मराठवाड्यात ६१ शहरांवर जलसंकट !

‘एल् निनो’च्‍या प्रभावामुळे परतीचा पाऊस अल्‍प रहाणार !

प्रतिकात्मक चित्र

छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यावर यंदाही पावसाअभावी पाणीटंचाईचे संकट असून विभागातील ८० पैकी ६१ मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणारे स्रोत डिसेंबर अखेर आटतील, असा अहवाल नगरपालिका आणि महापालिका यांनी दिला आहे. त्‍यामुळे ३ मासांनंतर या शहरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मराठवाडा हा परतीच्‍या पावसाचा प्रदेश आहे; मात्र ‘एल् निनो’च्‍या प्रभावामुळे यंदा परतीचा पाऊसही हुलकावणी देईल, असा अंदाज असल्‍याचे हवामानविषयक अभ्‍यासकांनी म्‍हटले आहे.

एल निनो ही सागरी घटना 
उष्‍ण कटीबंधीय पॅसिफिकच्‍या विषुववृत्तीय प्रदेशात महासागरातील तापमान आणि वातावरणातील पालट यांसाठी उत्तरदायी असलेल्‍या सागरी घटनेला ‘एल् निनो’ म्‍हणतात.

मराठवाड्यात ७ जून, २२ जुलै, तर ऑगस्‍टमध्‍ये केवळ ४ दिवस पाऊस झाला. त्‍यामुळे खेड्यापाड्यांसमवेतच नियोजित पाणीपुरवठ्याच्‍या सोयी असलेल्‍या शहरी भागांनाही तीव्र पाणीटंचाईच्‍या झळा सोसाव्‍या लागत आहेत. शेवटच्‍या टप्‍प्‍यात मोठा पाऊस झाला नाही, तर ग्रामीण भागासमवेत शहरांनाही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.