धर्मांतरविरोधी कायद्यासाठी अधिवेशनामध्‍ये लक्षवेधी मांडू ! – राम सातपुते, आमदार, भाजप

हडपसर (पुणे) येथील धर्मांतराच्‍या विरोधात हिंदू जनगर्जना मोर्चा !

मोर्चासाठी उपस्थित धर्मप्रेमी

पुणे – हिंदु धर्मातील गरीब, आर्थिकदृष्‍ट्या मागास असलेल्‍या व्‍यक्‍तींना लक्ष करून त्‍यांचे धर्मांतर केले जाते. त्‍यासंदर्भात पोलीस ठाण्‍यात तक्रार करूनही पोलीस दुर्लक्ष करतात. त्‍याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. ‘राज्‍यात धर्मांतरविरोधी कायदाही तात्‍काळ लागू करण्‍यात यावा, यासाठी अधिवेशनामध्‍ये लक्षवेधी मांडू’, असे आश्‍वासन भाजपचे आमदार राम सातपुते यांनी दिले. सकल हिंदु समाजाच्‍या वतीने १० सप्‍टेंबर या दिवशी हडपसर येथे धर्मांतराच्‍या विरोधात ‘हिंदू जनगर्जना मोर्चा’ काढण्‍यात आला. त्‍या वेळी मगरपट्टा चौकामध्‍ये झालेल्‍या ‘जागृती सभे’मध्‍ये आमदार सातपुते बोलत होते. या मोर्चामध्‍ये भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे, तसेच हिंदु बांधव मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते.

सातपुते पुढे म्‍हणाले की, धर्मांतरासाठी रचलेल्‍या सापळ्‍यात अनेक हिंदू अडकत आहेत. हडपसर येथील शिंदे वस्‍तीतील एका महिलेला धर्मांतरप्रकरणी त्रास होत आहे. त्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍याची मागणी करूनही तो न करता उलट त्‍या हिंदु महिलेवर गुन्‍हा नोंद केला जात आहे. हडपसर पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक आर्थिक आमीषाने खोटे गुन्‍हे नोंद करत आहेत. यापुढे हिंदू असे खोटे गुन्‍हे खपवून घेणार नाहीत. अंधश्रद्धेच्‍या माध्‍यमातून धर्मांतर करण्‍याचे धाडस केले जात आहे.

संपादकीय भूमिका :

धर्मांतरविरोधी कायद्यासाठी हिंदूंना पुष्‍कळ वेळ वाट पहावी लागणे प्रशासनाकडून अपेक्षित नाही !