मुंबईमध्‍ये १ लाख गणसेवक करणार गणेशोत्‍सवाची सुरक्षा !

(‘गणसेवक’ म्‍हणजे गणेशोत्‍सवाच्‍या काळात सुरक्षेसाठी कार्य करणारे)

मुंबई – सार्वजनिक गणेशोत्‍सवाच्‍या ठिकाणी कायदा आणि सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी मुंबईतील सर्व सार्वजनिक गणेशोत्‍सवाच्‍या ठिकाणी गणसेवकांची नियुक्‍ती करण्‍याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्‍यात आला आहे. यासाठी १ लाख गणसेवक सिद्ध करण्‍यात येणार आहेत. १२ सप्‍टेंबर या दिवशी मुंबई पोलीस आणि ‘बृहन्‍मुंबई सार्वजनिक गणेशोत्‍सव समन्‍वय समिती’ यांच्‍यात झालेल्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला.

या बैठकीला मुंबईचे पोलीस आयुक्‍त विवेक फणसाळकर यांसह ‘बृहन्‍मुंबई सार्वजनिक गणेशोत्‍सव समन्‍वय समिती’चे पदाधिकारी उपस्‍थित होते. यामध्‍ये मोठ्या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांमध्‍ये २०, तर लहान मंडळांमध्‍ये १० गणसेवकांची नियुक्‍ती केली जाणार आहे.

‘गणेशोत्‍सवाच्‍या कालावधीत भाविकांची होणारी गर्दी आणि त्‍यातून पोलिसांवर येणारा ताण अल्‍प व्‍हावा’, यासाठी हा निर्णय घेण्‍यात आला आहे. ‘बृहन्‍मुंबई सार्वजनिक गणेशोत्‍सव समन्‍वय समिती’ने पोलीस आयुक्‍तांना याविषयीचा प्रस्‍ताव दिला होता. गणसेवकांना पोलिसांकडून प्रशिक्षण, तसेच ओळखपत्र देण्‍यात येणार आहे. गणेशोत्‍सवाचा मंडप आणि आजूबाजूचा परिसर येथे गणसेवक लक्ष ठेवणार आहेत. सुरक्षेच्‍या दृष्‍टीने गणेशोत्‍सवाच्‍या काळात मुंबईमध्‍ये सहस्रावधी पोलिसांचा पहाराही असणार आहे.