११.१०.२०२१ या दिवशी कतरास, झारखंड येथील यशस्वी उद्योजक आणि सनातन संस्थेचे ७३ वे संत (समष्टी) पू. प्रदीप खेमका आणि त्यांचे कुटुंबीय यांचा वार्तालाप घेऊन सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी त्यांच्या साधनेसंबंधी साधलेला सुसंवाद आणि त्यातून त्यांचा उलगडलेला साधनाप्रवास पुढे दिला आहे.
सुश्री (कु.) तेजल पात्रीकर : कतरास, झारखंड येथील पू. प्रदीप खेमका, त्यांची पत्नी पू. (सौ.) सुनीता खेमका (सनातनच्या ८४ व्या संत) आणि पू. प्रदीप खेमका यांच्या आई, पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका (सनातनच्या ८३ व्या संत) हे एकाच परिवारात तीन संत असल्याचे वैशिष्ट्य आहे.
पू. प्रदीप खेमका हे एक उद्योगपती आहेत. त्यांनी साधनेत संतपद प्राप्त केले आहे आणि त्यांच्या व्यवसायातही चांगली प्रगती केली आहे. साधना करता करता एवढ्या उच्चतम पदापर्यंत आपण कसे पोचू शकतो, हे आज आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊया.
पू. प्रदीप खेमका यांना ६४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे साधना सहजतेने झाली’, या भावात रहाणारे पू. प्रदीप खेमका !
पू. प्रदीप खेमका : आमचा परिवार व्यवसाय करत होता. तेव्हा प.पू. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) आम्हाला कधी जोडून घेतले, केव्हा आमच्याकडून साधना करून घेतली आणि आपल्या चरणी स्थान दिले, हे मला समजलेच नाही.
१ अ. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी सारणी लिहिण्यात एक दिवसही खंड न पडणे
पू. खेमका : वर्ष २००० मध्ये आम्ही सर्वांनी साधना चालू केली. वर्ष २००३ मध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याच्या प्रक्रियेला आरंभ झाला. त्या वेळी गुरुदेवांनी म्हटले होते, ‘एक सारणी लिहायची आहे. त्यामध्ये आपले स्वतःचे स्वभावदोष लिहायचे आहेत. त्यामध्ये आपल्या चुका लिहायच्या आहेत.’ ते आमच्यासाठी एवढे करत आहेत, तर त्याच वेळी माझी विचारसरणी अशी होती की, माझ्या देहावरील रोमरोम त्यांचा ऋणी आहे. त्यांनी मला सर्वकाही दिले आहे. ते आमच्यावर कृपाच करत आहेत. त्यांनी सांगितले आहे की, सारणी लिहायची आहे, तर मी सारणी लिहिण्यात मागे का रहावे ? तेव्हापासून माझा सारणी लिखाणात कधीच खंड पडला नाही. मी अखंडपणे सारणी लिहित आहे. असा एकही दिवस नाही की, मी काही कारणास्तव सारणी लिहिली नसेल. माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्या रात्रीही मी सारणी लिहिली आहे.
१ आ. ‘लक्षावधी जन्मांच्या पुण्यामुळे (पाप-पुण्यातील पुण्य) या जन्मात गुरुदेवांनी चरणांशी स्थान दिले आहे’, असा भाव असणे
पू. खेमका : आम्ही लक्षावधी जन्मांमध्ये लहान लहानसे जे पुण्य केले असेल, ते सर्व पुण्य एकत्रित आल्यामुळे या जन्मात मला प.पू. गुरुदेवांनी त्यांच्या चरणांशी स्थान दिले. ‘जेव्हा एखाद्याचे पुण्य फलित होते, तेव्हा जणू त्याला ईश्वरच प्राप्त होतो’, असे शास्त्रांमध्ये लिहिले आहे. प.पू. गुरुदेवांनी एवढी सरळसोपी साधना सांगितली आणि त्यासाठी ज्येष्ठ साधकांना आमच्याकडे पाठवले. त्यामुळेच आम्हाला साधना करणे सोपे झाले. ‘ते साक्षात् ईश्वर आहेत’, अशी मला प्रत्येक क्षणी अनुभूती येत असते. त्यांच्या चरणांप्रती भाव वाढत गेला आणि जीवनात असे वाटू लागले की, व्यवहारच साधना आहे.
