पुणे – गेल्या अनेक वर्षांपासून जुनी सांगवी येथील ७६ गाळे असणारे महापालिकेचे ‘राजीव गांधी भाजी मार्केट’ सध्या धूळखात पडून आहे. ढिम्म प्रशासन आणि सुस्त लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे सांगवीतील भाजीमंडई काही अपवाद वगळता गेली १५ वर्षांपासून बंद आहे. अपुरे आणि छोटे गाळे, गाळ्यांच्या संख्येच्या तुलनेत तिपटीने असणारे भाजीविक्रेते, महापालिकेचे न परवडणारे भाडे अन् गल्लोगल्ली फेरी करून होणारी भाजी विक्रीचा परिणाम यांमुळे भाजी विक्रेत्यांनी मंडईकडे पाठ फिरवली आहे. महापालिकेकडून आणि तत्कालीन लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकारातून २ वर्षांपूर्वी येथील डागडुजी, सुशोभीकरण करून भाजीमंडई चालू करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र पुन्हा काही दिवसांनंतरच भाजी विक्रेत्यांनी भाजीमंडईकडे पाठ फिरवली. यामुळे सुशोभीकरणाचा खर्च वाया गेला आहे. (हे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा परिणाम नाही तर काय ? ‘संबंधित अधिकार्यांकडून हा व्यय वसूल केला पाहिजे’, असे जनतेला वाटते. – संपादक) यावर क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे यांनी सांगितले की, येथील परिस्थितीची माहिती घेतलेली आहे. गाळे अपुरे आणि बंदीस्त आहेत. भाजी विक्रेत्यांशीही चर्चा करण्यात आली आहे. स्थापत्य विभागाशी चर्चा करून, सर्वांच्या समन्वयातून मार्ग काढला जाईल.
संपादकीय भूमिकाभाजीमंडई धूळखात ठेवायची होती, तर ती बांधलीच का ? |