काही तरी असेल आमच्‍यात की, आमचे अस्‍तित्‍व तरीही संपतच नाही !

काहीही बडबडायला केवळ तीन गोष्‍टी आवश्‍यक असतात. तोंडात जीभ, स्‍वरयंत्र आणि बोलण्‍यासाठी शक्‍ती ! यात अभ्‍यास, वाचन, चिंतन, सत्‍यता पारखणे आदींची आवश्‍यकता नसते, असे मूर्ख वक्‍तव्‍य करणार्‍यांना वाटते. त्‍यात आपल्‍याकडे राजकारणी आणि अभिनय क्षेत्रात काम करणार्‍यांना कित्‍येक जण विचारवंत समजतात ! त्‍यातून अविचाराने केलेल्‍या मूर्ख आणि बाष्‍कळ बडबडीला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीही मिळते. ती मिळत असतांना आपण ‘सेल्‍फ गोल’ (लक्ष्य केंद्रित) करत आहोत का ? याचे भानही बडबडकर्त्‍याला रहात नाही. याची अलीकडच्‍या काळात घडलेली अनेक उदाहरणे आहेत. तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅलीन याच्‍या निमित्ताने एकदा राजकीय मंडळींच्‍या बेताल बोलावरही दृष्‍टी टाकू, म्‍हणजे यात एखादा छुपा ‘अजेंडा’ (षड्‍यंत्र) दडला आहे कि हा निव्‍वळ तोंडाळपणा ? याचा जनसामान्‍यांना सहज विचार करता येईल.

अ. स्‍वामी प्रसाद मौर्य, समाजवादी पक्ष : हिंदु हा धर्म नसून ती एक फसवणूक आहे.

आ. चंद्रशेखर यादव, राष्‍ट्रीय जनता दल : रामायण द्वेष शिकवते आणि इस्‍लाम मोहब्‍बत (प्रेम) !

इ. सतिश जारकीहोळी, काँग्रेस : हिंदू हा शब्‍द फारसी असून त्‍याचा अर्थ ‘घाणेरडा’ आहे.

ई. राजेंद्र पाल गौतम, आम आदमी पक्ष : हिंदु देवीदेवता खोट्या असून ब्रह्मा, विष्‍णु, महेश, सरस्‍वती, दुर्गा असे काही नसते.

उ. छगन भुजबळ, राष्‍ट्रवादी काँग्रेस : सरस्‍वतीने आम्‍हाला कधी शिकवले नाही, मग तिची पूजा कशासाठी ?

ऊ. उदयनिधी स्‍टॅलिन, द्रमुक : सनातन धर्मामध्‍ये समानता नसल्‍यामुळे त्‍याचे समूळ उच्‍चाटन होणे आवश्‍यक आहे.

ए.  ए. राजा, द्रमुक : सनातन धर्म म्‍हणजे एड्‍स वा कुष्‍ठरोगासारखा आहे, त्‍याला नष्‍ट करायला हवे.

ही काही उदाहरणे झाली. तत्‍कालीन ‘युपीए सरकार’ने (संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्‍या सरकारने) तर श्रीराम झाले नसल्‍याचा युक्‍तीवाद न्‍यायालयासमोर केला होता. यातील भुजबळ वगळता अन्‍य सगळे जण हे ‘इंडिया’ (I.N.D.I.A.) या नूतन आघाडीचे घटक आहेत. यातील कुणीही उदयनिधीच्‍या वक्‍तव्‍याचा जाहीर निषेध करण्‍याचे धाडस अद्याप तरी दाखवलेले नाही. ‘ही आघाडी हिंदुद्वेषी लोकांनी भरली आहे, असा प्रचार भाजप करणार’, हे स्‍वच्‍छ आहे. एकूण या वक्‍तव्‍यामुळे उदयनिधीने ‘सेल्‍फ गोल’ केला आहे.

