अपघात होऊन डाव्‍या हाताचा अस्‍थिभंग झाल्‍यावर शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘३०.९.२०२१ या दिवशी माझा छोटासा अपघात झाला. त्‍या वेळी आणि अन्‍य वेळी मला आलेल्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

सौ. मधुरा सहस्रबुद्धे

१. अनुभूती

१ अ. नवरात्रीच्‍या पहिल्‍या दिवशी भाजलेल्‍या पोळीवर देवीचे पाऊल उमटणे : २९.९.२०१९ या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस होता. त्‍या दिवशी मी काही कारणास्‍तव देवीची प्रतिष्‍ठापना करू शकले नाही. त्‍या दिवशी पोळ्‍या करत असतांना माझा देवीचा नामजप सतत चालू होता. माझे लक्ष नुकत्‍याच भाजलेल्‍या पोळीकडे गेले. तेव्‍हा त्‍या पोळीवर प्रत्‍यक्ष देवीचे पाऊल उमटलेले दिसले. त्‍याचा उलगडा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजलीताईंनी केला. त्‍यांनी सांगितले, ‘‘तू देवीची प्रतिष्‍ठापना करू शकली नाहीस, तरी ‘तुझ्‍या वास्‍तूत देवीचे अस्‍तित्‍व आहे’, हे देवीने तुझ्‍या लक्षात आणून दिले.’’

१ आ. शस्‍त्रक्रियेच्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे आणि शुद्धीवर आल्‍यानंतर पलंगाभोवती सनातन संस्‍थेचा पिवळा कापडी फलक (बॅनर) दिसणे अन् आश्रमाप्रमाणे उद़्‍घोषणा ऐकू येणे : ३०.९.२०२१ या दिवशी माझा छोटासा अपघात झाला. त्‍या वेळी माझ्‍या डाव्‍या हाताचे हाड मोडले. शस्‍त्रक्रिया होण्‍यापूर्वी मी गुरुदेवांना प्रार्थना केली की, ‘आधुनिक वैद्यांच्‍या माध्‍यमातून तुम्‍हीच माझी शस्‍त्रक्रिया करा. आधुनिक वैद्यांचे हात हे तुमचेच हात असू देत.’ त्‍या दिवशी मला पूर्ण भूल दिली होती. मी शुद्धीवर आल्‍यानंतर रुग्‍णालयाच्‍या खोलीमध्‍ये माझ्‍या पलंगाभोवती सनातन संस्‍थेचा पिवळा कापडी फलक (बॅनर) दिसला आणि आश्रमामध्‍ये उद़्‍घोषणा करतात, त्‍याप्रमाणे ‘अब हम भगवान श्रीकृष्‍णजी के चरणों में कृतज्ञता व्‍यक्‍त कर प्रार्थना करते है’, हे शब्‍द ऐकू आले.

१ इ. पू. आई वेणी घालण्‍यास साहाय्‍य करत असतांना प्रार्थना केल्‍यामुळे वेणीतून दिवसभर चैतन्‍य मिळणे : माझ्‍या हाताला ‘प्‍लास्‍टर’ असल्‍यामुळे पू. आई माझी वेणी घालत असे. त्‍या वेळी माझ्‍याकडून पुढील प्रार्थना होत असे – ‘हे गुरुदेवा, माझ्‍या आईच्‍या माध्‍यमातून तिच्‍यातील देवीतत्त्व आणि चैतन्‍य माझ्‍या केसांत येऊ दे अन् मला दिवसभर ते चैतन्‍य ग्रहण करता येऊ दे, अशी तुमच्‍या चरणी प्रार्थना आहे.’ त्‍यामुळे माझे केस पुष्‍कळ वाढले आणि मला दिवसभर चैतन्‍य मिळत राहिले.

१ ई. गुरुपौर्णिमेचा सोहळा चालू असतांना परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांची प्रतिमा सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांच्‍या शरिरात जात असल्‍याचे दिसणे : ५.७.२०२० या दिवशी (गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी) सोहळ्‍यानिमित्त सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांचे संगणकीय प्रणालीद्वारे (ऑनलाईन) मार्गदर्शन चालू होते. त्‍या वेळी मला सद़्‍गुरु स्‍वातीताईंच्‍या पाठीमागून गुरुदेवांची प्रतिमा त्‍यांच्‍या शरिरात जात असल्‍याचेे दृश्‍य पुष्‍कळ वेळ दिसत होते.

१ उ. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी खोकला थांबण्‍यासाठी दिलेल्‍या चाटणाचा उपयोग तीर्थासारखा होणे : २६.१.२०२२ या दिवशी मी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांच्‍या समवेत मिरजेला धाकट्या बहिणीकडे (सौ. शीतल गोगटे हिच्‍याकडे) गेले होते. त्‍या दिवशी रात्री मला पुष्‍कळ खोकला येऊ लागला. त्‍या वेळी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ मला म्‍हणाल्‍या, ‘‘मी जे चाटण (खोकला येऊ नये; म्‍हणून औषधे एकत्र केलेला मध) केले आहे, ते बोटाने चाट.’’ त्‍या वेळी ते चाटण जसे जिभेवरून घशात जाऊ लागले, तसे मला पितळ्‍याचा कमंडलू दिसू लागला. याविषयी मी श्रीचित्‌शक्‍ति सौ. गाडगीळ यांना सांगितले. तेव्‍हा त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘त्‍या चाटणाचा तुला तीर्थासारखा उपयोग होणार आहे.’’

२. शिकायला मिळालेली सूत्रे

२ अ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी व्‍यष्‍टी साधनेचे प्रयत्न वाढवण्‍यास सांगणे : ‘माझा अपघात होण्‍यापूर्वी मी आश्रमात धान्‍य निवडतात, त्‍या ठिकाणी सेवा करत होते. माझ्‍या हाताला ‘प्‍लास्‍टर’ असल्‍यामुळे मी सेवा करू शकत नव्‍हते. तेव्‍हा मला फार वाईट वाटले. त्‍या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ मला म्‍हणाल्‍या, ‘‘आता तू व्‍यष्‍टी साधनेचे प्रयत्न कर.’’

२ आ. सद़्‍गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळकाकांनी नामजपाचे उपाय सांगतांना प्रार्थना करण्‍यास सुचवणे : दुखावलेल्‍या हाताच्‍या वेदना न्‍यून होण्‍यासाठी मी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना वेळोवेळी नामजप विचारलेे. एकदा ते मला म्‍हणाले, ‘‘तू गुरुदेवांना, ‘माझ्‍याकडून सेवा होण्‍यासाठीच माझा हात बरा होऊ दे’, अशी प्रार्थना कर.’’

३. कृतज्ञता

‘हे गुरुदेवा, तुमच्‍या कृपेमुळेच मी अखंड भावावस्‍था आणि कृतज्ञता यांद्वारे जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून सुटले. त्‍याबद्दल तुमच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते. ‘माझी व्‍यष्‍टी साधना आणि समष्‍टी सेवा अखंड चालू राहू दे, हीच आपल्‍या चरणी प्रार्थना करते.’

– सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे (६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी), ढवळी, फोंडा. (८.२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक