‘सर्व पालक आपल्या पाल्याच्या आरोग्याविषयी जागृत असतातच; परंतु कधी अज्ञानामुळे किंवा अजाणतेपणी आपल्याकडून झालेल्या चुका या आपल्या मुलांच्या आरोग्यास बाधा आणणारे ठरते. आजच्या लेखात आपण आपल्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काय करायला हवे ? ते वाचणार आहोत.
१. ‘मूल दिसायला गुटगुटीत, म्हणजे त्याची तब्येत चांगली’, हा गैरसमज !
‘आपल्याकडे एकमेकांना भेटल्यावर तब्येत कशी आहे ?’, असे विचारले जाते. समोरची व्यक्ती बारीक दिसली की, ‘सगळे बरे आहे ना ? वजन कमी झाले म्हणून विचारले’, असे म्हणतात. तसेच लहान मुलांविषयीही होते. मूल दिसायला जरा बारीक असेल, तर आई आणि घरातील सर्व मंडळींचा एकच चिंतेचा विषय असतो, तो म्हणजे मूल तब्येतीने कसे चांगले होईल ? मग ते मूल गुटगुटीत कसे होईल ? यासाठी जे जे पर्याय मिळतील, ते सर्व प्रयोग मुलांवर चालू होतात. इथे लक्षात घेण्यासारखे सूत्र हे की, मुले काटक असतील, छान खेळत असतील, आजारी पडण्याचे प्रमाण कमी असेल, भूक लागल्यावर व्यवस्थित जेवत असतील, तर फक्त बारीक आहे; म्हणून काळजी करण्याचे काही कारणच नसते.
काळजी कधी करावी ? तर मूल सारखे आजारी पडत असेल, जेवण करेनासे झाले असेल, चिडचिड करत असेल, खेळण्यात रमत नसेल, तर वैद्यकीय साहाय्य नक्कीच घ्यावे; परंतु ‘केवळ बारीक आहे’; म्हणून त्याला अतीप्रमाणात खाऊ घालण्याची चूक करू नये. बरेच पालक मुलांना तब्येत सुधारावी; म्हणून भरपूर सुका मेवा, वरचेवर फळे खायला देतात, त्यावर ‘दूधही संपवलेच पाहिजे, जेवणाचे ताटही स्वच्छच असले पाहिजे’, असा आग्रह धरतात. या आग्रहास्तव मुलांची तब्येत तर सुधारत नाहीच, उलट पचनक्रिया बिघडून आजार निर्माण व्हायला लागतात.
२. मुलांच्या पालनपोषणाविषयी मातेची जागरूकता फार महत्त्वाची !
मुले अंगकाठीने बारीक असली की, त्या मुलाच्या आईला घरातील सर्व मंडळी पुष्कळ पर्याय सुचवत असतात. सर्वांच्या दबावाखाली येऊन आई आपल्या मुलावर सगळे प्रयोग करायला प्रारंभ करते. ‘चिऊ काऊचा घास’, असे करत भरवणे, वेळप्रसंगी भ्रमणभाषवर गाणी लावून मूल त्यात रमले की, ताटात जे वाढले असेल ते संपवते. अशा चुकीच्या गोष्टी केवळ मूल दिसायला बारीक आहे म्हणून होत असतात. प्रत्येक आईला आपल्या मुलाची प्रकृती कशी आहे, याची जाण निसर्गतः असते किंवा ती अनुभवातून शिकते. ‘आपल्या बाळासाठी काय आवश्यक आहे ? काय घातक आहे ?’, याविषयी प्रत्येक आईने जागरूक राहून आणि योग्य तो अभ्यास करून त्याप्रमाणे आचरण करावे. वेळप्रसंगी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. इतरांनी सुचवलेले पर्याय हे त्यांच्या मुलांना लागू झाले, म्हणजे आपल्या मुलांना लागू होतीलच, असे नाही; कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते; म्हणून सरसकट एकच नियम सर्वांना लागू होत नाही. तेव्हा कुणाच्या दबावाखाली येऊन आईने आपल्या मुलांवर प्रयोग न करता योग्य काय असायला हवे, हे वैद्यांकडून जाणून घ्यावे आणि त्याप्रमाणे कृती करावी.
३. आपल्या मुलाची तुलना इतर मुलांशी करू नये !
सर्वाधिक आढळून येणारी समस्या, म्हणजे आपल्या पाल्याची दुसर्या पाल्याशी केली जाणारी तुलना ! ‘तो बघ कसा २ पोळ्या खातो, तूही तेवढी संपवलीच पाहिजे’, किंवा ‘तो बघ कसा गुटगुटीत आहे. मग तू तसा कधी होणार ?’, असे एक ना अनेक उदाहरणे देता येतील. या तुलनेमुळे आपण आपल्या पाल्याच्या आरोग्याच्या तक्रारी विनाकारण वाढवून बसतो. आपले मूल आपल्याला काय सांगत आहे, ते समजणे अधिक महत्त्वाचे !
४. मुलांचे आरोग्य राखण्यासाठी कष्ट घेणे महत्त्वाचेच !
