चालवली. त्यांचा उद्देश भिंद्रानवाले याचा वापर हिंदूंना घाबरवण्यासाठी होता. त्याच वेळी खलिस्तान हे सूत्र निर्माण झाले, जे त्यापूर्वी अस्तित्वात नव्हते. ‘देशाच्या अखंडतेला धोका निर्माण झाला आहे आणि त्या आधारे राजकीय लाभ उठवावा’, हा खलिस्तानचे सूत्र उपस्थित करण्यामागे या सर्वांचा विचार होता.

काँग्रेसनेच भिंद्रनवाले याला शोधून त्याला मोठा केला !

ब्रिटनमधील भारताचे माजी उच्चायुक्त आणि प्रसिद्ध लेखक कुलदीप नैयर यांच्या ‘बियॉन्ड द लाइन’ या पुस्तकाच्या हवाल्याने सिद्दू यांनी सांगितले की, त्यांनी (कुलदीप नय्यर) भिंद्रनवालेच्या संदर्भात कमलनाथ यांच्याशी चर्चा केली होती. तेव्हा कमलनाथ यांनी सांगितले, ‘आम्ही एक उच्चस्तराच्या आणि कडक संतांचा शोध घेत आहोत. जो आमच्या गोष्टी ऐकेल आणि त्याप्रमाणे काम करील.’ यासाठी कमलनाथ यांनी २ संतांच्या मुलाखती घेतल्या. एक संत अत्यंत विनम्र होते, तर दुसरा म्हणजे भिंद्रनवाले काँग्रेसला हवा तसा होता.

कमलनाथ यांनी सांगितले होते, ‘आम्ही भिंद्रनवाले याला पैसे देत होतो !’

कमलनाथ यांनी कुलदीप नैयर यांना सांगितले होते, ‘ते, संजय गांधी आणि त्यांच्या पथकातील लोक भिंद्रनवाले याला पैसे देत होते.’ म्हणजेच कमलनाथ आणि संजय गांधी हेच नाही, तर ग्यानी झैलसिंह आणि इंदिरा गांधी हेही पैसे देण्याच्या कटात सहभागी होते. काँग्रेसच भिंद्रनवाले याला लोकांसमोर आणत होती.

राजकीय लाभासाठी काँग्रेसने भिंद्रनवाले याचा वापर केला !

भिंद्रनवाले याने कधीच खलिस्तानची मागणी केली नव्हती. तो केवळ असे म्हणत होता, ‘इंदिरा गांधी जर माझ्या पदरात खलिस्तान टाकतील, तर मी त्याला ‘नाही’ म्हणणार नाही.’ भिंद्रनवाले याचा उपयोग धार्मिक उपदेशांसाठी नाही, तर केवळ राजकीय लाभ उठवण्यासाठी करण्यात आला.

संपादकीय भूमिका

ज्या काँग्रेसने खलिस्तानचे भूत निर्माण केले, तेच इंदिरा गांधी यांच्या हत्येस कारणीभूत ठरले ! याचाच अर्थ ‘जे पेरले तेच उगवते’ हे लक्षात येते !