‘दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट’कडून मराठा बटालियनच्या सैनिकांकडे गणरायाची मूर्ती सुपुर्द !
पुणे – सैन्याच्या १, ५ ६, १९ आणि ३३ मराठा बटालियनच्या सैनिकांनी विविध सीमावर्ती भागांत दगडूशेठच्या ‘श्रीं’ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर ट्रस्टने २ फूट उंचीची दगडूशेठ गणपतीची मूर्ती बटालियनला दिली आहे. तसेच यंदा ‘ट्रस्ट’कडून ६ मूर्ती सैन्यातील मराठा बटालियनला देण्यात आल्या आहेत’, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली. या वेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
गेल्या १३ वर्षांपासून हा उपक्रम चालू आहे. अरुणाचल प्रदेश, पंजाब यांसह विविध सीमावर्ती भागांत मराठा बटालियनचे सैनिक गणरायाची प्रतिष्ठापना करणार आहेत. ‘सीमेवरील भारतीय सैनिकांच्या ठाण्यांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केल्याने मराठा बटालियनच्या सैनिकांना वेगळी ऊर्जा मिळत असते’, अशी भावना सैनिकांनी व्यक्त केली. (सरकारने सैनिकांची ही भावना लक्षात घेता देशाच्या सर्वच सीमावर्ती भागांत असे करण्याचा प्रयत्न करावा ! – संपादक)