गोवा : पोलीस अधिकार्‍यांच्या छळवणुकीला कंटाळून महिला पोलीस उपनिरीक्षकाची स्वेच्छानिवृत्ती

‘ई-चलन’ यंत्राचा दुरुपयोग केल्याची तक्रार केल्यावर छळवणुकीमध्ये वाढ झाल्याचा आरोप !

पणजी, १० सप्टेंबर (वार्ता.) – गोवा पोलीस दलातील एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने तिच्या हाताखाली काम करणारा साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि वाहतूक विभागातील एक पोलीस निरीक्षक छळवणूक करत असल्याचा आरोप केला आहे. छळवणूक करणारे दोघेही पोलीस अधिकारी समुद्रकिनारपट्टी परिसरातील अनधिकृत कामांत गुंतल्याचा महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आरोप आहे. महिला पोलीस उपनिरीक्षकाने २९ ऑगस्ट या दिवशी पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह यांना लेखी स्वरूपात तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. छळवणुकीला कंटाळून संबंधित महिला पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या आरोपानुसार संबंधित पोलीस निरीक्षक कोणतेही कारण नसतांना तिची सतावणूक करत होता. तिची समस्या जाणून न घेता ती कामावर अनुपस्थित असल्याचे नोंद करत होता. या महिला पोलीस उपनिरीक्षकाने ‘ई-चलन’ यंत्राचा दुरुपयोग होत असल्याविषयी तक्रार केल्यावर छळवणुकीमध्ये आणखीनच वाढ झाली. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संबंधित पोलीस निरीक्षकाच्या अनधिकृत कृत्यावर पडदा टाकत होता. ‘साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक त्याच्या राजकीय पाठबळाचा वापर करून वरिष्ठ पातळीवरील पोलीस अधिकार्‍यांचे तोंड बंद करत आहे’, असे महिला पोलीस उपनिरीक्षकाचे म्हणणे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

गोवा पोलीस दलातील अधिकार्‍यांची गैरवर्तणूक चालूच ! पोलीस प्रशिक्षणात साधनेद्वारे नैतिकता शिकवणे अत्यावश्यक !