किर्लोस्करवाडी (जिल्हा सांगली) – सांगली जिल्ह्यातील ३० हून अधिक गावांसाठी, तसेच पलूस, तासगाव, कडेपूर, खानापूर आणि वाळवा या तालुक्यांतील गावांसाठी किर्लोस्करवाडी हे नजीकचे अन् सोयीचे रेल्वेस्थानक आहे. सद्यःस्थितीत या स्थानकावर केवळ २ ‘पॅसेंजर’ आणि ३ जलद (एक्सप्रेस) गाड्यांना थांबा आहे. अनेक महत्त्वाच्या गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागते, तसेच किर्लोस्करवाडी स्थानकावरील पायाभूत सुविधांकडे रेल्वे विभागाचे दुर्लक्ष आहे. तरी किर्लोस्करवाडी (जिल्हा सांगली) येथील रेल्वेस्थानकाला सुविधा देण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन किर्लोस्करवाडी रेल्वे प्रवासी संघटना आणि ग्रामस्थ यांनी किर्लाेस्करवाडी स्थानक प्रबंधकांना दिले. या प्रसंगी रेल्वे प्रवासी संघटनेचे जीवन नार्वेकर, डॉ. चंद्रशेखर माने, ‘जायंट्स ग्रुप’चे अध्यक्ष अजित लेंगरेकर, धनंजय सुतार, अख्तर पिरजादे, किसन माळी यांसह अन्य उपस्थित होते.
स्थानक प्रबंधकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दादर-हुब्बळी, हजरत निजामुद्दीन वास्को-गोवा या प्रतिदिन धावणार्या २ गाड्या, तसेच मिरज-पुणे (साप्ताहिक) या गाड्यांना किर्लाेस्करवाडी येथे थांबा देण्यात यावा. रेल्वेस्थानकावरील पायाभूत सुविधांमध्ये प्रामुख्याने शुद्ध पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था, फलाटावर दिव्यांची व्यवस्था, तसेच एक अतिरिक्त फलाटही करण्यात यावा. या स्थानकाचा ‘अमृतभारत’ या योजनेत समावेश करावा. वारकर्यांच्या मागणीनुसार सातारा-पुणे या मार्गावरून जाणारी मुंबई-पंढरपूर ही गाडी चालू करण्यात यावी. या मागण्या मान्य न केल्यास ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात येईल.
संपादकीय भूमिकाज्या गोष्टी प्रवासी संघटनेच्या लक्षात येतात त्या गोष्टी सर्व यंत्रणा हाताशी असणार्या रेल्वे प्रशासनास का लक्षात येत नाहीत ? रेल्वे प्रशासनाला जनतेविषयी काही वाटत नाही, असे म्हणायचे का ? |