गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा पाळण्याची पोलीस आयुक्तांची गणेशोत्सव मंडळांना सूचना !

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे

पिंपरी-चिंचवड (पुणे) – गणेशोत्सव मंडळांनी ध्वनीवर्धक यंत्रणा लावतांना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर यांचा विचार करावा. आवाजाने कुणालाही त्रास होऊ नये, याची दक्षता घ्यावी. गणेशोत्सवामध्ये आवाजाची मर्यादा पाळावी, तसेच ध्वनीप्रदूषण करू नये, अशा सूचना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गणेशोत्सव मंडळांना दिल्या. गणेशोत्सव मंडळांना अनुमतीसाठी ‘एक खिडकी योजना’ चालू केली असून यावर्षी गणेशोत्सव मंडळांना ‘मोरया’ पुरस्कारही देणार असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सुविधांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने शहरातील विविध गणेशोत्सव मंडळे, पोलीस प्रशासन, वीज वितरण, महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक आकुर्डी येथे पार पडली, त्या वेळी ते बोलत होते.

बैठकीतील विविध सूत्रे

१. गणेशोत्सव मंडळांना अनुमती देतांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनान्वये महापालिका कोणतेही शुल्क आकारणार नाही.

२. पोलीस प्रशासन, महापालिका, तसेच इतर यंत्रणांनी निश्चित केलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करणे गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक असेल.

३. गणेशोत्सव मंडळांनी स्वयंसेवकांची नेमणूक करून त्यांची सूची पोलीस प्रशासनास जमा करावी.

४. मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

५. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. झाडांवर खिळे ठोकणे, पोस्टर लावणे इ. गोष्टी करू नयेत, तसेच झाडांच्या फांद्या तोडू नयेत.