(म्हणे) ‘श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदांमध्ये करावे !’ – एन्.के. पाटील, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगर परिषद

कृत्रिम हौद ( प्रतिकात्मक छायाचित्र)

तळेगाव दाभाडे (जिल्हा पुणे) – गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याच्या नावाखाली तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून कृत्रिम हौद, निर्माल्य संकलन, तसेच कलशांची उभारणी केली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘माझी वसुंधरा’ या अभियानाची कार्यवाही प्रभावीपणे करणार असल्याची माहिती तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन्.के. पाटील यांनी दिली. यासह ‘श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदांमध्ये करावे’, असे आवाहनही पाटील यांनी भाविकांना केले.

पाटील पुढे म्हणाले की, निर्माल्य नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित न करता ते ‘निर्माल्य कलश’मध्ये गोळा करावे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशात्सव मंडळांचे निर्माल्य संकलनाकरता विसर्जनाच्या सर्व दिवशी शहरातून फिरत्या निर्माल्य कलशांची व्यवस्था केली आहे. संकलित होणार्‍या निर्माल्यातून सेंद्रीय खताची निर्मिती करण्यात येईल. सजावटीतील साहित्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचा आदेश संबंधितांना दिला आहे.

संपादकीय भूमिका

  • बकरी ईदच्या वेळी लाखो बकर्‍यांचा बळी दिला जातो. त्यांचे रक्त नदीत मिसळते. तेव्हा नदीच्या प्रदूषणात वाढ होत नाही का ? तसेच नदीमध्ये पुरेसे पाणी असूनही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास मज्जाव करून श्री गणेशभक्तांना मूर्ती कृत्रिम हौदातच विसर्जित करा, हा अट्टाहास का केला जात आहे. ही हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी नव्हे का ?