चिराला, आंध्रप्रदेश येथील श्रीमती आंडाळ आरवल्ली (वय ८७ वर्षे) संतपदी विराजमान !

पू. (श्रीमती) आंडाळ आरवल्ली आजींचे पुत्र श्री. श्रीबदरी नारायण आरवल्ली (वय ५२ वर्षे) यांनीही ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठल्‍याचे घोषित !

पू. (श्रीमती) आंडाळ आरवल्लीआजी यांचा श्रीकृष्‍णाचे चित्र देऊन सन्‍मान करतांना श्री. चेतन जी.
श्री. श्रीबदरी नारायण आरवल्ली  यांचा श्रीकृष्‍णाचे चित्र देऊन सत्‍कार करतांना श्री. चेतन जी.

चिराला (आंध्रप्रदेश) – चिराला, प्रकाशम् (आंध्रप्रदेश) येथील श्रीमती आंडाळ रंगनायकाचार्युलू आरवल्ली (वय ८७ वर्षे) यांनी संतपद गाठल्‍याचे १२.९.२०२३ या दिवशी येथील त्‍यांच्‍या निवासस्‍थानी झालेल्‍या एका भेटीत घोषित करण्‍यात आले. पू. आजींविषयी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी लिहिलेला संदेश श्री. चेतन जी. यांनी वाचून दाखवला आणि त्‍या माध्‍यमातून त्‍यांचे संतपद घोषित करण्‍यात आले. श्री. चेतन जी. यांनी श्रीकृष्‍णाचे चित्र देऊन त्‍यांचा सन्‍मान केला. या भावसोहळ्‍याला पू. आजींची मुलगी सौ. जानकीदेवी श्रीनिवास माडभूषि, पू. आजींचा नातू श्री. यशवंत माडभूषि, पू. आजींचा मुलगा श्री. श्रीबदरी नारायण आणि त्‍यांच्‍या पत्नी सौ. राधिका हे उपस्‍थित होते. पू. (श्रीमती) आंडाळ या वैष्‍णव संप्रदायानुसार साधना करतात.

श्री. श्रीबदरी आरवल्ली

पू. (श्रीमती) आंडाळआजी यांनी व्‍यक्‍त केलेले मनोगत

१. माझे प्रथम गुरु सौ. पद्म जनार्दन आहेत. त्‍यांची प्रथम भेट झाल्‍यावर मी त्‍यांना ‘मी कोणता नामजप करू ?’, असे विचारले. त्‍या वेळी त्‍यांनी मला ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप करा’, असे सांगितले. तेव्‍हापासून मी हा नामजप करत आहे.

२. ‘गुरुदेवांचे (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) आरोग्‍य चांगले राहू दे आणि सनातन संस्‍थेचे कार्य उत्तरोत्तर वाढू दे’, अशी मी सतत प्रार्थना करते.

३. माझ्‍या जीवनात श्री पेरूमाळदेवाचे तीर्थ आणि प्रसाद माझ्‍यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मला प्रतिदिन केवळ हे तीर्थ मिळाले, तरी पुरेसे आहे.

प्रेमळ, निरपेक्ष आणि श्री नारायणाच्‍या नामानुसंधानात रमणार्‍या श्रीमती आंडाळ रंगनायकाचार्युलू आरवल्ली !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘चिराला (जिल्‍हा प्रकाशम्, आंध्रप्रदेश) येथील श्रीमती आंडाळ रंगनायकाचार्युलू आरवल्ली (वय ८७ वर्षे) या वैष्‍णव संप्रदायानुसार साधना करतात. त्‍यांची श्री नारायणावर पुष्‍कळ श्रद्धा असून नारायणाचे अखंड नामस्‍मरण करण्‍यात त्‍या मग्‍न असतात. त्‍यांच्‍या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले, तरीही त्‍यांनी न डगमगता नामजपावरील श्रद्धेच्‍या बळावर त्‍या प्रसंगांना धिराने तोंड दिले.