१ इ. ‘६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करायला किती दिवस लागतील’, हे गुरुदेवांनी सूक्ष्मातून सांगणे आणि त्यानुसार होत गेले.
१ ई. पती-पत्नी यांनी एकमेकांना संपूर्ण साथ दिल्यामुळे साधनेत प्रगती होणे
कु. तेजल : तुम्हा पती-पत्नीचा साधनाप्रवास ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यानंतरही एकाच वेळी होत आहे. आपले संतपदही एकाच वेळी घोषित झाले आहे. पुढील साधनाही चालूच आहे; परंतु सर्वसामान्यपणे समाजात आपण पहातो की, पती-पत्नीमध्ये ‘थोडीतरी कुरबूर होणे, एकमेकांच्या विचाराशी सहमत न होणे’, अशा गोष्टी होत असतात. आपण तर दोघेही साधनेत एवढे बरोबरच चालत आहात, तर त्यासाठी आपण कसे प्रयत्न करता ? एकमेकांचे कसे साहाय्य घेता ? त्याविषयी आपण थोडेसे सांगावे.
पू. खेमका : प.पू. गुरुदेवांच्या असीम कृपेमुळे मला वेगळे असे काही प्रयत्न करावेच लागले नाहीत. वर्ष २००० ते २०१० पर्यंतच्या १० वर्षांत मला एकही औषध घ्यावे लागले नाही. त्यापूर्वी मला २-३ मासांनी थोडा ताप येणे, सर्दी होणे असे व्हायचे; परंतु मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की, मी साधना चालू केल्यानंतर ही आजारपणे मला कधीच झाली नाहीत. व्यवसायात पत्नीचा प्रत्यक्ष सहभाग नाही; परंतु इतर सर्व गोष्टींत जो सहभाग अपेक्षित आहे, त्याच्यापेक्षा अधिक प.पू. गुरुदेवांनी माझ्याकडून करून घेतला. सामान्यतः पती-पत्नीमध्ये कुरबूर होत असते. मी काही बोललो किंवा त्यांनी काही म्हटले; तर ते आमच्याकडून १०० टक्के स्वीकारले जातेे. साधनाप्रवास आम्हा दोघांचा एकाच वेळी झाला आहे. प.पू. गुरुदेवांनी आमच्यावर कृपाही जणू एकाच वेळी केली.
पू. (सौ.) सुनीता खेमका : तो त्यांचा आशीर्वादच होता. जेव्हा आमची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली, त्याच वेळी त्यांनी तसे प्रशस्तीपत्रक (सर्टिफिकेट) दिले होते की, तुम्ही दोघे जसे सप्तपदी एकाच वेळी चाललात, तसेच साधनेतही एकत्रच चालत आहात.
१ उ. गुरुदेवांच्या असीम कृपेमुळेच जीवनातील ४ वर्षांच्या कठीण काळाचा साधनेवर काहीच परिणाम न होणे
पू. (सौ.) सुनीता खेमका : आमच्या जीवनात अत्यंत कठीण आणि मनाविरुद्ध असा प्रसंग आला. त्या वेळी परिस्थिती अगदीच प्रतिकूल झाली होती. तो ४ वर्षांचा काळ आम्हाला फार कठीण गेला; परंतु प.पू. गुरुदेवांच्या कृपेने त्याचा परिणाम आमच्या साधनेवर झाला नाही. त्याच वेळी आमच्याच घरातील एका सदस्याने विचारले, ‘‘तुमच्या जीवनात गुरु आहेत, तर असा कठीण प्रसंग का ओढवला ?’’ त्या वेळी प.पू. गुरुदेवांनी एवढे सुंदर उत्तर सुचवले ना ! ‘द्वापरयुगात भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या समवेत होते; परंतु पांडवांचे जे प्रारब्ध होते, ते त्यांनाच भोगायचे होते. त्या वेळी त्यांच्या समवेत साक्षात् श्रीकृष्ण होते, तरी त्यांना ते भोगावेच लागले ना ! तसेच श्रीकृष्ण (गुरुदेव) आमच्यासह आहे; परंतु आमचे जे प्रारब्ध आहे, ते आम्हालाच भोगून संपवावे लागेल ना ! त्यामुळे ही प्रतिकूल परिस्थिती आमच्या जीवनात आली.’ प.पू. गुरुदेव ज्या वेळी ज्या उत्तराची आवश्यकता असते, अगदी बरोबर तेच सुचवतात. मला जर कुणी असा प्रश्न विचारला असता, तर माझ्या बुद्धीने असे समर्पक उत्तर मला देताच आले नसते.