एकदा माझ्या चिकित्सालयामध्ये आलेल्या एका आईने ‘तिचे मूल काहीच खात नाही’, अशी तक्रार केली. बोलता बोलता आईने सांगितले, ‘मूल जेवायला अधिक वेळ लावते म्हणून त्याने पटपट जेवावे, यासाठी मी पोळी कुस्करून आणि त्यात वरण घालून त्याला खाऊ घालते, जेणेकरून त्याचे जेवण लवकर उरकेल.’ हे मूल साडेतीन वर्षांचे होते. या वयाचे मूल व्यवस्थित चावून जेवू शकते; परंतु आयती कुस्करलेली पोळी दिल्याने ते मूल पटापट घास गिळत होते. त्यामुळे तोंडातील लाळ अन्नात नीट मिसळली जात नव्हती. पदार्थांची चव तर त्या मुलाला कळतही नव्हती. असे प्रतिदिन जेवल्याने त्याला अजीर्ण झाले आणि म्हणून ते मूल जेवेनासे झाले. आपल्या अन्नपचनाचा प्रारंभ हा जिभेपासून होतो. तोंडातील लाळ अन्नात मिसळणे, ही पहिली प्रक्रिया होणे किती महत्त्वाचे आहे ? हे यातून आपल्याला लक्षात येईल. ‘मूल पटापट कसे जेवेल ? यापेक्षा मूल अन्नाची चव घेऊन कसे जेवेल’, याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. इथे मूल जेवायला वेळ घेते, ही तक्रार अयोग्य आहे. मुलांमध्ये अन्नाची रुची निर्माण करण्यासाठी पालकांना कष्ट हे घ्यावेच लागतात.
५. मुलांना आयते मिळणारे पदार्थ (रेडी टू ईट) खायला देण्यापेक्षा घरी सिद्ध केलेले पदार्थ खाऊ घालावेत !
मुलांची भुकेची वेळ झाल्यानंतर लगेच काहीतरी खायला हवे; म्हणून दुधात बिस्किट घालून देणे, दोन मिनिटात सिद्ध होणारे इन्स्टंट पदार्थ (मॅगी), फ्रोजन (गोठवलेले) पदार्थ असे देण्यापेक्षा घरी केलेले शेंगदाणा लाडू, भाजलेल्या कणकेचे लाडू, राजगिरा लाडू, गूळ फुटाणे, एखादी काजू बी किंवा १-२ बदाम असे खाऊ मुलांना द्यावेत. आतापर्यंत जेवढ्या काही लहान मुलांच्या आईंशी मी बोलले, त्या प्रत्येकीच्या तोंडून मी ‘बाहेर मिळणारे इन्स्टंट पदार्थ मुलांना दिले जातात’, हेच ऐकले आहे. अर्थात् त्याचे प्रलोभन सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. आजकाल नियम पाळून जगणारी व्यक्ती हास्यास्पद ठरत चालली आहे; पण आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच कोणते पदार्थ खाण्यायोग्य आणि कोणते पदार्थ आरोग्यासाठी हानीकारक, हे सतत बिंबवले पाहिजे.
मुलांच्या जेवणाच्या वेळा ओळखून त्या वेळी व्यवस्थित जेवायला वाढावे. मधल्या वेळेत भूक लागल्यास लेखात उल्लेख केल्याप्रमाणे खाऊ द्यावा. जेवणाच्या वेळी अन्य कोणताही खाऊ देण्याचे टाळावे. आयत्या मिळणार्या खाद्यपदार्थांचे दुष्परिणाम जाणून आईने आपल्या मुलांच्या आहाराचे नियोजन करावे आणि त्याप्रमाणे त्यांच्या आहारात अधिकाधिक घरगुती पदार्थ कसे येतील, ते पहावे. इथे आईची भूमिका ही फार महत्त्वाची असते. दुधात बिस्कीट घालून देणे, हा सर्वांत सोपा मार्ग असला, तरी त्याचे मुलांवर होणारे दुष्परिणाम जाणून आईने आपल्या मुलासाठी योग्य ते पदार्थ बनवण्यासाठी कष्ट घेणे महत्त्वाचे असते.
६. मुलांच्या आहाराचे नियोजन करणे महत्त्वाचे !
आहाराचे नियोजन, म्हणजे आपल्या मुलांना दिवसातून किती वेळा भूक लागते ? त्यातील दोन वेळा तरी मूल व्यवस्थित जेवत आहे ना ? ते पहावे. जेवल्यानंतर किती घंट्यांनी भूक लागते ? तेव्हा आपण कोणता खाऊ द्यायला हवा ? जेवणाच्या थोडा वेळ आधीच भूक लागली, तर कोणता खाऊ द्यावा, जेणेकरून त्याच्या जेवणावर परिणाम होणार नाही, असे नियोजन करणे आवश्यक आहे. आहाराचे नियोजन असेल, तर आयत्या मिळणार्या पदार्थांची आवश्यकता भासणार नाही. घरातील सर्वांनी जेवणाच्या वेळा पाळल्या, तर मुलांनाही वेळेत जेवण करण्याची सवय लागते.
अशा प्रकारे आपण मुलांच्या खाण्या-पिण्याविषयी कोणत्या चुका करत असतो, ते बघितले. आपली पुढची पिढी आरोग्यमय असणे, हीसुद्धा आताच्या पिढीचे नैतिक दायित्व आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.’
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (११.९.२०२३)