Ganpati : श्री गणेशाला दूर्वा वहाण्‍यामागील धर्मशास्‍त्र

श्री गणपतीला दूर्वा वहाण्‍याची कारणे

१. पौराणिक कारण : ‘गणपतीने आपल्‍याशी विवाह करावा म्‍हणून एका अप्‍सरेने ध्‍यानमग्‍न असलेल्‍या गणपतीचा ध्‍यानभंग केला. गणपतीने विवाहास नकार दिल्‍यामुळे अप्‍सरेने गणपतीला शाप दिला. यामुळे गणपतीच्‍या डोक्‍याचा दाह होऊ लागला. हा दाह न्‍यून (कमी) करण्‍यासाठी गणपतीने मस्‍तकावर दूर्वा धारण केल्‍या; म्‍हणून गणपतीला दूर्वा वहातात.’

२. आयुर्वेदानुसार कारण : आयुर्वेदसुद्धा ‘दुर्वांच्‍या रसाने शरिराचा दाह न्‍यून होतो’, असे सांगतो.

३. आध्‍यात्‍मिक कारण : पूजेचा उद्देश असतो की, आपण पूजा करत असलेल्‍या मूर्तीतील देवत्‍व वाढून त्‍याचा आपल्‍याला चैतन्‍याच्‍या स्‍तरावर लाभ व्‍हावा. यासाठी त्‍या त्‍या देवतेचे तत्त्व अधिकाधिक आकृष्‍ट करणार्‍या गोष्‍टी देवतेला वहाणे उपयुक्‍त असते. दुर्वांमध्‍ये गणेशतत्त्व आकृष्‍ट करण्‍याची क्षमता सर्वांत जास्‍त असते; म्‍हणून श्री गणेशाला दूर्वा वहातात. श्री गणेशपूजनात दूर्वा विशेष महत्त्वाच्‍या आहेत.


श्री गणेशाला वहाण्‍याच्‍या दूर्वा कशा आणि किती असाव्‍यात ?

गणपतीला वहायच्‍या दूर्वा कोवळ्‍या असाव्‍यात.

दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्‍येच्‍या पात्‍या असाव्‍यात.

एकत्रित बांधल्‍याने त्‍यांचा सुगंध बराच काळ टिकतो. त्‍या जास्‍त वेळ टवटवीत रहाव्‍यात म्‍हणून पाण्‍यात भिजवून मग वहातात. या दोन्‍हींमुळे गणपतीची पवित्रके बराच काळ मूर्तीत रहातात.

विषम संख्‍येमुळे शक्‍ती जास्‍त प्रमाणात मूर्तीत येते. गणपतीला विशेषकरून २१ दूर्वा वहातात. २१ हा आकडा संख्‍याशास्‍त्रानुसार २ + १ = ३ असा आहे. श्री गणपति हा ३ या आकड्याशी संबंधित आहे. ३ आकडा हा कर्ता, धर्ता यासमवेतच हर्ताही असल्‍याने त्‍या शक्‍तीमुळे ३६० लहरी नष्‍ट करणे शक्‍य होते. सम संख्‍येने दूर्वा वाहिल्‍यास अधिकाधिक ३६० लहरी आकर्षित होतात आणि नंतर १०८ लहरीही आकर्षित होतात.


दूर्वा अर्पण करण्‍याची पद्धत !

दुः + अवम्, अशा प्रकारे दूर्वा हा शब्‍द बनला आहे. दुः म्‍हणजे दूर असलेले आणि अवम् म्‍हणजे जवळ आणते ते. दूर असलेल्‍या श्री गणेशाच्‍या पवित्रकांना जवळ आणतात, त्‍या दूर्वा होत ! दूर्वा अर्पण करण्‍याची पद्धत म्‍हणजेच मूर्ती जागृत करण्‍याची आणि तिची जागृतता टिकवण्‍याची पद्धत होय. मुख सोडून संपूर्ण गणपति दूर्वांनी मढवायचा. त्‍यामुळे मूर्तीच्‍या बाजूला दूर्वांचा वास निघायला लागतो. दूर्वांनी गणपतीला मढवलेले असल्‍याने हा गंध गणपतीच्‍या आकारात संप्रेषित होतो; म्‍हणून गणपतीच्‍या पवित्रकांच्‍या आकाराला या आकाराकडे येणे सोपे जाते. यालाच ‘मूर्ती जागृत झाली’, असे म्‍हणतात. आलेली पवित्रके निघून गेली, असे न होता ती तेथेच रहाण्‍यासाठी मूर्तीची प्राणप्रतिष्‍ठा करतात. हा गंध असेपर्यंत पवित्रके जास्‍त प्रमाणात रहातात. ती रहावी म्‍हणून दिवसातून ३ वेळा दूर्वा पालटतात. त्‍यासाठी दिवसभरात ३ वेळा पूजा करतात.


श्री गणेशाची २१ नामे म्‍हणून दूर्वा वहाण्‍याची पद्धत !

‘श्री गणेशपूजेत एक तरी दूर्वा असावीच. श्री गणेशाला ३, ५ किंवा ७ पाती असलेल्‍या दूर्वा वहाव्‍यात. दूर्वांची अग्रे स्‍वतःकडे येतील, अशा पद्धतीने दूर्वा वहाव्‍यात. दूर्वा वहातांना श्री गणेशाच्‍या २१ नामांचा उच्‍चार करावा.

१. गणाधिपाय नमः ।

२. उमापुत्राय नमः ।

३. अभयप्रदाय नमः ।

४. एकदन्‍ताय नमः ।

५. इभवक्‍त्राय नमः ।

६. मूषकवाहनाय नमः ।

७. विनायकाय नमः ।

८. ईशपुत्राय नमः ।

९. सर्वसिद्धिप्रदाय नमः ।

१०. लम्‍बोदराय नमः ।

११. वक्रतुण्‍डाय नमः ।

१२. अघनाशनाय नमः ।

१३. विघ्‍नविध्‍वंसकर्त्रे नमः ।

१४. विश्‍ववन्‍द्याय नमः ।

१५. अमरेश्‍वराय नमः ।

१६. गजवक्‍त्राय नमः ।

१७. नागयज्ञोपवीते नमः ।

१८. भालचन्‍द्राय नमः ।

१९. परशुधारिणे नमः ।

२०. विघ्‍नाधिपाय नमः ।

२१. सर्वविद्याप्रदायकाय नमः ।’

(साभार : वार्तापत्र, ‘मयूरेश’, सप्‍टेंबर २०१६)

(Ganpati, Ganeshotsav)