नातेवाइकांकडून त्‍यांच्‍या कोणत्‍याही अपेक्षा नाहीत. ‘माझा संबंध केवळ भगवंताशीच आहे’, असा त्‍यांचा भाव असतो. ‘प्रत्‍येक परिस्‍थितीत देव आपल्‍याला सांभाळणार’, अशी त्‍यांची दृढ श्रद्धा आहे. आजींना त्‍यांच्‍या अनुभवाचा लेशमात्रही अहंकार नाही. त्‍या सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहातात.

आजींचे पती (कै.) रंगनायकाचार्युलू आरवल्ली हे वैष्‍णव संप्रदायाच्‍या ‘आचार्य’पदावर होते. त्‍या वेळी त्‍यांना आणि आजींना आसनावर बसवून त्‍यांची पाद्यपूजा केली जात असे. तेव्‍हा ‘आम्‍हा दोघांच्‍या जागी साक्षात् श्रीविष्‍णु आणि श्री लक्ष्मी असतात अन् सर्व जण त्‍यांची पूजा करतात’, असा आजींचा भाव असे.

पू. (श्रीमती) आंडाळ आरवल्ली

आता आजींचा चेहरा पूर्वीपेक्षा अधिक तेजस्‍वी दिसतो. ‘आजींच्‍या साधनेमुळे त्‍यांच्‍यातील चैतन्‍याचे प्रमाण वाढले आहे’, असे जाणवते.

आजींनी केलेल्‍या साधनेच्‍या संस्‍कारांमुळे त्‍यांचे कुटुंबीयही साधना करत आहेत. आजींचे पुत्र श्री. श्रीबदरी नारायण आरवल्ली हे वैष्‍णव संप्रदायानुसार साधना करतात. आजींची मुलगी सौ. जानकीदेवी माडभूषि, नात (मुलीची मुलगी) सौ. तेजस्‍वी वेंकटापूर आणि नातजावई श्री. प्रसन्‍ना वेंकटापूर हे भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथे सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्‍यांचा पणतू चि. बलराम वेंकटापूर (वय ५ वर्षे) हा महर्लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेला दैवी बालक असून त्‍याची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के आहे.

‘निरपेक्ष आणि आध्‍यात्मिक स्‍तरावर जीवन कसे जगावे ?’, याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणार्‍या श्रीमती आंडाळ आरवल्लीआजी यांची आध्‍यात्मिक उन्‍नती जलद गतीने होत आहे. ‘प्रेमभाव, भगवंताप्रती अपार भाव आणि सतत नामानुसंधानात असणे’ इत्‍यादी अनेक गुणांमुळे आजच्‍या शुभदिनी (१२.९.२०२३ या दिवशी) त्‍यांनी ७१ टक्‍के आध्‍यात्मिक गाठली आहे आणि त्‍या संतपदावर विराजमान झाल्‍या आहेत.

‘पू. (श्रीमती) आंडाळ आरवल्ली यांची पुढील आध्‍यात्मिक प्रगती अशीच जलद गतीने होवो’, अशी मी श्री नारायणाच्‍या चरणी प्रार्थना करतो.’

– (परात्‍पर गुरु) डॉ. आठवले (१२.९.२०२३)

मायेतून अलिप्‍त आणि अखंड नामजप करणार्‍या पू. (श्रीमती) आंडाळ रंगनायकाचार्युलू आरवल्ली  !

भाग्‍यनगर, तेलंगाणा येथील साधिका सौ. तेजस्‍वी प्रसन्‍ना वेंकटापूर यांना त्‍यांच्‍या आजी (आईची आई) श्रीमती आंडाळ आरवल्ली (वय ८७ वर्षे) यांची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

(‘आंडाळ’ हे विष्‍णुपत्नीचे नाव आहे. )

सौ. तेजस्‍वी वेंकटापूर

१. गुणवैशिष्‍ट्ये

१ अ. समंजस : ‘आजींची सून, म्‍हणजे माझी मामी सौ. राधिका आरवल्ली हिला कधी अधिक काम असले किंवा तिची प्रकृती बरी नसली, तर आजी तिला समजून घेतात.

