मराठा आरक्षणाचे प्रकरण
संभाजीनगर – मराठा आरक्षणाच्या सूत्रावरून राज्यात मराठा समाजातील तरुण हे राजकीय नेत्यांना जाब विचारू लागले आहेत. केवळ सत्ताधारीच नाही, तर विरोधक आमदारही यातून सुटले नाहीत. मागील २-३ दिवसांत मंत्री डॉ. तानाजी सावंत, भाजपचे आमदार तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब आणि काँग्रेसचे आमदार अन् माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, या राजकीय नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.
मंत्री डॉ. तानाजी सावंत धाराशिव जिल्ह्यात आले असता मराठा तरुणांनी त्यांच्याविरुद्ध घोषणा दिल्या. संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव सरक येथे चालू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलकांची भेट देण्यासाठी हरिभाऊ बागडे गेले असता तेथे आंदोलकांनी त्यांना धारेवर धरले. ‘विधीमंडळात जाऊन मराठा आमदार काय करतात ? मराठा आरक्षणाचे सूत्र मार्गी का लागत नाही ?’, असे प्रश्न उपस्थित केले, तसेच एका उपोषणकर्त्याने हाताला लावलेली सलाईन काढून फेकली. या वेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
गंगापूर तालुक्यातील एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याने त्याला शहरातील घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भाजपचे आमदार प्रशांत बंब आले असता तरुणांनी त्यांच्यावर मराठा आरक्षणाच्या सूत्रावरून प्रश्नांचा भडिमार केला. दुसरीकडे अशोक चव्हाण यांनाही मराठा समाजाच्या तरुणांनी घेराव घालत जाब विचारला, तसेच ‘काळे झेंडे’ दाखवून घोषणा दिल्या.