कोल्हापूर, १० सप्टेंबर (वार्ता.) – कोल्हापुरातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ‘आमदार राजेश क्षीरसागर फाऊंडेशन’च्या वतीने श्रावण मासाच्या चौथ्या सोमवारी म्हणजेच ११ सप्टेंबरला ‘श्रावण व्रत वैकल्य’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या नष्टे लॉन येथे सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती ‘हिंदु धर्म संघटने’च्या वतीने शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेस ह.भ.प. महादेव यादव महाराज, विश्व हिंदु परिषदेचे अधिवक्ता सुधीर जोशी-वंदूरकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, श्री. कमलाकर किलकिले, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, हिंदू युवा प्रतिष्ठानचे श्री. अशोक देसाई, बजरंग दलाचे श्री. पराग फडणीस, श्री. शामराव जोशी, श्री. गुरुप्रसाद कुलकर्णी यासंह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी अधिवक्ता सुधीर जोशी-वंदूरकर म्हणाले, ‘‘या उपक्रमाच्या अंतर्गत सकाळी १० वाजता पंचगंगा नदीचे पूजन केले जाणार आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस अभिषेक, तसेच मिरवणुकीने वाजत-गाजत हे जल कार्यक्रमस्थळी नेण्यात येईल. कार्यक्रमस्थळी गोमाता, भगवा ध्वज आणि शस्त्र यांचे पूजन होणार आहे. या उपक्रमात एकाचवेळी १०८ दांपत्य केळीच्या पानांवर मंत्रघोषात सात्त्विक भोजनाद्वारे त्यांचा उपवास सोडतील.’’
या प्रसंगी श्री. किशोर घाटगे म्हणाले, ‘‘या उपक्रमाचे अनुकरण कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गावांतही होत गेले आणि संपूर्ण राज्यभरातील अनेक भागांत असे उपक्रम होत आहेत. त्यामुळे या उपक्रमाचा प्रारंभ कोल्हापुरातून झाला याचा आनंद आहे.’’
विशेष : कार्यक्रमस्थळी भगवान श्रीकृष्ण, भारतमाता, स्वामी विवेकांनद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेक देवतांच्या प्रतिकृती असणार आहेत. भोजन मंडपामध्ये हिंदु धर्मातील मार्गदर्शनपर बोधवाक्यांचे फलक लावण्यात येणार आहेत.