१ आ. प्रेमभाव : घरी कुणीही आले, तर त्‍यांना काहीतरी खाऊ दिल्‍याविना आजी परत पाठवत नाहीत. त्‍या सर्वांची प्रेमाने विचारपूस करतात.

१ इ. मिताहारी : देवाला नैवेद्य दाखवण्‍यासाठी मामी अनेक पदार्थ करते; परंतु आजी कोणत्‍याच पदार्थांच्‍या चवीत अडकून अधिक भोजन करत नाहीत. जेवढे पचेल, तेवढेच त्‍या खातात. त्‍या म्‍हणतात, ‘‘जगण्‍यासाठी भोजन आवश्‍यक आहे; परंतु भोजनासाठी आपले जीवन नाही.’’

१ ई. मायेतून अलिप्‍त : आजींच्‍या मनात ‘भाऊ-बहीण यांनी विचारपूस करावी किंवा भेटायला यावे’, अशी अपेक्षा नसते. नातेवाइकांविषयी त्‍यांच्‍या मनात भावनात्‍मक विचार येत नाहीत. ‘माझा संबंध केवळ भगवंताशीच आहे’, असा त्‍यांचा भाव असतो.

१ उ. अत्‍यल्‍प अहं : आजींना त्‍यांच्‍या अनुभवाचा लेशमात्रही अहंकार नाही. त्‍या सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत असतात.

१ ऊ. परिस्‍थिती स्‍वीकारणे

१. आजींना श्रवणयंत्र लावल्‍याविना ऐकू येत नाही. अलीकडेच त्‍यांचे श्रवणयंत्र बिघडले. कानाच्‍या तज्ञ आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘या श्रवणयंत्राची दुरुस्‍ती होणे कठीण आहे.’’ यापेक्षा उच्‍च दर्जाचे श्रवणयंत्र खरेदी करण्‍याएवढी आजींची आर्थिक ऐपत नाही; मात्र त्‍यांनी या परिस्‍थितीविषयी कधीच गार्‍हाणे केले नाही.

२. मामा-मामी काही कामानिमित्त बाहेरगावी जातात. तेव्‍हा त्‍यांचे शेजारी आजींची काळजी घेतात. शेजार्‍यांची भोजन बनवण्‍याची पद्धत वेगळी असल्‍यामुळे आजींची थोडी अडचण होते, तरी त्‍या कुठलेही गार्‍हाणे करत नाहीत. आजी ती परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारतात.

१ ए. अखंड नामजप करणे : ‘सकाळी उठून आवरणे, नामजप आणि भोजन करणे अन् नंतर विश्रांती घेणे’, अशी आजींची दिनचर्या आहेे. त्‍या प्रतिदिन ३ घंटे बसून स्‍तोत्रपठण आणि मंत्रजप करतात. शारीरिक त्रास होत असतांना, तसेच पलंगावर पहुडल्‍यावरही त्‍यांचा नामजप चालूच असतो. नामजप करत असतांना त्‍यांना भ्रमणभाष आला, तर त्‍या सांगतात, ‘‘आता मी नामजप करत आहे. मी तुमच्‍याशी नंतर बोलते.’’ कधी कधी त्‍या गुरुदेवांनी सांगितलेला ‘निर्विचार’ हा नामजप विसरतात. तेव्‍हा त्‍या आमच्‍यापैकी कुणाला तरी विचारून त्‍वरित तो नामजप करतात.

१ ऐ. श्रद्धा

१ ऐ १. आयुर्वेदीय वैद्यांवर श्रद्धा : आजींना चालतांना पायांत वेदना होतात. त्‍यासाठी त्‍या आयुर्वेदीय औषधेच घेतात; कारण वैद्यांवर त्‍यांची श्रद्धा आहे. ‘या श्रद्धेमुळेच ते औषध त्‍यांना लागू पडते’, असे आमच्‍या लक्षात आले.

