सांगली महापालिका क्षेत्रात लवकरच १०० ‘इ-बस’ चालू होणार !

प्रतिकात्मक चित्र

सांगली – केंद्र सरकारकडून साहाय्यभूत योजनेअंतर्गत ‘इ-बस’ सेवा चालू करण्यासाठी देशातील ४४ शहरांची निवड झाली. यात सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच सांगली महापालिका क्षेत्रात ‘इ-बस’ चालू होणार आहे. ही सेवा चालू करण्यासाठी शासन महानगरपालिकेला १०० ‘इ-बस’ देणार आहे, अशी माहिती सांगली महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी दिली.

यांसाठी आगार चालू करण्यासाठी सांगली महापालिकेला जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. केंद्र सरकारने ‘सेंट्रल साहाय्यभूत योजने’च्या अंतर्गत ५ ते १० लाख लोकसंख्येच्या निकषात सांगली महापालिकेचा समावेश केला आहे. वर्गवारीनुसार मोठ्या बसना प्रतिकिलोमीटर अनुक्रमे २४ रुपये, मध्यम बसला २२ रुपये, तर ‘मिनी बस’साठी २० रुपये प्रतिकिलोमीटर अनुदान मिळणार आहे. या गाड्या शासन १० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देणार असून त्यासाठी सांगली शहर, कुपवाड आणि मिरज अशा तिन्ही शहरांत ३ आगार आणि ३ ‘चार्जिंग स्थानके’ करण्यात येणार आहेत. या आगाराच्या विकासाचा व्यय महापालिकेला करावा लागणार असून त्यासाठी १० कोटी रुपये व्यय येणार असून त्यातील ६ कोटी रुपये निधी महापालिकेला शासनाकडून मिळणार आहे.