‘पाकिस्तान एअरलाईन्स’ ठप्प होण्याची मार्गावर !

  • सेवा चालू ठेवण्यासाठी ६३६ कोटी रुपयांची आवश्यकता !

  • २० सहस्र कोटी रुपयांचे कर्ज !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानची राष्ट्रीय विमानसेवा ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स’ (पी.आय.ए.) हिचे काम ठप्पा होण्याच्या मार्गावर आहे. ही सेवा व्यवस्थित चालवण्यासाठी ६३६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या आस्थापनावर २० सहस्र कोटी रुपयांचे कर्ज असून ते त्याच्या एकूण संपत्तीपेक्षा ५ पटींनी अधिक आहे.

१. सध्या या आस्थापनाने भाडेतत्त्वावर घेतलेल्या १३ पैकी ५ विमानांची उड्डाणे रहित केली असून आणखी ४ विमानांची उड्डाणे रहित होण्याची शक्यता आहे. इंधन न भरल्यामुळे अनेक आखाती देशांमध्ये या आस्थापनांच्या विमानांची उड्डाणे बंद करण्यात आली आहेत.
या आस्थापनाच्या विमानांना संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया या देशांनी उड्डाण करण्यापासून रोखले आहे.

२. पाकिस्तानच्या ‘जिओ न्यूज’नुसार, पी.आय.ए.च्या संचालकांनी सांगितले आहे की, जर आपत्कालीन निधी वेळेवर दिला नाही, तर १५ सप्टेंबरपर्यंत ‘एअरलाईन्स’ची सर्व उड्डाणे रहित कराव्या लागतील.

३. यापूर्वी पी.आय.ए.ने म्हटले होते, ‘बोइंग आणि एअरबस ही आस्थापने सप्टेंबरच्या मध्यापर्यंत विमानाच्या सुट्या भागांचा पुरवठा थांबवू शकतात.’ याचे कारण म्हणजे पी.आय.ए.ने या आस्थापनांची पूर्वीची थकबाकीही भरलेली नाही.

४. ‘पाकिस्तान टुडे’च्या वृत्तानुसार, इंधनाचे पैसे देण्यास असमर्थ ठरल्यामुळे सौदी अरेबिया आणि दुबई विमानतळांवर पी.आय.ए.ची उड्डाणे थांबवण्यात आली होती; मात्र पी.आय.ए.ने पैसे देण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर ही उड्डाणे पुन्हा चालू करण्यात आली.

५. आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानने इस्लामाबाद विमानतळ भाडे करारावर देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे हवाई वाहतूक मंत्री ख्वाजा साद रफिक यांनी संसदेत ही माहिती दिली होती.

संपादकीय भूमिका 

  • जिहादी आतंकवादाच्या निर्मितीसाठी पैसे खर्च केल्याचाच हा परिणाम आहे !
  • ‘भारताविरुद्ध लढण्यासाठी अणूबाँब बनवण्यासाठी गवत खाऊ लागले, तरी चालेल’ अशी दर्पोक्ती करणार्‍या पाकने अणूबाँब बनवले, तरी आता त्याच्या नागरिकांवर गवत खाण्याचीच वेळ आली आहे !