डॉ. सच्चिदानंद शेवडे, लेखक-व्याख्याते

१. हिंदुद्वेषी नेत्‍यांनी स्‍वतःचीच केलेली फसगत !

अहो खलभुजङ्‌गस्‍य विचित्रोऽयं वधक्रमः ।
अन्‍यस्‍य दशति श्रोत्रमन्‍यः प्राणैर्वियुज्‍यते ॥

अर्थ : दुष्‍ट मनुष्‍यरूपी सापाची मारण्‍याची रित केवढी विचित्र आहे ! तो (वेगळ्‍याच) एकाच्‍या कानात (चाहाडीचे विष घालून) चावतो (आणि ज्‍याच्‍याविषयी चाहाडी केली असेल तो), दुसराच प्राणांना मुकतो.

आता अशी अवस्‍था मोदी विरोधकांची होणार आहे. ‘थांबा, विचार करा आणि व्‍यक्‍त व्‍हा’, या गोष्‍टी विरोधकांच्‍या गावीसुद्धा नसाव्‍यात, याचे आश्‍चर्य वाटते. आताही १८ सप्‍टेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले; म्‍हणून यांनी गणेशोत्‍सवाच्‍या नावावर आरडाओरडा केला. ‘मोदी कसे हिंदु उत्‍सवविरोधी आहेत’, याची आवई उठवली. त्‍याच उत्‍सवाच्‍या दिवसापासून नव्‍या संसद इमारतीत अधिवेशन भरणार असून बुद्धीदात्‍या देवतेचा सन्‍मानच पंतप्रधानांनी केल्‍याचे दाखवून सर्व विरोधकांचे दात घशात घातले ! ‘तुमचे विरोधक जेव्‍हा आत्‍महत्‍या करायचे ठरवतात, तेव्‍हा त्‍यांना थांबवायचे नसते’, असे म्‍हटले जाते. उदयनिधी आणि अन्‍य वायफळ बडबड करणारे विरोधी नेते तेच करत आहेत, याची एकाही नेत्‍याला जाणीव होऊ नये, याचा विस्‍मय (आश्‍चर्य) वाटतो.

२. रामसामी पेरियर यांची द्रविडी चळवळ आणि तिला लागलेली ओहोटी !

द्रमुक नेते हे रामसामी पेरियर याच्‍या विचारांचे असल्‍याची टिमकी वाजवत असतात. पेरियारने जे मांडले आहे, त्‍याला विचार म्‍हणणे, म्‍हणजे ‘विचार’ या शब्‍दाचे अवमूल्‍यन केल्‍यासारखे होईल. ‘सातत्‍याने देवादिकांना शिव्‍या घालत ‘स्‍वतंत्र द्रविडस्‍तान’ची मागणी रेटत रहाणे. हिंदी भाषा म्‍हणजे उत्तरेतील आर्यांची भाषा द्रविडी लोकांवर लादण्‍याचे षड्‌यंत्र आहे, इथपासून ते ब्राह्मण हेच जातीव्‍यवस्‍थेचे मूळ आहेत’, अशी अनैतिहासिक मांडणी करणारे लेखन हेच पेरियरचे कार्य होय. स्‍वराज्‍य मिळण्‍याच्‍या काळात त्‍याला पाकिस्‍तानप्रमाणे ‘स्‍वतंत्र द्रविडस्‍तान’ निर्माण करायचा होता. या मागणीला तेथील जनतेने अजिबात साथ दिली नाही. प्रभु श्रीराम आणि भगवती सीता यांच्‍याविषयी अत्‍यंत शिवराळ टीका करत त्‍यांच्‍या छायाचित्रांना जोडे मारण्‍याची कामगिरी या महाशयांनी केली होती. पेरियरच्‍या हयातीतच करुणानिधी (तमिळनाडूचे माजी मुख्‍यमंत्री एम्. करुणानिधी) आणि एम्.जी.आर्. (तमिळनाडूचे माजी मुख्‍यमंत्री एम्.जी. रामचंद्रन्) यांच्‍यात संघर्ष उभा राहिला. परिणामी द्रविड चळवळ फुटली. पुढे दोघांनी स्‍वतःचे वेगळे पक्ष काढले. पेरियरना स्‍वतःच्‍या हयातीतच आपल्‍या लोकप्रियतेला ओहोटी लागल्‍याचे पहावे लागले. ईश्‍वर, धर्म, ब्राह्मण, काँग्रेस, गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यावर भरपूर टीका करणे, हेच त्‍यांचे उद्योग होते.