१ ऐ २. ‘सनातनची सात्त्विक उदबत्ती किंवा यज्ञ यांची विभूती लावल्‍यावर सर्व त्रास दूर होणार’, अशी दृढ श्रद्धा असणे : कुठलाही शारीरिक त्रास होत असतांना आजी त्‍या ठिकाणी सनातनच्‍या सात्त्विक उदबत्तीची किंवा आश्रमात करण्‍यात आलेल्‍या यज्ञाची विभूती लावतात. ‘विभूती लावल्‍यामुळे माझे सर्व त्रास उणावतात’, असे त्‍या दृढ श्रद्धेने सांगतात. आम्‍ही त्‍यांच्‍याकडे जाणार असू, तेव्‍हा त्‍या आम्‍हाला विचारतात, ‘‘तुम्‍ही तुमच्‍या समवेत विभूती घेतली आहे ना ?’’ आणि आम्‍ही समवेत विभूती घेतल्‍याची त्‍या निश्‍चिती करून घेतात. कधी आमच्‍या गावातून कुणी त्‍यांच्‍या गावी जाणार असतील, तेव्‍हाही आजी आम्‍हाला त्‍यांच्‍या समवेत विभूती पाठवण्‍यास सांगतात.

१ ओ. कृतज्ञताभाव : भगवंत आणि पूर्वज यांच्‍याप्रती आजींच्‍या मनात सदैव कृतज्ञताभाव असतो. ज्‍या साधिकेने आजींना सनातन संस्‍थेची साधना पहिल्‍यांदा सांगितली, त्‍या साधिकेची आठवण ठेवून आजी आजही तिच्‍याप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करतात. मामी आजींची सेवा चांगली करते. आजी आमच्‍यासमोर तिचे कौतुक करतात.

१ औ. सकाळी घराचे मुख्‍य दार उघडतांना लक्ष्मीदेवीचे भावपूर्ण स्‍वागत करणार्‍या आजी ! : सकाळी उठल्‍यानंतर घराचे मुख्‍य दार उघडतांना आजी ‘लक्ष्मीदेवीने घरात प्रवेश करावा’, यासाठी तिचे स्‍वागत करतात. त्‍या देवीला सांगतात, ‘तू सर्वालंकारांनी भूषित होऊन ‘छुम, छुम’, आवाज करणारे पैंजण पायात घालून ये आणि घरात होणार्‍या पूजेचा आनंदाने स्‍वीकार कर.’

२. आजींमध्‍ये जाणवलेले पालट

२ अ. ‘पूर्वीपेक्षा आजींचा चेहरा अधिक तेजस्‍वी दिसतो.

२ आ. बोलणे न्‍यून करणे : आजींना दम्‍याचा त्रास असल्‍यामुळे वैद्यांनी त्‍यांना ‘अधिक बोलू नका’, असे सांगितले आहे. आजींना पूर्वीपासून सर्वांशी बोलण्‍याची सवय आहे; मात्र वैद्यांनी सांगितल्‍यावर आजींनी त्‍यांचे बोलणे न्‍यून करून या वयात स्‍वतःमध्‍ये पालट केला आहे.

२ इ. चैतन्‍यामुळे आजींचे केस सोनेरी होणे : ‘आजींच्‍या साधनेमुळे त्‍यांच्‍यातील चैतन्‍याचे प्रमाण वाढले आहे’, असे मला जाणवते. ‘पूर्वी त्‍यांचे केस पांढरे होते. काही वर्षांपूर्वी ते सोनेरी झाले आणि आता त्‍यांच्‍या केसांना रेशमी रंग आला आहे’, असे लक्षात आले. हे सर्व पाहून ‘आजींची आध्‍यात्मिक प्रगती झाली आहे’, असे मला जाणवते.’

– सौ. तेजस्‍वी वेंकटापूर, भाग्‍यनगर, तेलंगाणा. (२७.३.२०२३)