कु. तेजल : आपल्याला गुरुदेवांनी सर्व गोष्टी सांगितल्या आहेत, म्हणजे शिकवलेल्याच आहेत. प्रारब्ध प्रत्येकाला स्वतःच भोगावे लागते. तुमची साधनाही चालू असतांना प्रारब्ध भोगणेही चालू असते.
पू. खेमका : जशी दुचाकी गाडीची दोन चाके एकाच वेळी फिरत असतात. एक चाक प्रारब्धाचे चालत असते आणि दुसरे चाक गुरूंच्या कृपेचे चालत असते. तो १-२ दिवसांचा काळ नव्हता, तर वर्ष २०११ ते वर्ष २०१५ पर्यंत ४ वर्षांचा कठीण काळ होता. कुणालाही हे ठाऊक नाही की, तेव्हा आमच्या जीवनात एवढ्या समस्या आल्या होत्या.
१ ऊ. संतपद प्राप्त झाल्यानंतर अंतर्मुखता वाढणे आणि ‘साधना आणि गुरुकार्य करण्यासाठी आणखी काय करायला पाहिजे’, असा विचार वाढणे
पू. खेमका : वर्ष २०११ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली आणि वर्ष २०१८ मध्ये तर समष्टीमध्ये संतपदही घोषित करण्यात आले. त्या वेळी माझी अंतर्मुखता अधिक वाढली.
१ ए. गुरुदेवांच्या कृपेमुळे खेमका परिवारातील सर्वांनी साधनेला आरंभ करणे
कु. तेजल : आपल्या दोघांचाही समष्टी भाव असल्यामुळे संपूर्ण परिवार साधनेत आला ना ?
पू. खेमका : प.पू. गुरुदेवांनी आमच्याकडून साधना आरंभ करून घेतली. नंतर त्यांनीच सर्वांना जोडून घेतले. पत्नी, आई आणि मुले यांनाही एकत्र जोडून घेतले. एवढे साधनेला पोषक वातावरण निर्माण केले की, म्हणतात ना, विरोध करण्याची संधी त्यांनी परिवारात कुणालाही दिलीच नाही. मला ठाऊक नाही की, ते एवढी मोठी असीम कृपा माझ्यावर कशी करत आहेत !
कु. तेजल : त्यामुळेच आपल्या परिवाराचा एक विशेष भाग आहे की, सर्व जण सात्त्विक आहेत.
पू. (सौ.) सुनीता खेमका : आजही त्या सर्वांची प.पू. गुरुदेवांवर १०० टक्के श्रद्धा आहे की, ते जे सांगतील, ते करायचेच आहे.
कु. तेजल : खरोखर एवढ्या लोकांमध्ये आपला परिवार एक एवढा चांगला परिवार आहे. जे साधनेसाठी सर्वकाही करत आहेत.
(क्रमशः)
जशी दुचाकी गाडीची २ चाके एकाच वेळी फिरतात, तसे १ चाक प्रारब्धाचे आणि दुसरे चाक गुरूंच्या कृपेचे चालत असते ! – पू. प्रदीप खेमका |