३. उदयनिधी यांनी हिंदु धर्माविषयी सांगितलेले विचार (?) म्‍हणजे स्‍वतःच्‍या अकलेचे तारे तोडणे !

हे सांगण्‍याचे कारण, म्‍हणजे उदयनिधीची विचार (?) परंपरा जाणून घेणे होय. त्‍याच्‍या वडिलांचे नाव स्‍टॅलिन. रशियात लक्षावधी लोकांना ठार करणार्‍या स्‍टॅलिनचे नाव आपल्‍या सुपुत्राला ठेवण्‍यामागे करुणानिधींचा काय उद्देश होता, तेच जाणोत ! तोंडाने सतत राज्‍यघटना आणि लोकशाही मूल्‍ये यांचा गजर करत हिंसाचाराचे समर्थन करणे, हे अशा लोकांचे वैशिष्‍ट्य असते. साम्‍यवादी विचारधारा हेच शिकवते. ‘लोकांच्‍या श्रद्धा खुशाल ठोकरा; पण त्‍याच वेळी लोकशाहीचा उदो उदो करण्‍याची काळजी घ्‍या’, ही या नास्‍तिकवादी म्‍हणवणार्‍या लोकांची कार्यपद्धत असते.

उदयनिधी हा सिनेअभिनेता आणि वितरक असून सांप्रत काळात त्‍याच्‍या वडिलांच्‍या मंत्रीमंडळात क्रीडामंत्री आहे. तो नास्‍तिकवादी मंचावर बोलायला गेला होता. सनातन निर्मूलन परिषदेत त्‍याने आपल्‍या अकलेचे तारे तोडले. मंत्री असतांना घेतलेल्‍या शपथेचेही अशा वेळी सोयीस्‍कर विस्‍मरण होत असावे. आर्य, सनातन, वैदिक, हिंदु अशा वेगवेगळ्‍या नावाने हा धर्म ओळखला जातो, हे त्‍याला माहिती असण्‍याचे काही कारण नाही. आर्य म्‍हणजे सभ्‍य, सुसंस्‍कृत, सुशिक्षितांचा धर्म होय ! सनातन म्‍हणजे जो कधी निर्माण झाला, ते ठाऊक नाही; पण जो कधीही नष्‍ट होणार नाही, असा नित्‍य नूतन धर्म ! वेद हे ज्‍याचे मूळ आहेत; म्‍हणून वैदिक धर्म आणि जो आपल्‍यातील हीन दूर करतो, असा म्‍हणून हिंदु धर्म होय. वस्‍तूतः धर्माला नाव नसते. हे सर्व त्‍या बिचार्‍याला ठाऊक असण्‍याची काही शक्‍यता नाही.

४. उदयनिधी यांची अन्‍य धर्मांविषयी अळीमिळी गूपचिळी !

