सनातन धर्मात ‘सप्तलोक’ सांगितले आहेत. देवाच्या कृपेने मला सूक्ष्म ज्ञानाद्वारे त्यांचे अर्थ प्राप्त झाले. ते पुढे दिले आहेत.
१. भूलोक : ‘भू’ हा शब्द ‘मातृ’ या अर्थाने आहे. मनुष्याच्या जन्मभूमीला ‘भूलोक’ किंवा ‘मातृलोक’, असे म्हटले आहे.
२. भुवर्लाेक : ‘भू’ म्हणजे पृथ्वी आणि ‘व’ म्हणजे निगडित. पृथ्वीशी निगडित सूक्ष्मलोक, म्हणजे ‘भुवर्लाेक’. येथे पृथ्वीवरून आलेल्या चांगल्या शक्ती आणि वाईट शक्ती यांचा वास असतो.
३. स्वर्गलोक : ‘स्व’ हा शब्द सुखाशी संबंधित आहे आणि ‘र्ग’ हा शब्द ‘गर्क असणे’ किंवा ‘रमणे’ अशा अर्थाने आहे. ज्या लोकात सुखात रमणारे जीव रहातात त्याला ‘स्वर्गलोक’, असे म्हणतात.
४. महर्लाेक : ‘मह’ म्हणजे मोठा. साधनेच्या दृष्टीने मोठा, म्हणजे उच्च लोक.
५. जनलोक : ‘जन’ हा शब्द ‘जोडला जाणे’ या अर्थाने आहे. जीव शिवाशी जोडला जातो त्या लोकाला ‘जनलोक’, असे म्हणतात.
६. तपोलोक : ‘तप’ हा शब्द तपश्चर्या या अर्थाने आहे. जनलोकात जीव शिवाशी जोडला गेला; परंतु ही अवस्था कायम टिकून रहाण्यासाठी जिवाने ‘तप’, म्हणजे तपश्चर्या करायला हवी. अशा जिवांचे तप करण्यासाठीचे सूक्ष्म स्थान, म्हणजे ‘तपोलोक’ होय.
७. सत्यलोक : ‘सत्य’ हा शब्द ‘ब्रह्म’ या अर्थाने आहे. जिवाला ब्रह्माची अनुभूती येते तो ‘सत्यलोक’ होय.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०२२)
|