शहरात मोकाट गुरे सोडल्‍यास संबंधितांवर दंडात्‍मक कारवाई करणार ! – अभिजित बापट, मुख्‍याधिकारी, सातारा नगरपालिका

प्रतिकात्मक चित्र

सातारा, ६ सप्‍टेंबर (वार्ता.) – पाळीव गुरांच्‍या मालकांनी शहरामध्‍ये मोकाट गुरे सोडल्‍यास त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, अशी माहिती सातारा नगरपालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

ते म्‍हणाले की, मुख्‍य रस्‍त्‍यांवर गाय, म्‍हैस, शेळी, गाढव अशी जनावरे मोकाट सोडली जात आहेत. यामुळे मुख्‍य रस्‍त्‍यांसह चौकाचौकांत वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेक वेळा गुरांमुळे गंभीर अपघातही होत आहेत. मोकाट प्राण्‍यांमुळे नागरिकांच्‍या जीवितास धोका निर्माण झाला असून गुरे पाळणार्‍या नागरिकांनी जनावरे मोकाट सोडू नयेत. असे केल्‍यास महाराष्‍ट्र नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम २८२ ते २९२ मधील तरतुदींनुसार कडक कार्यवाही होईल.