‘सनातन धर्मात समानता नाही’, असे म्‍हणणार्‍या उदयनिधीला समानता कोणत्‍या धर्मात आहे, ते सांगता आले नाही. इस्‍लाममध्‍ये अनेक पंथ आहेत. यातील काहींमधून तर विस्‍तवही जात नाही. ते एकमेकांची प्रार्थनागृहे नष्‍ट करतात, तर काहींना ते मुसलमानही मानत नाही. ख्रिस्‍त्‍यांमध्‍ये समानता असती, तर खुद्द दक्षिणेत दलित ख्रिस्‍त्‍यांसाठी वेगळी चर्चेस का आहेत ? तथापि असे प्रश्‍न विचारायचे नसतात. सनातन धर्म समजूनही न घेता त्‍यावर वाटेल तसे आणि निरर्गल (बेछूट) भाषेत टीका करणे पुष्‍कळ सोपे असते. अन्‍यांवर टीका केली, तर थेट मृत्‍यूभय असते ना, ही त्‍याच्‍यासारख्‍याची अडचण आपण समजून घेतली पाहिजे; पण हे टीकाकार एक गोष्‍ट मात्र विसरतात की,

यूनान रोम मिस्र, सब मिट गए जहां से ।
फिर भी अभी है नामोनिशां हमारा ।
कुछ तो बात है कि हस्‍ती मिटती नहीं हमारी ।
दुश्‍मन रहा है दौर-ए-जहां हमारा ॥

(युनान, रोम आणि मिस्र यांसारख्‍या संस्‍कृती या पृथ्‍वीवरून नष्‍ट झाल्‍या, तरीही त्‍याहूनही प्राचीन असलेला सनातन धर्म अजूनही टिकून आहे. काही तरी असेल आमच्‍यात की, आमचे अस्‍तित्‍व तरीही संपतच नाही; जरी पूर्ण विश्‍व आमच्‍या विरुद्ध राहिले आहे.) यातील ‘कुछ बात’, म्‍हणजे नेमकी कोणती ते समजून घ्‍यायला बहुधा शिकवणी लावावी लागेल !

५. हिंदु धर्मासारखी भावना अन्‍य धर्मांमध्‍ये आहे का ?

‘वसुधैव कुटुम्‍बकम्’ (संपूर्ण पृथ्‍वी हेच कुटुंब आहे), ही संपूर्ण जगाविषयी भावना ठेवणारे सनातन धर्मीयच असतात. ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्‍तु’, अशी सर्व प्राणिमात्रांच्‍या सौख्‍याची प्रार्थना करणारेही सनातनीच असतात. जगातील सर्वांना, मग ते कोणत्‍याही धर्माचे वा पंथाचे असोत, उत्तम गती मिळावी म्‍हणून प्रतिदिन जल अर्पण करत प्रार्थना करणारेही सनातन धर्माचा निर्वाह करणारे असतात. यातील एक तरी भावना जगातील कोणत्‍याही धर्माची असते का ?

माणसांमधील भेदभावांना राजकारण्‍यांनी जोपासले आणि वाढवले, हे सत्‍य नाकारता येण्‍यासारखे आहे का ? सनातन धर्माने पुष्‍कळ परिवर्तन घडवून आणले. अन्‍य धर्मांमधील परिवर्तनाविषयी नुसते बोलून पहा ! ‘जो माझ्‍या धर्माचा नाही, त्‍याला कायम नरकात जावे लागते’, असा विचार सनातन धर्मात नाही.

६. …तोवर उशीर झालेला असेल !

उदयनिधीचे आजोबा वैदिकांना (पुरोहितांना) बोलावून वेदोच्‍चारण करवून घेतात, त्‍याच्‍या मातोश्री वेगवेगळ्‍या मंदिरात दर्शनासाठी जातात आणि दानधर्म करतात. इथे हे सुपुत्र मात्र लोकसभा निवडणुकांच्‍या ऐन भरात ‘सेल्‍फ गोल’ करण्‍यात मग्‍न आहेत. त्‍यांचे मित्र पक्ष घोर निद्रेत आहेत. तमिळनाडूतील निवडणुकीच्‍या जागा (सीट्‍स) राखून देशातील सत्ता मिळत नसते, हे या सर्वांच्‍या लक्षात येईल, तोवर उशीर झालेला असेल !

– डॉ. सच्‍चिदानंद शेवडे, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली. (१०.९.२०२३)

(साभार : फेसबुक)