आजपासून संसदेच्या नवीन इमारतीत कामकाजाला होणार प्रारंभ !

  • संसदेच्या विशेष अधिवेशनाला प्रारंभ

  • जुन्या संसद भवनाला निरोप

  • जुने संसद भवन बांधण्यात भारतियांचा घाम आणि पैसा होता ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – देशाला पुन्हा एकदा ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासाची आठवण करून देण्याचा, तसेच नवीन संसदेत जाण्यापूर्वी इतिहासातील महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी घटना आठवत पुढे जाण्याचा हा क्षण आहे. या ऐतिहासिक वास्तूला आपण सर्व जण निरोप देत आहोत. स्वातंत्र्यानंतर या इमारतीला ‘संसद भवन’ म्हणून मान्यता मिळाली. ही इमारत बांधण्याचा निर्णय परकीय राज्यकर्त्यांचा होता; परंतु ‘या वास्तूच्या उभारणीत माझ्या देशवासियांचा घाम आणि कष्ट आहेत’, असे आपण अभिमानाने सांगू शकतो.

पैसाही माझ्या देशातील लोकांचा होता, असे भावनिक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ सप्टेंबरपासून चालू झालेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केले. संसदेच्या जुन्या इमारतातील पहिल्या दिवशीचे कामकाज पार पाडले. १८ सप्टेंबरचा  दिवस हा या इमारतीतील कामकाजाचा शेवटचा दिवस होता. त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी बोलत होते. जुने संसद भवन इंग्रजांनी बांधले होते. १९ सप्टेंबरला श्री गणेशचतुर्थीच्या दिवसापासून संसदेच्या नवीन इमारतीमध्ये कामकाजाला प्रारंभ होणार आहे. २२ सप्टेंबरपर्यंत चालणार्‍या या विशेष अधिवेशनात ४ विधेयके मांडली जाणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील प्रमुख सूत्रे  

१. या सदनाचा निरोप घेणे, हा फार भावनिक क्षण आहे. कुटुंब जुने घर सोडून नवीन घरात गेले, तरी काही क्षण अनेक आठवणींना जिवंत करतात. आपण हे घर सोडत असतांना आपले मन आणि मेंदू त्या भावनांनी आणि अनेक आठवणींनी भरून जातो. उत्सव, उत्साह, कटू-गोड क्षण, भांडणे आदी या आठवणींशी निगडीत आहेत.

२. येथील संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर लिहिले आहे, ‘लोकांसाठी दरवाजे उघडा आणि त्यांना त्यांचे हक्क कसे मिळतात ?, ते पहा.’ आपण सर्व आणि आपल्या आधी आलेले सर्व जण याचे साक्षीदार आहोत. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी येथे योगदान दिले आहे.

३. संसदेच्या प्रारंभी महिला सदस्यांची संख्या अल्प होती, हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली. स्थापनेपासून आतापर्यंत ७ सहस्र ५०० हून अधिक प्रतिनिधी दोन्ही सभागृहांत आले आहेत. या काळात अनुमाने ६०० महिला खासदार आल्या. इंद्रजीत गुप्ताजी ४३ वर्षे या सदनाचे साक्षीदार होते. शफीकुर रहमान वयाच्या ९३ व्या वर्षी सभागृहात येत आहेत.

जुने संसद भवन

४. लोकशाहीच्या या घरावर (संसदेवर) आतंकवादी आक्रमण झाले. हे आक्रमण इमारतीवर नव्हते, तर आपल्या आत्म्यावर होते. ती घटना हा देश कधीही विसरू शकत नाही. ज्या सैनिकांनी आतंकवाद्यांशी लढतांना आपले रक्षण केले, त्यांनाही कधीच विसरता येणार नाही.

५. आज जेव्हा आपण या सभागृहातून बाहेर पडत आहोत, तेव्हा मला त्या पत्रकार मित्रांचीही आठवण ठेवावीशी वाटते, जे संसदेचे वार्तांकन करत आहेत. असे काही आहेत, ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य संसदेला वाहिलेले आहे. पूर्वी आतासारखे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते, तेव्हा केवळ तेच लोक होते. त्यांची शक्ती अशी होती की, ते आतल्या बातम्या आणि आतल्यातील आतल्या बातम्याही मिळवायचे.